मुंबई- मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये 22 ऑगस्ट रोजी एक विशेष बैठक झाली. यात मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत चर्चा करण्यात आली. गणेश चतुर्थीच्या पूर्वी मुंबई-गोवामहामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करा असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, २६ ऑगस्ट रोजी ते मुंबई-गोवामहामार्गाची पाहणी करणार असल्यानची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
यावेळी, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार शेखर निकम, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे, साळुंखे सचिव रस्ते, मुख्य अभियंता, सा. बांधकाम, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता छाया नाईक, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, आर.टी. ओ. अधिकारी उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांनी गगनबावडा घाट रस्त्याच्या वारंवार निर्माण होणाऱ्या समस्येकडे आणि मुंबई गोवा-महामार्ग चौपदरीकरणाच्या अपूर्ण कामांकडे लक्ष केले. तर आमदार नितेश राणे यांनी भुईबावडा, गगनबावडा घाट वारंवार कोसळत असल्याने बंद होणारे रस्ते यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची मागणी केली.
महामार्गाच्या प्रलंबित कामाबाबत लक्ष वेधत तसेच ज्या ठिकाणी महामार्गावर अपघात सदृश्य जागा आहेत त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहनधारकांना सूचना मिळण्याकरिता ब्लींकर्स लावण्याची मागणी करण्यात आली. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील या सर्वच सूचनाबाबत तत्काळ गांभीर्याने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.