मुंबई : महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असताना, त्यात आता थेट पवार कुटुंबाची भर पडली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या ग्रीन एकर कंपनीवर ईडीचे धाडसत्र सुरु झाले आहे. रोहीत पवार या कंपनीचे संचालक असून कुख्यात येस बँक घोटाळ्यातील राकेश वाधवान हेही त्या कंपनीत सहभागी असल्याचे समोर आले आहे. ईडीकडून या कंपनीची प्राथमिक चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा एक मोठा नेता पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आला आहे.
"माझ्याविरोधात सुरु असलेली कारवाई ही सूडबुद्धीनेच सुरु आहे यात काहीच शंका नाही, पण मी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेन" अशी पुन्हा एकदा कांगावेखोर प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे कर्जत -जामखेडचे आमदार असलेले रोहित पवार हे २००६ - २०१२ या सहा वर्षांच्या काळात या ग्रीन एकर कंपनीचे संचालक होते. याच काळात झालेल्या १० कोटींच्या गैरव्यवहारांची चौकशी सुरु झाली आहे. याच काळात राकेश वाधवानही कंपनीत सहभागी होते. उघड होत असलेल्या माहितीनुसार या कारवाईत अजून बऱ्याच गोष्टींचे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.