राजकीय स्वार्थाची जत्रा!

23 Aug 2022 19:44:51

bcy
 
 
मरगळलेल्या काँग्रेसला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी खुद्द युवराज आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी देशव्यापी ‘भारत जोडो यात्रे’ची संकल्पना समोर आणली असून त्यादिशेने तयारीदेखील सुरू केली आहे. जवळपास 3500 किलोमीटर अंतराच्या या यात्रेला कन्याकुमारीपासून सुरुवात होईल. हास्यास्पद म्हणजे, ‘भारत जोडो’च्या नावाखाली या यात्रेतून गुजरात तशीच पूर्वोत्तर राज्ये काँग्रेसच्या नकाशावरच नाहीत. म्हणजे काँग्रेसच्या दृष्टीने काश्मीर ते कन्याकुमारी हा सरळसोट मार्गच काय तो भारत मानावा काय? असो. परंतु, नियोजनाच्या तयारीऐवजी युवराज वेगळ्याच तयारीत गुंतले आहेत.
 
 
नुकतीच त्यांनी सामाजिक आणि गैरशासकीय संस्थांसोबत चर्चा केली. यामध्ये योगेंद्र यादव यांच्या ‘स्वराज इंडिया’ या संस्थेचाही समावेश होता. तसेच, ‘सफाई कर्मचारी आंदोलना’चे बेजवाड़ा विल्सन, ‘योजना आयोगा’च्या पूर्व सदस्या सैयदा हमीद, ‘एकता परिषद’च्या पी. वी. राजगोपाल यांच्यासह जवळपास 150 लोक उपस्थित होते.
 
 
यामध्ये बहुतांशी जण दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि शाहीनबागेतील आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी उठसुट कोणताही मुद्दा घेऊन विरोधासाठी रस्ते अडविणार्‍या सामाजिक आणि राजकीय वातावरण गढूळ करणार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका शब्दात प्रत्युत्तर दिले होते. या सर्वांना ‘आंदोलनजीवी’ची उपमा पंतप्रधानांनी दिली होती आणि आता याच आंदोलनजीवींच्या जीवावर युवराज देशव्यापी ‘भारत जोडो यात्रा’ काढण्याचे दिवास्वप्न पाहत आहे. इकडून तिकडे कोलांडउड्या मारण्यात योगेंद्र यादव आघाडीवर आहेत.
 
 
आता अशीच पार्श्वभूमी असणार्‍या माणसांबरोबर राहुल यांनी चर्चा केल्यानंतर आता पुढे त्या देशव्यापी ‘भारत जोडो यात्रे’चे नेमके काय होणार, हे वेगळे सांगायला नको. त्यात नुसते तोंडाने ‘भारत जोडो’ म्हणायचे आणि ‘कलम 370’ हटविल्यानंतर विरोध, चीनला छुपे समर्थन करायचे. अशा या युवराजांनी अमेठीत पराभव पदरी पडल्यानंतर तिथे तोंड दाखविले नाही आणि आता अशा पलटीबाज ‘आंदोलनजीवीं’च्या बळावर आपली ‘भारत जोडो यात्रा’ यशस्वी ठरेल, असा विचार करणं हा युवराजांचा भ्रमाचा भोपळा आहे. तो फुटेलच. कारण, ही यात्रा नव्हे तर राजकीय स्वार्थासाठीची जत्राच आहे, याच तीळमात्र शंका नाही.
 
 
‘आम आदमी’चे बदनाम घोटाळेे
 
 
सध्या ‘रेवडी कल्चर’चे निर्माते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची मोठी धूम सुरू आहे. अरविंद आणि मनीषबाबूंच्या नवनवीन वक्तव्यांनी सगळीकडे राळ उठवलीय. त्यातच मद्य घोटाळ्याप्रकरणी ‘सीबीआय’ने सिसोदियांच्या घरी धडक दिल्यानंतर तर पळता भुई थोडी झाली आहे. सिसोदियांच्या आणखी एका वादग्रस्त वक्तव्याने ते पुन्हा एकदा टीकेचे धनी झाले आहेत. केंद्रात बसलेले निजाम अरविंद केजरीवालांना घाबरत असून म्हणूनच माझ्या घरावर छापे टाकण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
  
तसेच, माझ्या घरातील कपाटे, गाद्या, रेशनचीही तपासणी केल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे सिसोदियांनी स्वतःच स्वतःलाइमानदार असल्याचे प्रमाणपत्रही देऊन टाकलं. अरविंदबाबूंनी तर त्याहीपुढे जाऊन “दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना अटक केली. ते मागील दोन महिन्यांपासून तुरुंगात आहे. ते भ्रष्ट असते तर मीच त्यांना पक्षातून काढून टाकले असते, पण ते तसे नाही. आता दिल्लीत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील चांगल्या कामांमुळे सिसोदिया यांनाही सरकार तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न करत आहे,” असे म्हटले.
 
 
मद्य घोटाळ्याप्रकरणी घरी छापा पडल्यानंतर सिसोदियांनी भाजपविरोध तीव्र केला आहे. आता तर त्यांनी भाजपने ‘आप’ फोडून पक्षात येण्याची ‘ऑफर’ दिल्याचाही दावा केला आहे. त्यावर कहर म्हणजे केजरीवालांनी सिसोदियांचे शिक्षण क्षेत्रातील काम पाहता त्यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली. आता हे सिसोदियांचे कौतुक होते की त्यांना मारलेला टोमणा, हे खुद्द केजरीवालच जाणो. ‘आप’ने दिल्लीनंतर पंजाबकडे आणि आता गुजरातमध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. मोफत वाटप योजना अर्थात ‘रेवडी कल्चर’चा बागुलबुवा उभा करून केजरीवाल देश काबीज करण्याची दिवास्वप्न पाहत आहे.
 
 
परंतु, आपण किती पाण्यात आहोत, हेही त्यांनी एकदा तपासून पाहायला हवे. कारण, देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी राजकारणात आलेल्या ‘आप’लाच आता भ्रष्टाचाराने घेरले आहे. दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगात आहेत आणि आता उपमुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री सिसोदिया चौकशीच्या फेर्‍यात सापडले आहे. यातचं सगळं आलं!
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0