गोष्ट पहिल्या ‘आयएसओ’ मानांकित स्मशानभूमीची

    27-Aug-2022
Total Views |


iso 
 
 
‘एक गाव, एक स्मशानभूमी’ ही लोकचळवळ उभी करणारे परभणी जिल्ह्यातील झरी येथील कृषिभूषण कांतराव देशमुख यांनी स्वखर्चातून जमीन विकत घेऊन गावातील सर्व जाती-धर्मीयांसाठी सुंदर व सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारली आहे. या स्मशानभूमीला नुकतेच ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे, असे मानांकन मिळविणारी ही देशातील पहिली स्मशानभूमी ठरली आहे. अशा या पहिल्या ‘आयएसओ’ मानांकित स्मशानभूमीची ही कथा...
 
 
समाज अनेक समूहांचा आहे. अशा समूहांचे अनेक प्रश्न आणि समस्याही त्या अनुषंगाने आल्याच. ग्रामीण समूहांत तर विविध प्रश्न आणि समस्या आजही निदर्शनास येतात. स्मशानभूमीचा प्रश्न हा त्यापैकीच एक कळीचा मुद्दा. मध्यंतरी तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे एका समाज समूहाला स्मशानभूमी नसल्यामुळे चक्क ग्रामपंचायतीसमोर मृतदेहाचे अंत्यविधी करण्याची वेळ आली. कोणत्याही समाजातील मृतदेहाची अवहेलना होऊ नये, यासाठी प्रत्येक समाजाने, शासकीय यंत्रणेने खरंतर काळजी घेतली पाहिजे, तरच त्यावरील उपाय शोधता येतील.
 
 
आजच्या एकविसाव्या शहरीकरणाच्या युगात वाढत्या लोकसंख्येमुळे जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्नही अधिकाधिक गहन होत जाणार आहे. त्यातच कोरोना महामारीच्या काळात स्मशानभूमीच्या प्रश्नाचे दाहक वास्तव देशातच नव्हे तर जगभरात यानिमित्ताने समोर आले होते.
 
 
तेव्हा अशा या स्मशानभूमीच्या समस्येवर परभणी जिल्ह्यातील झरी गावातील एक प्रगतशील शेतकरी, कृषिभूषण कांतराव देशमुख हे गेल्या 20 वर्षांपासून काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी ‘एक गाव, एक स्मशानभूमी’ ही चळवळ उभी केली आहे. या चळवळीला परभणी, हिंगोली जिल्ह्यात काही प्रमाणात यशही मिळालेले दिसते.
 
 
गावाच्या विकासासाठी झटणारा, शेतीमातीवर प्रेम करणारा आणि 25 वर्षे सरपंचपद भूषणवणारा एक सुजाण व्यक्ती म्हणून कांतरावांनी आपली खास ओळख निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या या कामाला गती मिळत आहे.
 
 

iso 
 
 
कोकण विभागाचे उपायुक्त अविनाश गोटे यांची सपत्नीक मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठधामास भेट. 
 
 
 
स्मशानभूमीसाठी जमीन दान
 
झरी (ता. जि. परभणी) हे 20 हजार लोकसंख्येचे मोठे गाव. या गावात विविध जाती-धर्मांच्या स्मशानभूमी आहेत. मात्र, यापैकी बहुतांश स्मशानभूमी गैरसोयीच्या विळख्यात सापडल्या होत्या. मरणानंतरही येथे माणसाची छळातून सुटका होत नसल्याचे चित्र दोन दशकांपूर्वी कांतरावांच्या नजरेस पडले. मृतदेहांची होणारी अशी विटंबना त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. त्यानंतर गावात चांगली स्मशानभूमी असावी, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यासाठी त्यांनी 2001 साली गावापासून एक किलोमीटर अंतरावरील नदीजवळ एक एकर जमीन स्वतः विकत घेऊन ही जमीन स्मशानभूमीसाठी दान केली. जिल्हा परिषदेच्या निधीतून स्मशानभूमीला संरक्षक भिंत व अंत्यसंस्कारासाठी मोठ्या शेडचे बांधकाम केले. या शेडमधून पाच अंत्यसंस्कार एकाच वेळी होऊ शकतात.
 
 
अंत्यसंस्काराच्या शेडला मातोश्री इंदिराबाई देशमुख हे नाव दिले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या अंत्यविधीची सुरुवात मागासवर्गीय व्यक्तीपासून झाली. हे कार्य करत असताना कांतरावांना पुढे ‘एक गाव, एक स्मशानभूमी’ ही कल्पना सुचली. यानिमित्ताने त्यांनी स्मशानभूमीचा कायापालट केला. स्वयंप्रेरणेने त्यांनी स्मशानभूमीला ’आयएसओ’ मानांकन मिळावे, यासाठी नोंदणी केली. त्याकरिता लागणारे सर्व निकष पूर्ण करण्याच्या आव्हानांचाही त्यांनी सामना केला.
 
 

iso 
 
 
 मोफत अंत्यविधी रथ
 
 
 
भौतिक सुविधायुक्त स्मशानभूमी
 
ग्रामस्थांच्या मदतीने स्मशानभूमीत निवारा, वीज, पाणी अशा भौतिक सुविधा आता उपलब्ध झाल्या आहेत. उत्तम दर्जाची संरक्षक भिंत बांधली गेली आहे. पावसाळ्यात ग्रामस्थांची अडचण होऊ नये, यासाठी निवाराही उभारण्यात आला आहे. ग्रामस्थांना बसण्याकरिता सिमेंटची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. एकाचवेळी तीन हजार ग्रामस्थ याठिकाणी बसू शकतात. आसनव्यवस्थेवर मृत पावलेल्या व्यक्तीचे नावे टाकून त्यांच्या स्मृती जागवण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळी विजेची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाण्यासाठी हातपंप व बोअरवेलची सुविधा आहे. याशिवाय मोफत अंत्यविधी रथाची (ट्रॅक्टर) सोय करण्यात आली आहे. या स्मशानभूमीची दुरवस्था होऊ नये, म्हणून कांतराव जातीने लक्ष घालतात. त्यासाठी ते नित्यक्रमाने स्मशानभूमीवर फेरी मारत असतात.
 
 
घोषवाक्यांतून संदेश
 
मृत्यू अटळ आहे आणि शरीर हे नश्वर आहे. त्यामुळे आप्तांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना यातून काही तरी संदेश मिळावा, या उद्देशाने स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीवर विविध घोषवाक्ये लिहिले आहेत. ‘मातापित्याची सेवा’, ‘वृक्षारोपण’, ‘मानवता’, ‘जल’, ‘अंधश्रद्धा’, ‘मुलगी वाचवा’ अशा विविध घोषवाक्यांतून सामाजिक संदेश दिला आहे. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळा प्रस्तुत ठिकाणी साजरा करण्यात आला. स्मशानभूमीत राष्ट्रप्रेमाचा जागर घडवून आणला गेलेला हा पहिला कार्यक्रम असावा.
 
 
‘ऑक्सिजन पार्क’ची उभारणी
 
सुसज्य स्वरूपाच्या या स्मशानभूमीत ‘ऑक्सिजन पार्क’ची उभारणी करण्यात आली आहे. वड, पिंपळ, आंबा, चिंच, कडूलिंब, आवळा अशा पाच हजार वृक्षांची लागवड याठिकाणी करण्यात आली आहे. रोपांची योग्य प्रकारे जोपासना केल्यामुळे वृक्षांचीही जलद वाढ झाली आहे. इथे येणार्‍या प्रत्येकाला आल्हाददायक अनुभव येतो. रखरखत्या उन्हातही गर्द सावलीचा आनंद मिळतो. त्यामुळे अनेक प्रकारचे पक्षीदेखील याठिकाणी विसावा घेतात. त्यामुळे परिसरातील शाळा ही परिसर अभ्यासासाठी या क्षेत्राची निवड करत आहेत. अंधश्रद्धेला छेद देत कांतरावांनी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रमदेखील हाती घेतला आहे.
 
 
’एक गाव, एक स्मशानभूमी’ उपक्रमांतर्गत स्पर्धा
 
 
स्मशानभूमींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी कांतरावांनी या वर्षीपासून ‘एक गाव, एक स्मशानभूमी’ या उपक्रमांतर्गत उत्कृष्ट स्मशानभूमी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतप्रथम येणार्‍या स्मशानभूमीला एक लाख रुपये, सन्मानपत्र देऊन सत्कारही करण्यात येणार आहे. स्पर्धकांनीआपला अर्ज दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत भरून पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ही स्पर्धा परभणी जिल्ह्यासाठी निःशुल्क आहे. स्मशानभूमी सर्व जाती-धर्मांसाठी असली पहिजे, असे काही नियम व अटी स्पर्धेसाठी आहेत.
 
 

iso 
 
 
 स्मशानभूमीतील विजेची सोय
 
 
 
स्मशानभूमीच्या माध्यमातून नवीन विचार
 
“ ’एक गाव, एक स्मशानभूमी’ या संकल्पनेला 80हून अधिक गावांनी प्रतिसाद दिला आहे. या सकारात्मक प्रतिसादामुळे स्मशानभूमीचे कार्य करण्याची उमेद वाढली. त्यामुळे आमच्या स्मशानभूमीला ‘आयएसओ’ हे मानांकन मिळू शकले. अशी मानांकन मिळविणारी आमची स्मशानभूमी ही देशातील पहिली स्मशानभूमी ठरली आहे. झरी गावाच्या ग्रामविकासातील ही एक क्रांतिकारक घटना आहे. यामुळे स्मशानभूमीच्या माध्यमातून नवीन विचार समाजापुढे येत आहे, ही निश्चितच दिशादर्शक बाब आहे,” असे कृषिभूषण कांतराव देशमुख यांनी सांगितले.
 
 
सामाजिक जाणीव तीव्र असेल, तर एक आदर्श स्मशानभूमी निर्माण होऊ शकते, हे झरी गावातील स्मशानभूमीने दाखवून दिले आहे. झरीसारखा हा प्रयोग अन्य गावातील सुजाण नागरिकांनी अंगीकारला, तर प्रत्येक गावात ’एक सुंदर, स्वच्छ स्मशानभूमी’ पाहायला वेळ लागणार नाही.
 
 
9970452766
- कृषिभूषण कांतराव देशमुख
 
 - विकास पांढरे
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.