शिक्षण व्यवस्थेत भारतीयत्वाची पुनःस्थापना आवश्यक

26 Aug 2022 15:20:26
pune
 
 
 
पुणे : इंग्रजांनी केवळ सरकार चालविण्यासाठी शिक्षण व्यवस्था निर्माण केली होती. भारतीय ज्ञान परंपरेतील विविध महत्त्वाच्या संकल्पना इंग्रजांच्या व्यवहारात नसल्याने, त्याला इंगजी साहित्यात प्रतिशब्द नाहीत. त्यामुळे ज्ञानाचे उत्तुंग शिखर गाठलेल्या आपल्या विविध शास्त्रांचा इंग्रजी भाषेत अभ्यास करता येत नाही. भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी या शास्त्रांचा अभ्यास गरजेचा आहे. हा अभ्यास आणि संशोधन भारतीय भाषांमध्येच होऊ शकते. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत भारतीयत्वाची पुनःस्थापना करण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष चमू कृष्ण शास्त्री यांनी व्यक्त केले.
 
 
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) विद्या भारती उच्च शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय ज्ञान परंपरा उच्च शिक्षणातील दृष्टिकोन बदल’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन करताना शास्त्री बोलत होते. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, सुप्रसिद्ध लेखक राधाकृष्ण पिल्लई, प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
भारताला विकसित देश बनविण्यासाठी कौशल्याधारित अभ्यासक्रमांबरोबर साहित्य, कला, संस्कृती असे पारंपरिक ज्ञान देण्याची गरज असल्याचे मत डॉ. कुंटे यांनी व्यक्त केले. भारतातील विशेषतः ग्रामीण भागातील लोकज्ञानाचे दस्तऐवजीकरण करून त्याचा शिक्षणात अंर्तभाव करण्याची आवश्यकता डॉ. सोनवणे यांनी प्रतिपादित केली. डॉ. आस्मा बागवान यांनी प्रास्ताविक, प्राचार्या पुरोहित यांनी स्वागत, उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक यांनी परियच आणि डॉ. मेधाविनी वाटवे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0