मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १७ ऑगस्ट रोजी, विधानभवनात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ.भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांचा गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी धोंडगे यांच्या पत्नी सौ. प्रभावती, चिरंजीव पुरुषोत्तम यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.विधानसभा अध्यक्ष डॉ. नार्वेकर यांनी श्री. धोंडगे यांच्या कार्याचा उल्लेख करीत शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष डॉ.राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खनिकर्म मंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधिमंडळातील विविध पक्षांचे गटनेते, विधानसभा सदस्य सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे – पाटील, राजेश टोपे, आदित्य ठाकरे, यांच्यासह विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य उपस्थित होते.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. केशवराव धोंडगे यांनी कष्टकरी, कामगार व दिनदुबळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांचा गौरव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "जनतेच्या न्याय हक्कासाठी श्री.धोंडगे यांनी अनेक आंदोलने केली. त्यांनी ‘वंदे मातरम्’ गीताने दोन्ही सभागृहांच्या सत्राचा प्रारंभ व्हावा, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार डिसेंबर, १९९० पासून दोन्ही सभागृहांच्या सत्रांचा प्रारंभ ‘वंदे मातरम्’ गीताने होऊ लागला आहे. मराठवाडा विकासासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करणे, लोहा तालुक्याच्या निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण असावे यासाठीही विशेष प्रयत्न केले. लोहा तालुक्याच्या सीमेवर त्यांनी गुराखीगडाची निर्मिती केली.
‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार’, ‘धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार’, ‘मराठवाडा रत्न पुरस्कार’, ‘भारतीय विकास रत्न पुरस्कार' अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘श्री शिवाजी लोक विद्यापीठ, कल्याण यांनी त्यांना मानद डि. लीट. पदवी प्रदान करुन सन्मानित केले आहे." असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.