अण्णा, आता पत्र आवरा...

30 Aug 2022 20:36:26

pawn
 
 
 
प्रत्येक राज्यात सत्तेचा सोपान गाठण्यासाठी प्रयत्न करणार्‍या केजरीवालांना त्यांचे गुरू अण्णा हजारे यांनी नुकतेच एक खरमरीत पत्र लिहिले. या पत्राद्वारे अण्णांनी दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या मद्य धोरणावर जोरदार टीका केली आहे. महसूल वाढीसाठी जो मागेल त्याला दारूच्या दुकानाची परवानगी देण्याच्या धोरणामुळे केजरीवाल गेल्या काही दिवसांपासून टिकेचे लक्ष्य ठरले असून अण्णांनीही त्यांना चांगलेच झापले. “केजरीवाल, तुम्ही राळेगणसिद्धीला आल्यानंतर गावातील दारू, बिडी आणि सिगारेट बंदीचे कौतुक केले होते.
 
 
राजकारणात येण्याआधी ‘स्वराज’ नावाचे पुस्तकही तुम्ही लिहिले, ज्यामध्ये ग्रामसभा, दारूबंदीच्या धोरणाबाबत अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. गावातील ९० टक्के महिलांनी दारूच्या दुकानाला विरोध केला, तर गावात दारूचे दुकान नसावे यासाठी तुमचा आग्रह होता. परंतु, राजकारणात येऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या तुम्ही विचारसरणीसह विसरलात,” अशा शब्दांत केजरीवालांना अण्णांनी जुन्या गोष्टींची आठवण करून दिली आहे. तसेच, तुम्ही सत्तेच्या नशेत बुडाल्याचाही टोलाही लगावला आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरील बातम्या वाचून वाईट वाटत असल्याचेही अण्णांनी सदर पत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे, केजरीवालांनी लिहिलेल्या ‘स्वराज’ पुस्तकाला खुद्द अण्णांचीच प्रस्तावना होती. अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनामुळे तत्कालीन काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. देशभरात काँग्रेसविरोधात संतापाची लाट उसळली.
  
२०११ साली झालेल्या आंदोलनाची जबाबदारी पाहणार्‍या केजरीवालांनी लगोलग २०१२ साली आम आदमी पक्षाची स्थापना केली. पुढे दिल्लीत बहुमत मिळवले खरे, पण मोफत वाटप योजनांचा भडीमार अर्थात ‘रेवडी कल्चर’चा पायंडा पाडला. अण्णांच्या लोकप्रियतेचा आणि भोळेभाबडेपणाचा फायदा उचलून केजरीवालांनी आपला राजकीय डाव साधून घेतला. त्यामुळे आता अण्णांनी कितीही पत्र लिहिली तरीही केजरीवालांना त्याचे काहीही सोयरेसुतक पडलेले नाही. अण्णांनी याआधीही अनेकदा सल्ले दिले परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे केजरीवालांना अण्णांनी उगाच पत्र पाठवून आपले हसे करून घेऊ नये इतकेच! कारण, केजरीवाल आता अगदी पक्के राजकारणी झालेले आहेत.
 
सबकुछ गांधी परिवार...
 
कॉँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नसून दिवसेंदिवस एकएक मोठा नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत. गुलाम नबी आझाद यांच्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमधील तब्बल ६४ नेत्यांनीही आपले एकत्रित राजीनामे दिले आहेत. यामध्ये माजी उपमुख्यममंत्र्यांसह माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. या सर्वांनी आझाद यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता तेलंगण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. खान हे राज्यसभा खासदार असून ‘जी-२३’ मध्येही त्यांचा समावेश होता.
 
त्यांनी चक्क पाच पानी पत्रच सोनिया गांधींना लिहिले असून त्यात राहुल गांधी वरिष्ठ नेत्यांना योग्य वागणूक देत नसल्याचे म्हटले आहे. तसेच, तब्बल ४० वर्षांचा प्रवास मी आता थांबवत असून माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान ‘जी-२३’ समूहाचे नेते आनंद शर्मा यांनीही आता काँग्रेसविरोधात आपला मोर्चा वळवला आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाचा फैसला करणार्‍या मतदार यादीवरच त्यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
 
इकडे महाराष्ट्रातही काँग्रेसमध्ये सगळे आलबेल सुरू आहे, असं बिलकुल नाही. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठीही तर जवळपास डझनभर आमदार गैरहजर राहिले होते. त्याने भले काही फरक पडला नसता. परंतु, त्यातून महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या वाईट काळातही कशी एकसंध आहे, याचे दिव्य दर्शन महाराष्ट्राला घडले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर काँग्रेसला सल्ले देण्याची आणि पक्षावर टीका करण्याची एकही संधी हातची जाऊ देत नाही.
 
महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’ असे गोंडस नाव देऊन केलेल्या अभद्र युतीनंतर राहुल आणि सोनिया गांधींना महाराष्ट्रात यायलाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे पक्षनेतृत्वालाच काही घेणंदेणं नसेल तर नेते आणि कार्यकर्ते तरी पक्षात का म्हणून थांबतील म्हणा! देशभरात काँग्रेसला गळती लागल्याने धास्तावलेल्या काँग्रेसने आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे आणि आता त्यावरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. एकूणच निवडणूक कार्यक्रम ठरलेला असला तरीही त्यात गांधी आडनावाचा व्यक्ती विजयी होणार, हेच नक्की.
 
 
Powered By Sangraha 9.0