श्रावण - शास्त्रश्रवण अनुष्ठान!

    04-Aug-2022
Total Views |

shiv
 
 श्रावण महिना म्हटले की, नैसर्गिक सौंदर्य भरून येते. वातावरण धार्मिक व आध्यात्मिक बनते. सारी वसुधा हिरवा शालू नेसून माणसांची मने प्रफुल्लित करण्यास तत्पर झालेली आहे. भारतीय जनमानस भक्ती भावनेने ओथंबलेले आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात झालेली पर्जन्यवृष्टी होऊन ती भूमिमातेला फलीभूत करण्यास प्रवृत्त करतेय. वर्षभर धरणीमातेची मनापासून सेवा करणारा शेतकरी राजा मात्र अतिशय प्रसन्न आहे. कारण, त्याने भूमीत पेरलेली बीजे आता अंकुरित होत आहेत. तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय सर्व उत्सव आणि व्रतवैकल्यांचे अनुष्ठानदेखील होते ते याच महिन्यात. म्हणूनच श्रावण हा महिना सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठतम होय.
 
 
सं श्रुतेन गमेमहि मा श्रुतेन विराधिषि।
(अथर्ववेद-१/१/४)
 
 
अन्वयार्थ
 
आम्ही (श्रुतेन) वेदादी शास्त्रांची जी वचने श्रवण केली आहेत, त्यांच्याशी (सं गमेयमहि) संयुक्त, एकरूप व्हावे. त्या ज्ञानाला आमच्या जीवनाचे अंग बनवावे. (श्रुतेन) ते जे काही ऐकले आहे, त्यांपासून (मा विराधिषि) आम्ही वेगळे होता कामा नये.
 
 
विवेचन
 
या मंत्रात श्रवण संस्कृतीचा महिमा वर्णिला आहे. काय ऐकावे? मानवी जीवनाला उपयुक्त ठरणार्‍या आध्यात्मिक विचारांना आणि सत्य व शाश्वत विचारांचे प्रतिपादन करणार्‍या वेदादी शास्त्रांतील तत्त्वज्ञानाला. श्रवण केले की, मानवी जीवन धन्य होते. कारण, मानव जे काही श्रवण करतो व वाचतो, तेच वाणीने व्यक्त करतो. तसेच जे बोलतो, त्याचीच परिणती त्याच्या कार्यातून दाखवितो.
 
 
यादृष्टीने बाराही महिन्यातील श्रावण महिना हा सर्वाधिक महत्त्वाचा समजला जातो.
’श्रवण’ नक्षत्रामुळे याचे नाव ’श्रावण’ असे पडले आहे. या महिन्यात बाह्यसृष्टीबरोबरच प्रत्येक मानवाची आंतरिक वृत्ती हीसुद्धा धार्मिकता, आध्यात्मिकता व सौजन्यशीलता इत्यादी बाबींकडे वळते. धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या हा महिना आम्हांस बरेच काही शिकवून जातो. भारतीय आध्यात्मिक विचारधारा प्रसारित होण्याकरिता या महिन्याला अत्यंत महत्त्व आहे.
 
 
आषाढी अमावस्या संपली की, श्रावण महिन्याला आरंभ होतो आणि सुरुवात होती, ती अंतर्बाह्य जीवन विकसित व्हायला!
विशेष म्हणजे, नामाभिधानावरूनच श्रावण हा महिना श्रेष्ठ ग्रंथातील विचार ऐकण्यास व त्यांचे स्वाध्याय (वाचन) करण्यास प्रवृत्त करणारा आहे. धार्मिक व आध्यात्मिक सद्ग्रंथांचे अध्ययन व श्रवण या महिन्यात केलेच पाहिजे. उपनिषदांनी म्हटले आहे- स्वाध्यायान्मा प्रमद:। स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम्॥
 
 
स्व + अध्ययन म्हणजेच स्वतःचे निरीक्षण. आत्मपरीक्षण हे याचेच दुसरे नाव, तसेच सु+अध्ययन म्हणजेच श्रेष्ठ ग्रंथांचे श्रवण व वाचन. प्रत्येक माणसाने आपल्या अंतर्मनात डोकावून पाहिले पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगातून वाटचाल करीत असताना आपण कुठे चुकलो तरी नाही ना? यावर चिंतन करणे गरजेचे असते. पण, दुर्दैव आहे की, मन व इंद्रियांच्या दिशेने मार्गक्रमण करीत बाह्य दुष्प्रवृतींत गुंतून गेलेला माणूस आत्म्याचा धोनी कधीच ऐकत नाही वा आंतरिक विचार कधी करत नाही. बहिर्मुख प्रवृत्ती त्याला श्रेष्ठ मार्गाकडे जाण्यास रोखते.
 
 
म्हणूनच स्वाध्याय म्हणजे प्रत्येकाने विवेक बुद्धी ठेवून स्वतःचे निरीक्षण केलेच पाहिजे. दिवसभरात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्या हातून काय चांगले घडले? काय वाईट घडले आहे? याचा लेखाजोखा पाहणे आणि सतत आपल्यावरच नियंत्रण ठेवत निरीक्षण करणे, याला ’स्वाध्याय’ म्हणतात.
 
 
दुसरा अर्थ होतो, श्रेष्ठ मानवी जीवनाला दिशा देणार्‍या आणि उन्नतीच्या मार्गावर घेऊन जाणार्‍या वेद, उपनिषद, दर्शन, गीता, रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथांचे मनःपूर्वक अध्ययन. जे काही वाचले, त्याच्यावर चिंतन करणे फार महत्त्वाचे असते. वाचन करणे म्हणजे, केवळ पाने चाळणे नव्हे, तर त्या ग्रंथात दडलेला जो महदाशय आहे, त्याच्याशी आपल्या जीवन जोडणे होय. जो कोणी स्वाध्यायशील मानव पवित्र अशा ग्रंथाचे एखादेदेखील पृष्ठ वाचतो आणि त्याला जीवनाचे अंग बनवितो, तो खर्‍या अर्थाने आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल करू लागतो.
 
 
सदर वेदमंत्रात मानवाने श्रवण, वाचन व मनन यापासून नाते तोडू नये, असा मौलिक संदेश दिला आहे. कारण, सर्व प्राण्यांमध्ये मानव प्राणी हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. ज्ञान व बुद्धीच्या बळावर तो आपल्यासह इतरांचेही जीवन सुखी-समाधानी व आनंदी बनवू शकतो. हे सामर्थ्य एकट्या मानवामध्ये आहे. विवेकशक्तीने तो सत्य आणि असत्य यांचा भेद करून सत्याशी एकनिष्ठ होतो. म्हणूनच त्याने नेहमी सद्ग्रंथांचे श्रवण आणि अध्ययन केलेच पाहिजे. सर्व कामे बाजूला ठेवून या पवित्र कार्याकरिता वेळ दिलाच पाहिजे.
 
 
शरीराचा विकास ज्याप्रमाणे उत्तम खानपान व व्यायामाने होतो, त्याचप्रमाणे मन बुद्धीचा विकास हा स्वाध्यायाने होतो. श्रेष्ठ ग्रंथांच्या वाचनाने मानसिकदृष्ट्या उन्नत होतो. नवनवीन विचार येतात ते उत्तम ग्रंथांच्या वाचनानेच! त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नती हीदेखील साधते ती सद्ग्रंथांच्या वाचनानेच. माणसाच्या मनातील निराशा नाहिशी होते. भौतिक मायामोहाच्या जंजाळात अडकलेल्या माणसाला वेदशास्त्रांचे तत्त्वज्ञानच तारू शकते.
 
 
वेधशास्त्रांच्या अध्ययनाचे महत्त्व रेखाटताना सामवेदातील मंत्र म्हणतो-
पावमानीर्योऽध्येत्यृषिभि: सम्भृतं रसम्।
तस्मै सरस्वती दुहे क्षीरं सर्पिर्मधुदकम्॥
(सामवेद उ.- ५.२.८.२)
 
 
म्हणजेच जो मानव पवित्र अशा वेदशास्त्रांतील मंत्रांचे तसेच ऋषींनी धारण केलेल्या ज्ञानरसांचे अध्ययन करतो, त्यावर चर्चा करतो, ज्ञानाचा आधारभूत असलेला रसयुक्त परमदेव परमेश्वर (सरस्वती) त्याच्यासाठी दूध, तूप, मधू आणि जल इत्यादी सर्व पदार्थांचे दोहन करतो व त्यांना प्रदान करतो. याचाच भावार्थ असा आहे की, वेद ज्ञानाच्या अध्ययनाने आणि त्यावर आचरण केल्याने त्याला आत्मिक सुखासह विविध भौतिक पदार्थ व वस्तूंची प्राप्तीदेखील होते. हे वैदिक ज्ञानाच्या अध्ययनाचे फळ होय.
 
 
शास्त्रकारांनीदेखील कानाची उपयुक्तता विशद करताना म्हटले आहे-
श्रोत्रं श्रुतेनैव न कुंडलेन!
 
 
माणसाचे कान हे शास्त्र श्रवणानेच शोभून दिसतात. नानाविध कुंडले अथवा अलंकार धारण केल्याने कदापि नव्हे!
श्रावण महिना म्हटले की, नैसर्गिक सौंदर्य भरून येते. वातावरण धार्मिक व आध्यात्मिक बनते. सारी वसुधा हिरवा शालू नेसून माणसांची मने प्रफुल्लित करण्यास तत्पर झालेली आहे. भारतीय जनमानस भक्ती भावनेने ओथंबलेले आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात झालेली पर्जन्यवृष्टी होऊन ती भूमिमातेला फलीभूत करण्यास प्रवृत्त करतेय.
 
 
वर्षभर धरणीमातेची मनापासून सेवा करणारा शेतकरी राजा मात्र अतिशय प्रसन्न आहे. कारण, त्याने भूमीत पेरलेली बीजे आता अंकुरित होत आहेत. तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय सर्व उत्सव आणि व्रतवैकल्यांचे अनुष्ठानदेखील होते ते याच महिन्यात. म्हणूनच श्रावण हा महिना सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठतम होय. याचे सर्वांगीण महत्त्व ओळखून सुयोग गीते अनुष्ठित करणे इष्ट ठरेल.
 
 
 -डॉ. नयनकुमार आचार्य
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.