दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणार्‍या मोहम्मद यासीनला अटक

20 Aug 2022 12:26:52
Terrorist
 
 
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांची विशेष शाखा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दिल्लीतील तुर्कमान गेट येथून एका हवाला एजंटला शुक्रवारी अटक करण्यात आली. मोहम्मद यासीन असे त्याचे नाव असून तो ’लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘अल बद्र’ या दहशतवादी संघटनांना पैसा पुरवत असे. मोहम्मद यासीन याने नुकतेच जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्यास दहा लाख रुपये पुरविले होते.
 
 
दिल्लीतील मीना बाजार येथून काही हवाला एजंट काम करत असल्याची माहिती केंद्रीय यंत्रणांमार्फत दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे दिल्ली पोलीस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकांनी संयुक्तपणे कारवाई करून मोहम्मद यासीन या हवाला एजंटला तुर्कमान गेट परिसरातून अटक केली. चौकशीत मोहम्मद यासीन हा कपड्यांचा व्यापारी असल्याचे भासवून परदेशातून येणारा पैसा जम्मू-काश्मीरमध्ये पाठविण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. पैसा दक्षिण आफ्रिकेतून भारतातील सुरत आणि मुंबई येथे प्रथम पाठविण्यात येत असे. त्यानंतर दिल्लीमार्गे ही रक्कम जम्मू-काश्मीरध्ये दहशतवाद्यांच्या हवाली करण्यात येत असल्याची माहिती यासीन याने दिली आहे.
 
 
अलीकडच्या काही दिवसांत हवालाद्वारे या मोहम्मद यासीनकडे २४ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले होते. त्यापैकी १७ लाख रुपये जम्मू-काश्मीरलाही पाठवण्यात आले. ते पैसे दोन वेगवेगळ्या कुरिअरद्वारे काश्मीर खोर्‍यात पाठवण्यात आले. यापूर्वी अब्दुल हमीद नावाच्या दहशतवाद्यालाही १० लाख रुपये पाठवण्यात आले होते, त्यालाही जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे.
 
 
हवाला जाळे उद्ध्वस्त करण्यावर भर
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आता केवळ दहशतवाद्यांचा खात्मा केला जात नसून, त्यांना अर्थपुरवठा करणार्‍या हवाला ऑपरेटर्सना अटक केली जात आहे. हवाला डाळे उद्ध्वस्त केल्यास खोर्‍यातील दहशतवाद्यांना होणारा रोख पुरवठा थांबेल, असे सुरक्षा यंत्रणांचे मत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0