‘काँग्रेस छोडो, भारत जोडो?’

    24-Aug-2022   
Total Views |

rg
 
 
2014 पासून ते आज 2022 पर्यंत काँग्रेस पक्षाच्या अधोगतीची अक्षरश: पारायणे झाली. त्यामुळे काँग्रेसची ही अशी खंगलेली अवस्था का झाली, त्याची वेगळी मीमांसा आज करायचे मुळात कारण नाहीच. पण, ‘काँग्रेस छोडो, भारत जोडो?’ या दिलेल्या शीर्षकाप्रमाणेच खुद्द राहुल गांधींनीच अशी रणनीती आखलेली दिसते. त्याचे कारण म्हणजे, एकीकडे काँग्रेस कार्यसमितीची अध्यक्षनिवडीची प्रक्रिया 21 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित असताना, दुसरीकडे राहुल गांधी आणि मंडळींनी ‘भारत जोडो यात्रे’चे आयोजन केले.
 
 
आता ही साडेतीन हजार किमीची यात्राच मुळात 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीपासून सुरू होणार आहे. ही यात्रा जवळपास चार महिने चालेल आणि काश्मीरमध्ये या यात्रेचा समारोप होईल. परंतु, ज्या सप्टेंबर महिन्यात ही यात्रा सुरू होतेय, त्याच सप्टेंबर महिन्याच्या 21 तारखेपर्यंत काँग्रेसने अध्यक्षनिवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा घाट घातला होता. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षनिवडीची प्रक्रिया पुन्हा मुद्दाम लांबणीवर पाडण्यासाठीच तर ‘भारत जोडो यात्रे’चा राहुल गांधींनी घाट घातला नाही ना, अशी शंकेची पाल चुकचुकतेच. कारण, एकीकडे राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारायला कदापि तयार नाहीत.
 
 
दुसरीकडे सोनिया गांधी यांनाही प्रकृती अस्वास्थ्यामुळे आता ही जबाबादारी झेपेनाशी दिसते. प्रियांका गांधींना अध्यक्षपदी बसविण्याबाबत पक्षच कितपत अनुकूल आहे, यावर अद्याप प्रश्नचिन्ह. अशा परिस्थितीत काँग्रेस कार्यसमितीने अध्यक्षनिवडीची बहुप्रतीक्षित निवडणूक घ्यायचे ठरविले, तर बिगरगांधी घराण्याची व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणे, हे खुद्द पक्षावर एकाधिकारशाही गाजवणार्‍या गांधी घराण्याला तरी कितपत रुचेल, हाच खरा प्रश्न! त्यातच दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, सोनिया गांधी त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी आणि त्यांच्या आजारी आईला भेटण्यासाठीही राहुल-प्रियांकासह परदेशात जाणार असल्याचेही वृत्त आहे.
 
 
म्हणजे, एकीकडे अध्यक्षपदाची निवडणूक, दुसरीकडे ‘भारत जोडो यात्रे’चे ‘आंदोलनजीवीं’सोबतचे नाट्य, तिसरीकडे ‘ईडी’च्या कारवाया, हे पाहाता गांधी घराण्यालाच कायमस्वरुपी बिगरगांधी पक्षाध्यक्ष नकोय का? पक्षाध्यक्ष न नेमता, ‘जी-23’ गटाचे पक्षांतर्गत वर्चस्वही वाढू न देता, गांधी घराण्यालाच त्यांच्या ‘रिमोट कंट्रोल’ पद्धतीनुसार आता पक्षही असाच चालवायचा आहे का? यांसारखे प्रश्न उपस्थित होतात.
  
गेहलोत, तुमसे ना हो पाएगा!
 
 
काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नुकतीच भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर सोनिया गांधी यांनी गेहलोतांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याचे निर्देश दिल्याच्या चर्चांनाही एकाएकी उधाण आले. साहजिकच गेहलोतांनी या राजकीय अफवा असल्याचे सांगत या वृत्ताचा साफ इन्कार केला. आता खरंच गेहलोत म्हणतात तेच सत्य मानायचे तर उरलासुरला काँग्रेस पक्ष वाचलाच म्हणायचा की! कारण, अलीकडे अशोक गेहलोत यांचा राजस्थानमधील भोंगळ कारभार, बेताल विधाने आणि गांधी घराण्याच्या पायात लोळण घेण्याची तळवेचाटू वृत्ती बघितली की, त्यांची कीव येते. अशी व्यक्ती काँग्रेसच्या शीर्षस्थपदी विराजमान झालीच तर ‘काँग्रेसमुक्त भारत’ प्रक्रिया अधिक गतिमान होईल, यात तीळमात्र शंका नाही.
 
 
अशोक गेहलोत यांच्या कार्यकाळात राजस्थानमध्ये हिंदू, दलितांवरील अत्याचाराने कळस गाठला. एक नव्हे, तर दोन साधूहत्यांच्या घटनांनी हिंदू समाजही भयभित झाला. पोलिसांचा धाक नसल्याने धर्मांधांनी हिंदूंच्या शोभायात्रांनाही ‘टार्गेट’ केले. पोलिसांचा वचक नसल्याने महिलांवरील अत्याचाराची प्रकरणेही गेहलोत यांच्या काळातच वाढलेली दिसतात. एकूणच भारताच्या पर्यटनाचे एक केंद्र असलेल्या राजस्थानमध्ये अशाप्रकारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून ‘न पधारो मारे देश’ असेच नाईलाजाने म्हणण्याची वेळ तेथील नागरिकांवर आलेली दिसते.
 
 
एकीकडे राज्यात ही अनागोंदी, तर दुसरीकडे सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हा राजस्थानमधील सुप्त सत्तासंघर्षही अधूनमधून उफाळून येतोच. त्यातच भरीस भर म्हणजे अशोक गेहलोत यांच्याकडून स्मृतिभ्रंश झाल्याप्रमाणे केली जाणारी विधाने आणि अजब दावे. त्यामुळे वयाची एकाहत्तरी गाठलेले अशोक गेहलोत हाच जर पक्षश्रेष्ठींपुढे काँग्रेस अध्यक्ष म्हणून पुढील पर्याय असेल, तर या पक्षाचे आधीच अंधारलेले भवितव्य आणखीन काळोखाच्या दरीत ढकलेले जाईल, हे निश्चित. त्यामुळे काँग्रेस पक्ष तरुणांना संधी देणारा असल्याचे मोठाले दावे करायचे आणि दुसरीकडे एका सत्तरी उलटलेल्या सत्तालोलुप नेत्याला अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बाहुल्यासारखे बसवायचे, ही कुणीकडची काँग्रेसनीती? त्यामुळे एवढेच सांगावेसे वाटते की, गेहलोत, तुमसे ना हो पाएगा!
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची