केवळ शब्दज्ञान व दांभिकता

    04-Aug-2022
Total Views |

8 
 
 

खरा ज्ञानी भक्त असे वादविवाद व दांभिकता यांपासून दूर राहतो. तो नेहमी तात्त्विक मूळ सत्याचा सुखसंवाद करतो. असा हा सर्वोत्तमाचा दास खरोखर धन्य होय. लोकांसमोर शास्त्रउगमाचा सुखसंवाद साधणारा हा भक्त स्वतःला मोठा किंवा लोकांना अज्ञानी समजत कार्य करीत असतो, या भक्ताला आपल्या ज्ञानाचा, ज्ञानदानाचा गर्व नसतो. तसेच अज्ञानी जीवांना त्याच्याकडून ज्ञान मिळवण्यात कसलाही संकोच वाटत नाही. आपल्या नम्रवाचेने सुखसंवाद साधणार्‍या या ज्ञानीभक्ताच्या अंगी आणखीही काही गुणविशेष असतात.
 
 
या पूर्वीच्या काही श्लोकांतून भगवंताचा ज्ञानी भक्त कसा वागतो, त्याचे आचरण तसे असते, हे सांगून त्याच्या अंतरंगातील भाव उलगडून समर्थ दाखवत आहेत. यावरील समर्थकृत विवेचन वाचताना त्या ज्ञानीभक्ताचे अंतर्बाह्य स्वभाववर्णन समजते. जे पुढे नेत समर्थ सांगतात की,
 
 
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादें।
न लिंपे कदा दंभ वादे-विवादें।
करी सुखसंवाद जो उगमाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥
 
 
असा हा भक्त सदाचाराने वागणारा असतो. तो सततोद्योगी असतो, तरी त्याला थोडा का होईना, फावला वेळ मिळतो. त्या वेळेचा तो सदुपयोग करतो. म्हणजे, त्या फावल्या वेळेत तो आध्यात्मिक तत्त्वांचे मनन, चिंतन करतो. समर्थांनी दासबोधात नवविधाभक्तींचे विवरण करताना प्रथम आणि महत्त्वाचे स्थान श्रवणाला दिले आहे. श्रवणभक्ती प्रकारात साधकाने सर्व गोष्टी ऐकत जाव्यात, असे स्वामींनी म्हटले आहे. त्या समासात काय काय ऐकावे, याची तपशीलवार माहिती दासबोधांनी समास ४.१ मध्ये पाहायला मिळते.
 
 
थोडक्यात, १४ विद्या, ६४ कला, सर्व भौतिक, आध्यात्मिक शास्त्रे जाणून घ्यावी, निदान ऐकावी, असे समर्थ सांगतात. तथापि, त्या श्रवण साहित्यातून सार काय आणि असार काय याची साधकाला निवड करता आली पाहिजे. समर्थ पुढे स्पष्ट करतत की, ‘सार असार येकचि करावे। हे मूर्खपण॥’ केवळ अंधश्रद्धेने सारे काही नुसते ऐकल्याने कुणाचेही भले होणार नाही, हे उघड आहे. त्यासाठी जे श्रवण केले, त्यावर विचार करून आपल्या बुद्धिसामर्थ्याने त्यातील सार आणि असार वेगळे करण्यात शहाणपण आहे. एकदा असार काय, हे निश्चित झाले की, ते सोडून देणे, त्यांचा त्याग करणे सोपे जाते. नंतर जे सार हाती लागते, त्यावर मनन, चिंतन करून त्यातील तत्त्वे शोधता येतात.
 
 
त्या तत्त्वाच्या अनुवादाने मनन-चिंतनासाठी दिलेल्या फावला वेळ सत्कारणी लागतो. वरील श्लोकात ’तत्त्वानुवादे’ या अक्षरसमूहात ’अनुवाद’ या शब्दाचा प्रयोग स्वामी करतात.’अनुवाद’ या शब्दाचा शब्दशः अर्थ सोदाहरण सांगणे, असा आहे. या ठिकाणी भक्त साधक त्याला समजलेले आध्यात्मिक तत्त्व स्वतः आचरून ते सोदाहरण इतरांना सांगतो. आध्यात्मिक तत्त्वाचे श्रवण झाल्यावर त्यावर मनन-चिंतन करतो. त्याची प्रचिती अनुभवतो आणि मगच इतरांना ते सांगतोे, हे या श्लोकातील ’तत्त्वचिंतनवादे’ या शब्दांतून स्वामींना अभिप्रेत आहे.
 
 
याउलट ज्यांना आध्यात्मिक तत्त्वांचे केवळ शाब्दिक ज्ञान प्राप्त झाले आहे, त्यांना त्या ज्ञानाची आत्मप्रचिती, स्वानुभव नसल्याने आपल्या पांडित्याचा गर्व होतो. असा हा केवळ शब्दज्ञान मिळविलेला पंडित आपल्या ज्ञानाचा गर्व करण्यात आणि त्या विषयावर वादविवाद करून शेखी मिरवण्यात आनंद मानतो. तथापि जो खरा भक्त आहे, तो अशा दांभिक, तात्त्विक वादविवादात लिप्त होत नाही. त्यात त्याला समाधान नसते. खर्‍या भगवद्भक्ताला दंभाचा तिटकारा असतो. आपल्या ज्ञानाचा तो कधी गर्व करत नाही. साहजिकच या विषयावर वादविवाद करायला तो कुठे जात नाही किंवा कुणी वादविवाद करायला आले, तर त्याला नम्रपणे नकार देतो. शब्दज्ञानाने गर्विष्ठ झालेल्या पंडिताचा गर्व समर्थांनी उतरवल्याची कथा समर्थचरित्रात वाचनात आली, जी उद्बोधक आहे.
 
 
काशिक्षेत्री राहून पांडित्य संपादन केलेले सदाशिवशास्त्री येवलेकर यांना आपल्या ज्ञानाचा गर्व झाला होता. शास्त्रीबुवा ठिकठिकाणी जाऊन तत्त्वज्ञानाच्या विषयावर वादविवाद करीत. वादात हरलेल्यांकडून ते जयपत्र लिहून घेत. समर्थांची कीर्ती ऐकून ते वादविवादासाठी चाफळला आले. समर्थांचे शिष्य भेटीला आल्यावर स्वामींना नमस्कार करीत. समर्थशिष्यांनी शास्त्रीबुवांनी समर्थांना नमस्कार करण्यास खुणेने सुचवले. पण, गर्विष्ठ शास्त्रीबुवा म्हणाले, “आम्ही वादविवादासाठी आलो आहोत, जर हरलो तरच नमस्कार करू.” समर्थ सारे दुरून पाहत होते.
 
 
समर्थ शास्त्रीबुवांना म्हणाले, “आपण शास्त्रीपंडित, ज्ञानी म्हणजे साक्षात भूदेव आहात. मीच आपल्याला वंदन करतो.” सदाशिवशास्त्रींना वाटले, आपली कीर्ती स्वामींपर्यंत आली असावी. शास्त्रीबुवांनी समर्थांना तत्त्वज्ञानविषयावर वाद करण्यासाठी पाचारण केले. समर्थ व कल्याणास्वामी यांनी एकमेकांकडे पाहिले. कल्याणस्वामींनी सांकेतिक खूण करून समर्थांना सुचवले की, शास्त्रीबुवांना ठिकाणावर आणावे, त्यांची गर्वाची धुंदी उतरावी. तेवढ्यात तेथून एक मोळीविक्या चालला होता. त्याला समर्थांनी बोलवायला सांगितले.
 
 
डोक्यावरची मोळी बाजूला ठेवून तो समर्थांपुढे हात जोडून उभा राहिला. समर्थ कल्याणस्वामींना म्हणाले, ”ही कुबडी घे आणि मोळीविक्यासमोर पाच रेषा ओढ.” नंतर स्वामी मोळीविक्याकडे वळून म्हणाले, “तू कोण आहेस?” तो म्हणाला की, “या गावकुसातील महार, तुमच्या मंदिरात लाकडे आणून देत असतो.” समर्थांनी त्याला एक रेष ओलांडायला सांगितले. नंतर विचारले, ’‘आता तू कोण आहेस?” तो म्हणाला, “मी या दावातील वैश्य आहे.” आणखी तीन-चार रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, “आता मी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे. बोला कोणाशी वाद घालायचा आहे.” सदाशिवशास्त्रींसमोर बसून त्याने न्याय-सांख्यिकी मीमांसा यावर धडाधड श्लोक सांगायला सुरुवात केली. ते सारे पाहूनच शास्त्रीबुवांची बोबडी वळली.
 
 
तोंडातून शब्द फुटेना. स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातला. मोळीविक्या म्हणाला, “महाराज, आता मला मोकळे करा.” समर्थांनी कुबडी त्याच्या डोक्याला लावली आणि म्हणाले, ”जा, आता तुला कोणी थांबवले आहे.” समर्थांनी सदाशिवशास्त्रीला गोड भाषेत उपदेश करून त्यांच्या विनंती वरून संप्रदायात समाविष्ट केले. स्वामींनी त्यांचे नाव ‘केशवस्वामी’ ठेवलेे.
 
 
या कथेतील अद्भुत प्रसंग बाजूूला काढला, तर केवळ शाब्दिक ज्ञानाचे मोठ्या पंडितांनाही आपल्या ज्ञानाचा कसा गर्व होतो, हे स्पष्टपणे दिसून येते. खरा ज्ञानी भक्त असे वादविवाद व दांभिकता यांपासून दूर राहतो. तो नेहमी तात्त्विक मूळ सत्याचा सुखसंवाद करतो. असा हा सर्वोत्तमाचादास खरोखर धन्य होय. लोकांसमोर शास्त्रउगमाचा सुखसंवाद साधणारा हा भक्त स्वतःला मोठा किंवा लोकांना अज्ञानी समजत कार्य करीत असतो, या भक्ताला आपल्या ज्ञानाचा, ज्ञानदानाचा गर्व नसतो.
 
 
तसेच अज्ञानी जीवांना त्याच्याकडून ज्ञान मिळवण्यात कसलाही संकोच वाटत नाही. आपल्या नम्रवाचेने सुखसंवाद साधणार्‍या या ज्ञानीभक्ताच्या अंगी आणखीही काही गुणविशेष असतात. तो नेहमी सत्य तेच बोलत असतो आणि त्याच्या तोंडून कधीही खोटे बाहेर पडत नाही, तोे पुढील श्लोकाचा विषय असल्याने पुढच्या लेखात सविस्तर पाहू.
 
 
 -सुरेश जाखडी
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.