बांगलादेशचे चीनला जशास तसे!

03 Aug 2022 10:27:03

bangladesh
 
 
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचा बांगलादेश दौरा आता चांगलाच वादात सापडला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच हा दौरा होणार होता. मात्र, तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशने आक्षेप घेतल्यानंतर या दौर्‍याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता हा दौरा ७-८ ऑगस्टच्या आसपास जवळजवळ निश्चित झाला आहे. बांगलादेशने घेतलेल्या या पवित्र्यामुळे चीनची जगभरात नाचक्की झाली आहे. एवढ्याशा बांगलादेशनेही चीनला जशास तसे उत्तर दिल्याने बांगलादेश सध्या चर्चेत आला आहे.
 
 
मुद्दा असा आहे की, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या बांगलादेश दौर्‍याची घोषणा केली होती. कहर म्हणजे, बांगलादेश सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करताच चीनने परस्पर दौर्‍याच्या तारखांची घोषणा केली. चीनच्या या खोडसाळपणाचा सुगावा लागताच बांगलादेशमधील सध्याच्या शेख हसीना सरकारने त्यावर तत्काळ आक्षेप घेत आपली नाराजी व्यक्त केली.
 
 
बांगलादेश सरकारने घेतलेल्या आक्षेपाने चीन तोंडघशी तर पडलाच परंतु, जागतिक स्तरावर नाचक्कीदेखील झाली. या सर्व प्रकारानंतर अखेर चीनने या दौर्‍याच्या तारखांमध्ये बदल केला असून, आता चीनचे परराष्ट्रमंत्री ७-८ ऑगस्ट रोजी बांगलादेश दौर्‍यावर जाण्याची शक्यता आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, चीनने बांगलादेश सरकारसोबत कोणतीही चर्चा न करताच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच दौर्‍याची घोषणा करून टाकली. त्यामुळे बांगलादेशने त्यावर आक्षेप घेतला व संतापही व्यक्त केला.
 
 
आपला खोडसाळपणा जागतिक स्तरावर उघडा पडल्यानंतर अखेर चीनने बांगलादेश सरकारसोबत याविषयी रितसर चर्चा करून ७-८ ऑगस्टच्या दरम्यान हा दौरा निश्चित केला आहे. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्रीए. के. अब्दुल मोमेन यांचा न्यूयॉर्क आणि कंबोडियाचा दौरा आधीच नियोजित होता, असे असतानाही चीनने खोडसाळपणे याच कालावधीत बांगलादेश दौर्‍याची घोषणा केली होती. त्यावर आक्षेप घेत ए. के. अब्दुल यांनी चीनला या दौर्‍यात बदल करण्यास सांगितले. दरम्यान, वांग यी हे कंबोडिया आणि मंगोलियासहित काही अन्य आसियान देशांच्या दौर्‍याअंतर्गत बांगलादेशला पोहोचतील. महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या पाच वर्षांतील चीनच्या एखाद्या उच्चस्तरीय अधिकार्‍याचा हा पहिलाच बांगलादेश दौरा असणार आहे. याआधी वांग यी यांनीच नोव्हेंबर २०१७ मध्ये बांगलादेशचा दौरा केला होता.
 
 
मागील काही वर्षांपासून बांगलादेश आणि चीनमध्ये आर्थिक संबंध वाढले आहेत. त्याचप्रमाणे, बांगलादेशमध्ये चीनची गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या बांगलादेश दौर्‍यादरम्यान काही प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता असून, यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे ‘ग्लोबल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह’ आणि ‘ग्लोबल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह’ यांचाही समावेश आहे. याचबरोबर या दौर्‍यात आर्थिक बाबींबरोबरच राजकीय परिस्थितीवरदेखील चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
 
 
चीनचे विस्तारवादी धोरण कधीही लपून राहिलेले नाही. आसपासच्या देशांना चीन कायम आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्याचा तसे त्यांना गिळंकृत करण्याचे प्रयत्न करत असतो. चीनसारख्या अवाढव्य देशासमोर गरीब आणि छोट्या देशांचे काहीही चालत नाही. श्रीलंका त्याचे उत्तम उदाहरण आहे. चीनच्या नादाला लागून श्रीलंकेने स्वतःचे वाटोळे करून घेतले. आज श्रीलंका पूर्णतः डबघाईला आला आहे. आधी कर्जाचे आमिष द्यायचे आणि ते फेडता आले नाही तर आणखी कर्ज द्यायचे. यामुळे संबंधित देश आतून पोखरून निघतो.
 
 
श्रीलंकेनंतर आता पाकिस्तानदेखील त्याच वाटेवर आहे. चीनचे इतकं कर्ज वाटलं आहे की, आता चीनवरदेखील आर्थिक संकटाचे वारे घोंघावू लागले आहे. त्यामुळे चीन काही छोट्या देशांना चुचकारण्याचे काम करत आहे. मात्र, खोडसाळपणा विसरेल तो चीन कसला. बांगलादेश दौर्‍यातही चीन स्वतःच निर्णय घेऊन मोकळा झाल्याने बांगलादेश संतापला आणि नाराजी व्यक्त केली. बांगलादेशच्या या पवित्र्यामुळे चीनला चांगलीच अद्दल घडली. चीनच्या या खोडसाळपणाला लोंटागण न घालता बांगलादेशने चीनला न डगमगता जशास तसे उत्तर दिले आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0