इराणी महिलांचे स्वातंत्र्य!

25 Aug 2022 20:43:38

iran
 
  
तिने ट्रेनमध्ये महिलांशी वाद घातला. ‘हिजाब’ घालणार्‍या महिलांशी तिने ‘हिजाब’वरून वाद घातला होता. वाद घालताना तिने ‘हिजाब’ परिधान केला नव्हता. तिला पोलिसांनी पकडले. तिच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून, देशविरोधी विचार पसरवला, असा गुन्हा तिच्यावर दाखल झाला. तिला बहुतेक 16 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होणार. हे कुठे घडत आहे, तर इराणमध्ये आणि ती ‘हिजाब’च्या विरोधात विधान करणारी महिला आहे. इराणी कलाकार लेखिका सेपदेह रोश्नो. इराणी महिलांना ‘हिजाब’ घालणे अनिवार्य आहे.
 
 
इराणी महिला फुटबॉल वगैरेसारखे प्रत्यक्ष खेळ मैदानात बसून पाहू शकत नव्हत्या. सहर खेडियार हिच्या आत्महत्यतेने थोडी सवलत मिळाली. (मॅच पाहायला मिळावी म्हणून सहर मैदानात पुरुषांचा वेश करून गेली. तरीही तिला पोलिसांनी पकडले. तिला सहा महिन्यांची शिक्षा झाली. दुःख आणि संतापाने तिने आत्महत्या केली होती.) इराणी महिलांना कितीही त्रास असला तरी घटस्फोटाचा अधिकार नाही. तिला नोकरी करायची असेल, तर तिच्या पतीच्या संमतीचे पत्र आवश्यक आहे. तसेच, इथे नसबंदी किंवा गर्भनिरोधक पर्यायांना बंदी आहे. कारण,महिलांनी मुलांना जन्म द्यावा हेच तिचे इतिकर्तव्य. इथे कायद्याने मुलाचे लग्नासाठीचे वय 15 तर मुलीचे वय 13 आहे.
 
 
गेल्या काही महिन्यांत इराणने महिलांसाठीचे 33 ब्युटी हेअर सलोन बंद केले, तर 1700 महिलांना ‘हिजाब’ घातला होता की नाही, या चौकशीला सामोरे जावे लागले. महिला ‘हिजाब’ आणि इतर वर्तणूक देखरेख करण्यासाठी काही वर्षांपूर्वी इराणमध्ये सात हजार पोलिसांची भरती करण्यात आले होते.
 
 
या इराणमध्ये रोश्नोला सजा व्हावी हे काही नवीन नाही. मसिह ऐलिनजेद नावाच्या महिलेनेही ‘हिजाब’ला विरोध केला तेव्हा तिला इराण सोडून लंडनचा आश्रय घ्यायची वेळ आली, तर इराणची आंतरराष्ट्रीय सॉकर खेळाडू शिवा आमिन या सॉकर खेळाडूने स्वित्झर्लंड येथे खेळताना‘हिजाब’ घातला नाही म्हणून तिला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. तिला कुठेही नोकरी मिळत नाही. मोनिरेह, यासमैन और मोजगन या तीन युवतींना 30 वर्षांचा तुरूंगवास झाला का? तर त्यांनी ट्रेनमध्ये नृत्य केले, तर इराणमध्ये महिलांसाठी कडक कायदे. ‘हिजाब’ घातला नाही म्हणून रोश्नोला देशासाठी धोकादायक व्यक्ती म्हणून घोषित केले यातच सगळे आले. रोश्नोला पोलिसांनी पकडले. त्यानंतर सरकारने तिला इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवर देशाची माफी मागायला सांगितले.
 
 
 
‘हिजाब’च्या विरोधात असलेल्या रोश्नानेे त्यानंतर काही दिवसातच ‘हिजाब’ घालून समाजमाध्यमांवर देशाची माफीही मागितली. तेव्हा तिच्या डोळ्याखाली मारण्याचे वळ होते. तिला खूप मारहाण झाली असेल असे दिसत होते. असो. इराणमध्ये रूढीवाद्यांकडून आणि त्यांचा वरचष्मा असलेल्या प्रशासनाकडून ‘हिजाब’ आणि शुद्धता यावर भर दिला जातो. त्यासाठी 12 जुलै हा दिवस इराण प्रशासनाने ‘हिजाब’ आणि पवित्रता दिवस म्हणून घोषित केला. मात्र, यावर्षी इराणमध्ये बहुसंख्य स्त्री आणि पुरूष याच 12 जुलै रोजी ‘नो हिजाब’ म्हणत आक्रमकपणे रस्त्यावर उतरले.
 
 
 
12 जुलै ते आजतागायत हा लढा सुरूच आहे. स्वातंत्र्य हे काही बुरखा, हिजाब घातला किंवा घातला नाही, यावर अवलंबून नाही, तर कुणी काय कपडे घालावेत याचे कायदेशीर बंधन असणे ही भावनाच स्वातंत्र्याला कैद करणारी आहे, असे इराणी युवतींचे म्हणणे. इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, ‘हिजाब’घालण्याची जबरदस्ती ही कधीही इराणची संस्कृती नव्हती. हे तर तालिबानी, इसिस, बोको हराम इत्यादी दहशतवादी संघटनांनी महिलांवर थोपवलेले नियम आहेत. यावर इराणचे इमाम अयातुल्ला अहमद खतामी यांचे म्हणणे आहे की, “महिला ‘हिजाब’बद्दलच्या कायद्याचा विरोध करते, तर ते पाप आहे. चोरी किंवा गबन करण्याइतके पाप आहे. हे अल्लाच्या विरोधात आहे.”
 
 
 
इराणमध्ये ‘हिजाब’वरून उठलेले वादळ इराणी जनतेमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याची चेतना जागवत आहे. तसेही कुणाचेही स्वातंत्र्य मग ते व्यक्तीचे असो की देशाचे, ते स्वातंत्र्य एखाद्याच्या पोषाखावर कसे अवलंबून असू शकते? या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातली ती ‘हिजाब गर्ल’ आणि तिचे समर्थक आठवता ते. इराणमधल्या मुस्लीम महिलांच्या ‘हिजाब’ विरोधी लढ्याबद्दल त्यांचे मत काय आहे?
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0