‘एमक्यू-9बी’ ड्रोन खरेदीसाठीची चर्चा पुढील टप्प्यात

23 Aug 2022 12:48:13
MQ-9 Reaper
 
नवी दिल्ली : चीनवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि हिंदी महासागरात पाळत ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या सशस्त्र 30 ‘एमक्यू-9 बी’ ड्रोन तीन अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्यासाठी सुरू असलेल्या अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी पुढील टप्प्यात पोहोचल्या आहेत, असे या घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी नुकतेच सांगितले. सागरी पाळत ठेवणे, पाणबुडीविरोधी युद्ध, क्षितिजाच्या पलीकडचे लक्ष्य भेदणे आणि जमिनीवरील स्थिर लक्ष्य भेदणे अशा विविध भूमिका पार पाडणारे अत्यंत शक्तिशाली ड्रोन तीनही दलांसाठी खरेदी केले जात आहेत.
‘एमक्यू-9 बी’ ड्रोन हे ‘एमक्यू-9’ ‘रीपर’चा एक प्रकार आहे, ज्याचा उपयोग ‘हेलफायर’ क्षेपणास्त्राच्या सुधारित आवृत्तीसाठी केला गेला होता. मागील महिन्यात या ड्रोनच्या मदतीने काबुलच्या मध्यभागी ‘अल-कायदा’चा नेता अयमान अल जवाहिरीचा खात्मा केला होता. संरक्षण क्षेत्रातील अमेरिकेची दिग्गज कंपनी ’अ‍ॅटोमिक्स’ने तयार केलेल्या ड्रोनच्या खरेदीसाठी सर्वोच्च शासकीय पातळीवर चर्चा सुरू असून, हा सौदा फिसकटल्याचे वृत्त फेटाळले आहे. या ड्रोनच्या खरेदीसाठी दोन्ही सरकारमधील चर्चा पुढील टप्प्यात पोहोचली आहे, अशी माहिती ‘जनरल अ‍ॅटोमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक लाल यांनी दिली.
ड्रोनसंदर्भातील खर्चाचा घटक, शस्त्रास्त्रांचे पॅकेज आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाशी संबंधित काही समस्या सोडवण्यावर चर्चेत भर दिला जात असल्याची माहिती आहे. भारत आणि अमेरिकेत एप्रिल महिन्यात झालेल्या द्विमंत्रिस्तरीय चर्चेदरम्यान ’प्रीडेटर ड्रोन’ खरेदीबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. 2020 मध्ये भारतीय नौदलाने हिंदी महासागरात पाळत ठेवण्यासाठी ‘जनरल अ‍ॅटोमिक्स’कडून दोन ’एमक्यू-9 बी’ ड्रोन एक वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. त्यानंतर भाडेतत्त्वाची मुदत वाढवण्यात आली. भारतीय नौदल हिंद महासागर क्षेत्रात चिनी युद्धनौकांकडून वारंवार होणार्‍या चाचण्यांसह चीनच्या वाढत्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आपली देखरेख यंत्रणा मजबूत करीत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0