केरळमधील हिरवा ब्राह्मणद्वेष

    04-Aug-2022   
Total Views |

kerala
 
कम्युनिस्टांच्या हातातील केरळची दिवसेंदिवस वाताहत होताना दिसते. भाजप कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक गेल्या कित्येक वर्षांपासून कम्युनिस्टांचे हल्ले सहन करत केरळमध्ये निर्भिडपणे कार्यरत आहेत. नुकतीच केरळच्या मल्लपूरममध्ये मुस्लीम समाजाने एक मोठी रॅली काढली. मात्र, ही रॅली कुठल्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी काढलेली नव्हती, तर ब्राह्मण जिल्हाधिकारी नियुक्त का केला, यासाठी हा मोर्चाचा प्रपंच.
 
 
दरम्यान, केरळ सरकारने नुकतीच मल्लपूरमच्या जिल्हाधिकारीपदी वेंकटरमण यांची नियुक्ती केली आहे. पण, जिल्हाधिकारीपदी ब्राह्मण व्यक्तीची नियुक्ती केली म्हणून संतप्त झालेला मुस्लीम समाज थेट रस्त्यावरच उतरला. केवळ आणि केवळ सनातन हिंदू धर्माविषयीचा तिरस्कार आणि ब्राह्मणद्वेषामुळे पछाडलेल्यांनी या रॅलीतून शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला. त्यामुळे एका ब्राह्मण जिल्हाधिकार्‍याला विरोध म्हणून जर हजारोंच्या संख्येने केरळच्या मल्लपूरममधील मुस्लीम समाज रस्त्यावर उतरत असेल, तर केरळची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे, त्याची प्रचिती यावी.
 
 
धक्कादायक बाब म्हणजे, या रॅलीदरम्यान केरळ पोलीस मात्र मूकदर्शक होते. तीव्र घोषणाबाजी होत असतानाही त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. मुळात जिल्हाधिकारी होणं म्हणजे रस्त्यावर उतरून दगडं फेकण्याइतकं सोपं नाही. त्यासाठी अनेक वर्षांची मेहनत, अभ्यास, तपस्या लागते. त्यातच आपल्या देशात केवळ ब्राह्मणांनाच जिल्हाधिकारी होता येईल, असा कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे कोणत्याही समाजाचा, धर्माचा व्यक्ती त्या पदापर्यंत पोहोचू शकतो. विशेष म्हणजे, आरक्षणाच्या कुबड्या नसतानाही ब्राह्मण समाज आज सर्वांच्या पुढे आहे.
 
 
बहुसंख्य निर्वासित काश्मिरी पंडित कुटुंबीय स्वतःच्या पायावर उभी आहेत. त्यामुळे हिंदू आणि भारत कधीच विस्तारवादी नव्हता आणि नसेलही. परंतु, अशा जातीय द्वेष निर्माण करणार्‍या रॅली निश्चितच देशासाठी घातक म्हणाव्या लागतील. त्यातच ‘पीएफआय’ आणि ‘एसडीपीआय’ या जिहादी संघटनांनी केरळला आपला गड बनवले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालबरोबरच केरळदेखील एका धोकादायक वळणावर येऊन ठेपले आहे. तेव्हा, केरळमधील माकप सरकार तुष्टीकरणाचे राजकारण धुडकावून जिल्हाधिकार्‍यांच्या पाठीशी राहणार की जिल्हाधिकारी बदलणारे, ते बघायचे.
 
 
बिळातले कट्टरपंथीय बाहेर...
 
 
सध्या सोशल मीडियावर ‘हर हर शंभू, शिव महादेवा’ हे गाणे प्रचंड धुमाकूळ घालत आहे. मात्र, हे गाणे गाणार्‍या गायिका फरमानी नाज यांना सध्या कट्टरपंथीयांचा विरोध सहन करावा लागत आहे. गलिच्छ भाषा आणि शिव्यांचा सामनाही त्यांना करावा लागत असून स्वतःला इस्लामचे कर्तेधर्ते मानणार्‍यांकडून त्यांना उपदेशाचे डोस पाजले आहेत. इस्लामी कट्टपंथीयांकडून ‘हर हर शंभू गाणं’ इस्लामच्या विरोधात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
 
 
नाज यांनी याआधीही हिंदू देवदेवतांची भजने गायली आहेत. तेव्हा त्यांना तितका विरोध झाला नाही. मात्र, आता हे गाणे अचानक चर्चेत आल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सध्या देशात ठिकठिकाणी ‘कावड यात्रा’ सुरू आहे.
 
 
त्याचप्रमाणे पवित्र श्रावण महिनाही चालू आहे. त्यामुळे फरमानी यांना विरोध करून हिंदूविरोधातील वातावरण पेटवण्याचे, चिथवण्याचे हे सर्व प्रयत्न असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. फरमानी यांच्या गाण्याला हिंदूंसहित संपूर्ण देशाने डोक्यावर घेतल्याने काही मुस्लीम कट्टरपंथीयांना ते सहन होत नाही. देवबंदच्या मौलाना मुफ्ती असद काजिमीने, तर गाणं, नाचणं इस्लाममध्ये हराम असल्याचे सांगितले.
 
 
मुस्लिमांनी अशा गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे आणि मुस्लीम महिलेने गाणे गाणं इस्लाममध्ये स्वीकार्य नसल्याचेही या मौलवीने सांगितले. परंतु, खोलात जाऊन विचार केल्यास सध्याच्या आघाडीच्या मुस्लीम समाजाच्या नट-नट्या काय परिधान करतात, काय गातात आणि कसे नृत्य करतात याचा वेगळा शोध घेण्याची गरज नाही. मात्र, त्याला ‘बोल्डनेस’ या गोंडस इंग्रजी शब्दाचा मुलामा दिला जातो. त्यात आता उर्फी जावेद नावाची एक अभिनेत्री तर दररोज चित्रविचित्र कपडे घालून प्रसिद्धीसाठी फोटोशूट करते. मात्र, तेव्हा इस्लामला धोका पोहोचत नाही. त्याला, मग ‘फॅशन सेन्स’ म्हटले जाते.
 
 
सलमान असो वा आमीर यांनी हिंदूंच्या भूमिका करायच्या, त्यावर गाणी बनवायची आणि फरमानीने फक्त महादेवाचं गाणं गायलं तर कट्टरपंथीयांनी आकांडतांडवाला सुरुवात केली. मुंबईतील मुस्लीम अभिनेत्रींना काही बोललं तर कट्टपंथीयांना करारा जवाब मिलेगा हे माहिती असतं, म्हणून तिथे ते मूग गिळून गप्प बसतात. मात्र, हिंदूंचा विषय आला की, हे कट्टरपंथी बिळातून बाहेर आलेच म्हणून समजा...!
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.