युवकांचा करिअर पर्याय : कल आणि उकल

    25-Aug-2022
Total Views |

cr
 
 
‘आऊटलुक-तोलुना’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच विद्यार्थी युवकांचा करिअर-कौल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या निमित्ताने ‘करिअर’ या युवकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा प्रतिसाद जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून, त्यातून पुढे आलेले मुद्दे हे केवळ विद्यार्थी-युवकच नव्हे, तर शिक्षक-पालक व प्रशासक नियोजनकार या सार्‍यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरतील. त्याविषयी...
 
 
व्यापक संदर्भात करण्यात आलेल्या या युवक करिअर पर्याय विषयक सर्वेक्षणात प्रामुख्याने आढळलेली बाब म्हणजे, प्रतिसाद देणार्‍या सुमारे 90 टक्के विद्यार्थ्यांनी स्टार्टअपसह उद्योजकतेला आपली पहिली पसंती दिली आहे. युवकांचा हा नवा कल असण्याचे मुख्य कारण उद्योग- व्यवसायासह लघु उद्योजक व स्टार्टअप क्षेत्राला आलेले आश्वासक ‘अच्छे दिन’ व त्यामध्ये स्वयं रोजगारासह नोकरी-रोजगाराला मिळू शकणारे प्रोत्साहन, ही मुख्य कारणे असल्याचे उपलब्ध प्रतिसादावरून दिसून येते.
‘तोलुना’ने ‘आऊटलुक’च्या सहकार्याने केलेल्या या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश हा सद्यःस्थितीतदेशांतर्गत युवक शिक्षणाशिवाय रोजगाराचा कशा प्रकारे विचार करतात, याची अभ्यासपूर्ण पडताळणी घेणे व सर्वेक्षणातील मुद्दे आणि विद्यार्थी- युवकांना नोकरी-रोजगाराच्या संदर्भात वाटणारे जिव्हाळ्याचे प्रश्न सर्व संबंधितापुढे मांडणे हा होता.
 
 
त्यादृष्टीने राजधानी दिल्लीशिवाय मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, जयपूर, लखनऊ व इंदोर या शहरांचा समावेश या सर्वेक्षणात करण्यात आला. सर्वेक्षणात वरील शहरांशिवाय निवडक 40 शहरांमधील 1,804 विद्यार्थी-युवकांना प्रतिसाद दिल्याने त्याला राष्ट्रीय स्तरावर प्रातिनिधिक स्वरुप प्राप्त झाले होते.
 
 
सर्वदूर व विविध ठिकाणांवरील विद्यार्थी युवकांपर्यंत पोहोचून त्यांचे नेमके करिअर-मनोगत जाणून घेण्याच्या उद्देशाने ऑनलाईन-संगणकीय पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष प्रश्नावलीत 18 ते 35 वर्षे वयोगटातील युवकांसाठी शिक्षणाशिवाय रोजगार-स्वयंरोजगार-नोकरी, त्यासंदर्भातील प्राधान्य, त्यासाठीची कारणे या आणि यांसारख्या प्रश्नांवर मोकळेपणाने आपली मते मांडण्यास प्रोत्साहन दिले गेले.
 
 
सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे या युवक रोजगार सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 90 टक्के प्रतिसाद देणार्‍यांनी स्टार्टअपसह स्वयंरोजगाराला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यांच्यादृष्टीने स्टार्टअप हे आव्हानपर क्षेत्र असले तरी ते प्रयोगशील व त्याचबरोबर प्रगतीशील असल्याने ते त्यांचे प्राधान्यक्षेत्र ठरते. यासंदर्भात एवढ्या मोठ्या संख्येत प्रतिसाद देणार्‍यांनी स्वयंरोजगारामुळे आपल्याला खात्रीशीरपणे रोजगार मिळतो व त्याच्याच जोडीला मर्यादित स्वरुपात का होईना, पण रोजगार देण्याची क्षमता लाभते, ही त्यांच्यासाठी विशेेष समाधानाची बाब ठरते.
 
 
याशिवाय स्टार्टअपमध्ये सृजनतेसह कल्पकपणे आपला स्वतःचाव्यवसाय करता येतो, ही आव्हानपर बाब या युवकांसाठी महत्त्वाची ठरते. त्याचप्रमाणे शासन-प्रशासनापासून उद्योग-व्यवस्थापन स्तरापर्यंत सध्या व्यवसाय क्षेत्रातील विशेषतः ‘एमएसएमई’ म्हणजेच लघु-उद्योजक क्षेत्राला जे प्रोत्साहन दिले जाते, त्यामुळे आपल्याला स्वयंउद्योगाची प्रेरणा मिळाल्याचे अनेकांनी नमूद केले आहे.
 
 
आकडेवारीसह सांगायचे म्हणजेे सर्वाधिक म्हणजेच 90 टक्के प्रतिसाद देणारे पूर्व भारतातील होते. त्याखालोखाल ही टक्केवारी म्हणजे उत्तर भारतातून 88 टक्के, दक्षिण भारतातून 89 टक्के, तर पश्चिम भारतातून 88 टक्के अशी होती. स्टार्टअपच्याद्वारे उद्योजकता व स्वयंरोजगाराला प्राधान्य देणार्‍यांची संख्या व टक्केवारीमधील समान सूत्र व प्रमाण याद्वारे राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले.
 
 

cr 
 
 
 
सर्वेक्षणातील विद्यार्थी युवकांच्या वयोगटाच्या संदर्भात उपलब्ध तपशीलानुसार सवार्र्धिक म्हणजेच 92 टक्के युवकांनी स्वयंरोजगाराला प्राधान्य दिले व त्यांचा वयोगट 31 ते 35 वर्षे होता. यावरून सकृतदर्शनी असे स्पष्ट होते की, रुढार्थाने व विशेेषतः शासकीय क्षेत्रातील नोकरीसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा झालेल्या युवकांची स्वाभाविक व मोठ्या संख्येने पसंती ही स्वयंरोजगाराला असते.
 
 
त्यानंतर करिअर प्राधान्य म्हणून स्टार्टअप उद्योेजकतेला प्राधाऩ्य देणार्‍या 26 ते 30 वर्षे वयोगटातील प्रतिसाद देणार्‍यांची टक्केवारी 90 टक्के आहे. 22 ते 25 वर्षे वयोगटातील युवकांची टक्केवारी 89 टक्के, तर सर्वांत कमी म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यातील म्हणजेच 18 ते 21 वर्षे या वयोगटातील विद्यार्थी युवकांनी स्वयंरोेजगार ही आपली करिअर पसंती असल्याचे मत नोंदविले. या संदर्भात महिला व पुरूष प्रतिसाद देणार्‍यांची तुलना करण्यात आली व ती महत्त्वपूर्ण ठरली. एकूण प्रतिसाद देणार्‍यांमध्ये स्वयंरोजगाराला करिअर म्हणून प्राधान्य देणार्‍यांमध्ये महिलांनी पुरूष युवा-उमेदवारांवर आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. 91 टक्के महिलांनी आपली करिअर पसंती उद्योजकता असल्याचे स्पष्ट केले. तुलनेने सर्वेक्षणातीलसहभागी पुरूषांची टक्केवारी होती 88 टक्के. हा तपशील अनेकार्थांनी अर्थपूर्ण ठरतो.
 
 
करिअर पर्याय वा प्राधान्य म्हणून स्वयंरोजगारच का, या प्रश्नाला उत्तर देताना सर्वाधिक म्हणजे 43 टक्के प्रतिसाद देणार्‍यांनी स्वयंरोजगाराद्वारे स्वयंरोजगार व त्याचबरोबर काही जणांना नोकरी देण्याचे प्रयत्न करता येतात, ही बाब सर्वाधिक प्रोत्साहन देणारी ठरली. 42 टक्के युवकांना स्वयंरोजगाराद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, आपल्या शैक्षणिक पात्रता व तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करणे 36 टक्के जणांना, 30 टक्के युवकांना स्वयंरोजगार हा चांगल्या अर्थार्जनाचा चांगला पर्याय वाटला आहे, तर स्वतःच्या व्यवसायाद्वारे स्थायित्व मिळणे ही बाब 25 टक्के प्रतिसाद देणार्‍यांना महत्त्वपूर्ण वाटली.
 
 
या करिअर सर्वेक्षणात काही नवीन पैलू नव्या संदर्भात समोर आले आहेत. यातील सर्वात प्रमुख व महत्त्वाची बाब म्हणजे परंपरागत स्वरूपाचे म्हणजेच अभियांत्रिकी तंत्रज्ञान, कायदा क्षेत्र, व्यवस्थापन ,विक्री क्षेत्र यांसारखे कधी नव्या उमेदवारांना सर्वाधिक आकर्षक वाटणारे करिअर पर्याय आता कालबाह्य ठरले आहेत. याउलट स्वयंरोजगार वा उद्योजगतेच्या जोडीला आरोग्य क्षेत्र, क्रीडा व्यवस्थापन, विशेष संशोधन, मनोरंजन क्षेत्र, फॅशन टेक्नॉलॉजी, हे नवे पर्याय युवकांच्या पसंतीचे ठरले आहेत.
 
 
याशिवाय सर्वेक्षणाद्वारे समोर आलेली अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, आजच्या नव्या पिढीतील विद्यार्थी युवकांना माहिती-तंत्रज्ञानाच्या वाढत्या अभ्यास आणि प्रसार-प्रचारांमुळे त्यांच्या अभ्यासक्रम व पात्रतेच्या आधारे करिअरची चोखंदळ निवड करता येते. शिवाय व्यावसायिक व शासकीय स्तरावर स्टार्टअप लघु उद्योगांना विशेष साहाय्य करण्याचा प्रयत्नांना मिळणार्‍या सकारात्मक परिणामांचा प्रभाव आज युवकांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. युवकांनी स्वयंरोजगाराला दिलेल्या प्राधान्याप्रमाणे ही पण महत्त्वाची कारणे ठरली आहेत.
 
 
 
- दत्तात्रय आंबुलकर