उत्कृष्टतेचे साधक आणि परिपूर्णतेचे पूजक

29 Aug 2022 20:02:03

perfection
 
 
उत्कृष्टतेचे साधक आपल्यावरील टीकेने दडपून जात नाहीत. ते त्या टीकेचा स्वीकार आरामात करतात. याउलट ‘परफेक्शनिस्ट’ना टीका आवडत नाही. या टीकांमध्ये आपल्यात बदल घडवण्याची संधी मिळेल, यांची जाणीव त्यांना नसते. त्यांचे विचार कडवट होतात.
 
 
एका तत्त्ववेत्याने म्हटले आहे की, उत्कृष्टता मिळवण्यासाठी प्रयत्न करणे तुमच्यासाठी प्रेरणादायी असते. परिपूर्णतेसाठी प्रयत्न करणे, हे निराशाजनक आहे. हेन्री जेम्स या सुप्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकाराने म्हटले आहे की, Excellence does not require perfection. उत्कृष्टता मिळवण्यासाठी परिपूर्णता वा ‘परफेक्शनिझम’ची गरज नसते. बरे अलीकडेपर्यंत खेळ असो, काम असो वा सामान्य जीवन असो, या सर्वात परिपूर्णता आणण्याची पराकाष्ठा करणे हा ‘गोल्ड स्टॅडर्ड’ मानले जात असे. ‘परिपूर्ण असणे’ ही संकल्पना अगदी लहानपणापासून आपण ऐकून आहोत. पण, ही एक अशी संकल्पना आहे की, काही काळानंतर अनेक लोकांसाठी मनात भीती आणणारी भयप्रद संकल्पना बनली आहे. असे का? कारण, ‘परफेक्शन’ या संज्ञेमध्ये अशी अनेक अत्युच्च प्रतीची मानके समाविष्ट आहेत की, जी अप्राप्त बनतात. त्यामुळे आपल्याला दैनंदिन कामात आणि जीवनात सदैव अतृप्त आणि असमाधानी वाटते. ध्येय ठरवण्यासाठी ‘स्मार्ट’ तत्त्वे आपल्याला वास्तविक ध्येयनिर्मितीचा सल्ला देते.
 
 
माणसाला अशी सरळ ध्येयासक्ती आपल्या दैनंदिन जीवनात जोपासावी लागतात. ही ध्येयासक्ती जर वास्तववादी नसेल, तर आपल्याला आपल्या विचारांची पार्श्वभूमी बदलण्याची गरज पडेल. व्यक्तीच्या जीवनातील विविध क्षेत्रांतील लक्ष्ये आणि कामगिरीचे मूल्यांकन ती कसे करते, हे महत्त्वाचे ठरते. तर्कदृष्ट्या बघता मानसिक आरोग्य, भावनिक गुणवत्ता आणि प्रसन्नतापूर्वक सुसंवाद या गोष्टींमुळे जगायचा एकदंरीत अंदाज परिपूर्णतेपासून दूर गेला आहे. ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे. आपण हळूहळू आपल्याकडून जमेल तितकी उत्कृष्ट कामगिरी करू, असे आजकाल बरीच सूज्ञ मंडळी म्हणताना दिसत आहेत. ती एक चांगली विचारात घेण्यासारखी संकल्पना आहे. अशी उत्कृष्टता ही एक चांगली संकल्पना का आहे किंवा ते एक चांगले लक्ष्य का आहे, हे समजून घ्यायला पाहिजे.
 
जे लोक ‘उत्कृष्टता’ या संकल्पनेभोवती वावरताना काय करतात आणि ‘परिपूर्णता’ हे अंतिम उद्दिष्ट ठेवणार्‍या लोेकांपासून त्यांचे विचार का व कसे वेगळे आहेत, याचे निरीक्षण करणे आवश्यक ठरते. उत्कृष्टतेची साधना करणारे साधक सामान्यतः आव्हानात्मक उद्दिष्टे आपल्यासमोर सातत्याने ठेवतात. याच्याविरुद्ध ‘परफेक्शन’च्या मागे धावणारे लोेक अप्राप्य ध्येयाच्या मागे धावत राहतात. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात ते सतत निराश राहतात. मग, ते खेळाडू असो, शिक्षक असो व शास्त्रज्ञ असोत. कारण, काहीतरी मिळविण्याचे क्षण त्यांच्या हातातून निसटतात.
 
 
उत्कृष्टतेचे साधक सदैव आनंदी राहतात, तर परिपूर्णतेचे पूजक आपल्याला किती यश मिळाले किंवा काय प्राप्त झाले, याचा विचार करतात. काही पदरात पडले तरच ते आनंदी राहतात. थोडक्यात, त्यांचा आनंद त्यांच्या मूळ आत्मसन्मानापेक्षा त्यांना किती व काय मिळाले, यावर अवलंबून असतो. परिपूर्णतेचा पाठलाग करणारे आपल्या पराभवाने आपण वास्तविक जगात कसे खच्ची झालो आहोत, किती उद्ध्वस्त झालो आहोत, या अनुभवात जगतात, तर उत्कृष्टतेची साधना करणारे त्यांच्या अपयशातून वा पराभवातून जीवनाचा धडा शिकतात, हे नमूद करण्यासारखे आहे.
 
उत्कृष्टतेचे साधक त्यांच्या चुका नाकारत नाहीत वा त्या ओळखण्यात दिरंगाई करत नाहीत. त्या चुकांतून ते नवीन धडा शिकतात. त्या चुकांतून ते अकल्पित अशी संधी शोधतात. या चुकांच्या क्षितिजावर ते स्वत:ला प्रेरित करत नवनिर्माणाची संधी शोधतात. आपल्यामधील सामर्थ्य व गुण ते कसोशीने वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात. यांच्या अगदी उलट परिपूर्णतेचा ध्यास असलेलेलोक अपयश आणि पराजयाची मालिका मनामध्ये सतत घोळवत राहतात. जर एखाद्याचा अनुभव असेल, तर त्यांनी आपले विचारचक्र बदलण्याची गरज आहे. आपल्या अडथळ्यापेक्षा आपली सकारात्मकता कशी विकासात पुढे न्यायची, याचा विचार त्यांनी केला पाहिजे.
 
उत्कृष्टतेचे साधक आपल्यावरील टीकेने दडपून जात नाहीत. ते त्या टीकेचा स्वीकार आरामात करतात. त्यावर व्यवस्थित विश्लेषण करतात व आपण आपले कार्य अधिक चांगले वा उत्तम कसे करू, याचे अवलोकन करतात. याउलट ‘परफेक्शनिस्ट’ना टीका आवडत नाही. या टीकांमध्ये आपल्यात बदल घडवण्याची संधी मिळेल, यांची जाणीव त्यांना नसते. त्यांचे विचार कडवट होतात. त्यांना टीका हा आपल्यावर झालेला वैयक्तिक हल्ला असे त्यांना वाटते. साहजिकच अशी मंडळी विधायक होण्याऐवजी खच्ची होतात.
 
 
 - डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0