गणेश मुर्तीवर अंडी फेकणारा अब्दुल करीम अत्रू खान गजाआड!

23 Aug 2022 17:03:01
 amrut kala mandal
 
 
मुंबई: मुंबईतील कामाठीपुरा येथील गणेश मूर्तीवर अंडी फेकल्याची संतापजनक घटना घडली असून, त्यानंतर पोलिसांनी अब्दुल करीम नावाच्या समाजकंटकाला अटक केली आहे. रविवारी २१ ऑगस्ट २०२२ च्या रात्री कामाठीपुरा गल्ली क्रमांक १३ मधून काही भाविक बाप्पाची मूर्ती घेऊन जात असताना ही घटना घडली. अब्दुल करीम अत्रू खान उर्फ शाहबाज नावाच्या २५ वर्षीय तरुणाने गणेश मूर्तीवर अंडी फेकल्याचा आरोप आहे.
 
  
मात्र, यादरम्यान त्याचे लक्ष्य चुकले आणि अंडी ज्या ट्रॉलीवरून मूर्ती आणली जात होती, त्याच्या उजव्या बाजूला पडली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला गणपती बाप्पाचा गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सण लवकरच साजरा होणार आहे. यावर्षी ३१ ऑगस्ट रोजी बाप्पाचे घरोघरी व सार्वजनिक मंडळात आगमन होणार आहे. बरेचसे भाविक अथवा सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते १० - १५ दिवस अगोदर बाप्पाची मूर्ती घेऊन जातात. मूर्ती बनवण्याच्या ठिकाणाहून थाटामाटात आणि वाजत गाजत गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जाण्याची परंपरा आहे.
 
 
कामाठीपुरा येथील गल्ली क्रमांक 13 मधील 'अमृत कला मंडळ' गेल्या 34 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो. प्रतिवर्षाप्रमाने यंदाही ते चिंचपोकळी येथून मूर्ती आणत होते. कॉटेज बिल्डिंगजवळून जात असतानाच बाप्पाच्या मूर्तीवर अंडी फेकण्यात आली. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला, पण कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करून कायदा हातात न घेता, त्यांनी तत्काळ पोलिसांना १०० क्रमांकावर फोन करून या कृत्याची माहिती दिली.
 
 
त्यावेळी एक पोलीस अधिकारी दुचाकीवरून जात होता, त्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बोलावून आणले. त्यानंतर नागपाडा पोलिस स्थानकात सदर घटनेची माहिती देण्यात आली, पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व अंडी फेकण्यात आलेल्या घरी त्यांनी चौकशी केली. संबंधित घरात एक महिला आणि एक वृद्ध पुरुष आढळून आले, त्यांनी पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले.
 
 
अखेर पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्यांना आरोपी अब्दुल करीम अत्रू खान घरातील बाथरूममध्ये सापडला. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपले तोंड उघडले व गुन्हा काबुल केला. याप्रकरणी एफआयआर दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की, गेल्या वर्षांत अशी घटना कधीच घडली नाही आणि येथे दोन्ही समाजाचे लोक राहतात. डीसीपी योगेश कुमार म्हणाले की, हा मुद्दा जातीय नव्हता आणि आता परिसरात शांतता आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0