आपल्या देशात मागच्या शतकात विनायक दामोदर सावरकर नावाचे एक लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व होऊन गेले. त्यांचा मृत्यू (खरं तर आत्मार्पण) 1966 साली झाला. म्हणजे या घटनेला आता अर्धशतक उलटून गेलं आहे. पण, या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव जनमानसावर आजही टिकून आहे. विशेष म्हणजे, हा प्रभाव त्यांच्या अनुयायांवर तर आहेच, पण त्यांच्या विरोधकांवरही आहे. विरोधकांवर थोडा जास्तच! त्यामुळे ते वारंवार त्यांची आठवण काढतात. अनेकदा वाकयुद्धे घडतात. ती पाहताना/ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे मूळचे संदर्भ तपासलेले नसतात.
विद्येचे वेगळ्या अर्थाने ‘पीठ‘ करणार्या ‘व्हॉट्सअॅप’ नावाच्या विद्यापीठात (?) येणार्या अर्धवट, अतिशयोक्त आणि अनेकदा संपूर्ण खोट्या माहितीवर आधारित विधानं केली जातात. अशी विधानं सावरकरांचे केवळ विरोधकच नव्हे, तर समर्थकसुद्धा करत असतात. काही उदाहरणं देतो. बाळाराव सावरकर नावाचे गृहस्थ 1950 ते 1966 या काळात स्वा. सावरकरांचे स्वीय साहाय्यक होते. सावरकरांनी त्यांच्या साहित्याचे अधिकार बाळाराव यांना दिलेले होते. 1993 मध्ये त्यांनी ‘समग्र सावरकर’ साहित्याचे दहा खंड प्रकाशित केले. हे सर्व खंड मिळून सुमारे सहा हजार पाने होतात, असे बाळाराव यांनी नमूद केले आहे. (हे सगळे खंड माझ्या संग्रही आहेत).
मध्यंतरी मी महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध व्यक्तीचं भाषण ऐकत होतो. भाषणाच्या ओघात त्या व्यक्तीने ठोकून दिलं की, सावरकरांनी दहा हजार पानांचं साहित्य लिहिलं आहे! त्यानंतर काही काळाने एका दूरचित्रवाणी वाहिनीवर एक कार्यक्रम बघत होतो. त्याचा सूत्रसंचालक तर याही पुढं गेला आणि त्यानं सावरकरांनी लिहिलेलं साहित्य हे (चक्क) 22 हजार पानांचे आहे, असं ठासून सांगितलं. हा सूत्रसंचालकसुद्धा महाराष्ट्रातली एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. प्रसिद्ध व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीवर सामान्य माणूस पटकन विश्वास ठेवतो. मध्यंतरी ‘व्हॉट्सअॅप’वर एक सनसनाटी संदेश फिरत होता. सावरकर परिवारातल्या दोन स्त्रियांनी पोटाला बॉम्ब बांधून गरोदर असल्याचा बहाणा केला आणि लाहोरपर्यंत प्रवास करून तेथे विशिष्ट व्यक्तीपर्यंत ते बॉम्ब पोहोचविले, असा त्या संदेशाचा आशय होता. ही शुद्ध लोणकढी थाप होती. इतिहासात असं काहीही घडलेलं नाही.
सावरकर अनुयायी असलेल्या व्यक्तींकडून दुसर्या प्रकारचीसुद्धा गफलत होऊ शकते. महाराष्ट्रात एक संस्था त्यांच्या जीवनावर एक नाटक छान पद्धतीनं सादर करते. पण, त्यात असा उल्लेख येतो की, अंदमानच्या तुरुंगामध्ये त्यांना कोलू फिरवून रोज 20 पौंड तेल काढावं लागत असे. प्रत्यक्षात हा कोटा होता 30 पौंडाचा! म्हणजे हे नाटक लिहिणार्या लेखकानं सावरकरांची शिक्षा (नकळतपणे) सौम्य केली नाही का? कोलू फिरवून एखादा पौंड तेल काढणं हेसुद्धा अतोनात कष्टाचं काम होतं. अशा परिस्थितीत इतका महत्त्वाचा तपशील तपासून घ्यायला हवा. वरवर पाहता एखाद्याला या गोष्टी किरकोळ चुका वाटू शकतात. पण, वस्तुस्थिती तशी नाही.
आज समाजमाध्यमे सर्वव्यापी झाली आहेत. अशा चुकीच्या माहितीचा प्रसार वायुवेगाने होतो - त्याचं कारण म्हणजे आलेली पोस्ट दुसर्याला पाठवण्याची सर्वांना होत असलेली घाई! अनेक जण तर तो मजकूर स्वत: वाचण्याआधी दुसर्यांना पाठवतात! आपण खूप महत्त्वाचे कार्य पार पाडले आहे, अशी त्यांची गोड गैरसमजूत असते.
इतिहासाबद्दल लिहिताना/बोलताना फार मोठी जबाबदारी पेलावी लागते. त्यातही सावरकर नावाच्या या महापुरुषाच्या संदर्भात तर जास्तच काळजी घेतली पाहिजे. कारण, त्यांच्या बाबतीत अनेक गैरसमज आधीच पद्धतशीरपणे पसरवण्यात आलेले आहेत. हे गैरसमज दूर करताना आपण सावरकरांचे अधिक उदात्तीकरण करणे पण टाळले पाहिजे - कारण त्यांचे मूळचे चरित्रच इतकं उदात्त, इतकं भव्यदिव्य आहे की, त्यात बाहेरून काही मालमसाला टाकण्याची गरजच नाही आणि वस्तुनिष्ठ इतिहासाच्या दृष्टीनेही ते अगदी अयोग्य आहे. त्यासाठी मूळ इतिहास वाचला पाहिजे. मग स्वाभाविकपणे प्रश्न उभा राहतो की, सावरकर समजून घ्यायचे असतील आणि अस्सल इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत? मुख्य म्हणजे सुरुवात कोठून केली पाहिजे? ही माहिती घेऊया पुढच्या लेखात.
- डॉ. गिरीश पिंपळे