शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील मैत्रभाव जपणारे ‘शिक्षण विवेक’

    20-Aug-2022
Total Views |

vk
 
2012 साली शिक्षणव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवण्याच्या हेतूने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ‘शिक्षण विवेक’हे मासिक सुरू झाले. गेल्या दहा वर्षांत ‘शिक्षण विवेक’ने विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वाचकांमध्ये एक जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले आहे. साठ हजार वाचकांपर्यंत पोहोचणार्‍या ‘शिक्षण विवेक’च्या दशकपूर्तीनिमित्त या आगळ्यावेगळ्या मासिकाचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
 
भाषा हे समाजाच्या प्रगतीचे अविभाज्य अंग असते. संभाषण, भावना प्रकटीकरण, व्यावसायिक कौशल्ये, संशोधन, सांस्कृतिक आदानप्रदान अशा असंख्य गोष्टींमधे भाषा या मूलभूत घटकाशिवाय सगळी कामे अडू शकतात. पण, भाषेचे हे महत्त्व जाणून भाषाविकासासाठी सातत्याने आणि चिवटपणे काम करणार्‍या मोजक्याच व्यक्ती आणि संस्था आजूबाजूला दिसतात. अशा मोजक्या संस्थांमध्ये ’शिक्षणविवेक’ या मासिकाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
 
 
2012 साली शिक्षणव्यवस्थेत वाचनसंस्कृती रुजवणे, अर्थपूर्ण शिक्षणाला चालना देणे, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी अशा तिन्ही स्तरांवर शिक्षणविषयक जागरुकता निर्माण करणे, असे सकारात्मक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ’शिक्षण विवेक’ची सुरुवात झाली. ‘विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील मैत्रभाव’ असे ब्रीदवाक्य असलेल्या ’शिक्षण विवेक’चे शिक्षक, पालक, विद्यार्थी असे तिन्ही स्तरातले वाचक असतात. सुरुवातीला ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ या शिक्षण संस्थेच्या पनवेल,अहमदनगर, सासवड, बारामती, पिरंगुट अशा विविध ठिकाणच्या शाळा या ’शिक्षण विवेक’च्या सभासद झाल्या.
 
 
 काही पाने लेख, कथा, कविता असा मजकूर आणि उरलेल्या पानांत त्या संस्थेच्या शाळांमध्ये झालेल्या महत्त्वाच्या घटनांचे वृत्त असे ’शिक्षण विवेक’ या अंकाचे स्वरूप असते. ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’च्या शाळांमधून अशा स्वरुपाचा अंक जायला लागल्यावर संस्थेच्या शाळांमधला परस्पर संवाद, निरोगी स्पर्धा आणि मैत्रभाव वाढतोय, असे लक्षात आल्यावर छत्रपती शिक्षण मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, शिक्षण प्रसारक मंडळी, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अशा आणखी पाच संस्थाही ’शिक्षण विवेक’च्या सभासद झाल्या.
 
 
एका संस्थेपासून सुरुवात झालेल्या ’शिक्षण विवेक’ने आता एकूण सहा शिक्षण संस्था आणि 60 हजार सभासद असा पल्ला गाठला आहे. या शिक्षण संस्थांमधील मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांच्या शाळांमध्ये हा अंक जातो. शिक्षक आणि विद्यार्थी अशा दोन्ही माध्यमातून हा अंक घरी जात असल्यामुळे ’शिक्षण विवेक’ आता 60 हजार कुटुंबांचा अविभाज्य सदस्य झाला आहे. या सभासदांमधे कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत येणार्‍या कष्टकरी मुलींची कुटुंबे, छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळेमधली वनवासी कुटुंबे, शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेच्या कोकणातल्या खेड्यापाड्यातील कुटुंबे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधली मध्यमवर्गीय कुटुंबे अशी विविधता आहे.
 
 
‘शिक्षण विवेक’मध्ये राजीव तांबे, संगीता बर्वे, नेहा लिमये, ईशान पुणेकर असे प्रथितयश लेखक आणि विजया वाड, डॉ. श्रुती पानसे असे शिक्षणतज्ज्ञ नियमितपणे मार्गदर्शनपर लिहीत असतात. या दर्जेदार अंकात मूल्यजोपासना, व्यक्तिमत्व विकास, प्रेरणादायी व्यक्तींची चरित्रे, साहित्य, संगीत, चित्रपट यांचा रसास्वाद, तणावमुक्त जीवनशैली, आरोग्यवर्धन, विविध क्रीडाप्रकार, कविता, चित्रकथा, कोडी, व्यंगचित्रे असा रंजक आणि बुद्धीला खाद्य देणारा मजकूर असतो.
 
 
छापील मजकूराबरोबरच विविध उपक्रम हे ’शिक्षण विवेक’चे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. मुळामुठेच्या परिसरातील जैवविविधतेचा परिचय करून देणारा ’नदीसफर’ हा उपक्रम, शेतकरी जीवनातील कष्टांची ओळख करून देणारा भातलावणीचा उपक्रम, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबाबत जागरूकता निर्माण करणारा ’स्पर्श ओळख’, शिक्षण अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी पपेट कार्यशाळा, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी प्रशिक्षण, उन्हाळी शिबिरे, लेखनकौशल्ये वाढवण्यासाठी लेखन, संपादन, जाहिरात लेखन अशी विविध कौशल्ये विकसित करणार्‍या कार्यशाळा अशा अनेक उपक्रमांचा त्यात समावेश आहे.
 
 
दरवर्षी ’मराठी दिना’च्या निमित्ताने ’शिक्षण विवेक’ एक प्रश्नमंजूषेची स्पर्धा घेते. या प्रश्नमंजूषेत ‘मराठी भाषा आणि साहित्य’ या विषयांबरोबरच मराठी चित्रपट, मराठी नाटक, महाराष्ट्रातील सणसमारंभ, महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडी अशा मराठी संस्कृतीचा आढावा घेणारे 50 प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात. या लेखी प्रश्नमंजूषेत सुमारे 55 हजार विद्यार्थी सहभागी होतात.
 
 
’शिक्षण माझा वसा’ पुरस्कार हा ‘शिक्षण विवेक’चा आणखी एक उल्लेखनीय उपक्रम. ‘टी. बी.लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘शिक्षण विवेक’ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमधील शाळांमध्ये कल्पकपणे शैक्षणिक प्रयोग करून अर्थपूर्ण अध्यापन करणार्‍या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार वितरण समारंभात ’शिक्षण विवेक’च्या सभासद असणार्‍या 35 शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक एक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांची जन्मशताब्दी, भावनिक बुद्धिमत्ता, स्वातंत्र्याचा हीरकमहोत्सव असे अनेक वेगवेगळे विषय घेतल्यामुळे हे कार्यक्रम ज्ञान आणि मनोरंजन यांची मेजवानीच असते.
 
 
एकाच वेळी सहा संस्थांचे वेगवेगळे अंक आणि त्यांच्या जोडीने वैविध्यपूर्ण, दर्जेदार उपक्रम सलग दहा वर्षे चालू ठेवण्याचे कौतुकास्पद कार्य ’शिक्षण विवेक’च्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आणि त्यांच्या टीमने अत्यंत कार्यक्षमतेने आणि कल्पकपणे सुरू ठेवले आहे. दहा वर्षे सातत्याने काम केल्यामुळे ’शिक्षण विवेक’च्या कार्याचे सकारात्मक परिणामही आता दिसायला लागले आहेत. ’शिक्षण विवेक’ नियमितपणे वाचणारे विद्यार्थी मोठे होतात तेव्हा त्यांच्या कार्यक्षेत्रात अर्थपूर्ण काम करताना त्यांना ’शिक्षण विवेक’ची आठवण येते.
 
 
मुलांच्या लेखनात होणारे सकारात्मक बदल शिक्षक, पालक ’शिक्षण विवेक’ला आवर्जून कळवतात. एवढेच नव्हे, तर कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा मान्यवर व्यक्ती ’शिक्षण विवेक’च्या सभासद असणार्‍या शाळांत जातात, तेव्हा ’शिक्षण विवेक’ नियमितपणे वाचणार्‍या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, वेगळा विचार करण्याची क्षमता, सादरीकरण, लेखनगुण ही वैशिष्ट्ये त्यांना जाणवल्याशिवाय राहात नाही. विद्यार्थ्यांबरोबरच अनेक शिक्षक आणि पालक ’शिक्षण विवेक’मुळे लिहिते झाले आहेत. ’शिक्षण विवेक’चे हे यश निश्चितच अभिनंदनीय आहे.
 
 
’शिक्षण विवेक’च्या दशकपूर्तीनिमित्त’ ‘शिक्षणविवेक’ने आयोजित केलेल्या काव्य अभिवाचन स्पर्धेत एकूण 343 गटांनी म्हणजेच 1029 स्पर्धकांनी भाग घेतला होता. विंदा करंदीकर, वसंत बापट, शांता शेळके, वि. दा. सावरकर अशा चार कवींच्या कवितांचे सादरीकरण करण्यासाठी या स्पर्धकांनी मूळ कवितासंग्रह वाचून, सादरीकरणाची उत्तम संहिता तयार करून कविता सादर केल्या. या स्पर्धकांमधे काही अंध विद्यार्थीही सहभागी झाले होते.
 
 
विशेष म्हणजे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शाळेतल्या काही कष्टकरी गटातल्या पालकांनीही यात अतिशय उत्साहाने भाग घेतला होता. घरोघरी जाऊन कष्टाची कामे करणार्‍या या स्त्रियांना जिथे पुस्तके वाचणे ही चैन वाटते, तिथे कविता वाचणे ही तर स्वप्नवत गोष्ट होती, त्यांच्या मुलींनीच त्यांना स्पर्धेत भाग घ्यायला लावला, कविता अभिवाचन म्हणजे काय, हे समजावले आणि सादरीकरणासाठी सर्व प्रकारचे प्रोत्साहन दिले. या कष्टकरी महिलांचे सादरीकरण ही ’शिक्षण विवेक’च्या कार्याला मिळालेली पावतीच आहे. मंगेश पाडगावकर म्हणतात,
 
कधी कधी सगळे काही चुकत जाते
नको ते हातात येते
हवे ते हुकत जाते
अशावेळी काय करावे?
सुकलेल्या झाडाला
न बोलता पाणी द्यावे.
‘शिक्षण विवेक’च्या दहा वर्षांच्या वाटचालीने शिक्षणव्यवस्थेला असेच बोलता पाणी दिले आहे. या झाडाची मधुर फळे भविष्यकाळात नक्कीच चाखायला मिळतील याची खात्री वाटते.
 
‘शिक्षण विवेक’ हे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तिन्ही घटकांना सामावून घेणारे मासिक आहे. ‘शिक्षण विवेक’च्या अंकाचे मुखपृष्ठ, अंकातील साहित्य उत्तम असते. सर्वांना लिहिता यावे यासाठी रोजच्या आयुष्यातील सोपे विषय दिले जातात. यंदाच्या वर्षापासून सुरू केलेले ‘विशेष उल्लेखनीय’ सदर खरंच उल्लेखनीय आहे. विशेष उल्लेखनीय पानावर आपले साहित्य प्रकाशित व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा होईल व गुणात्मक वाढ होईल, हे निश्चितच समाधानकारक आहे. विविध स्पर्धा, उपक्रम, शब्दकोडी, ऑनलाईन कार्यक्रम, कार्यशाळा मुलाखत, गप्पाकट्टा, ज्ञानरंजनचे व्हिडिओ अशा विविध विषयांची आणि उपक्रमांची माहिती शाळांना वेळोवेळी दिली जाते. ‘शिक्षण विवेक’ अंकाला वर्धापनदिनाच्या खूप शुभेच्छा
- ऋतुजा गवस, मुख्याध्यापक, विवेकानंद संकुल, सानपाडा
 
 
आजवर ‘शिक्षण विवेक’ने खूप नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यापैकी बर्‍याच उपक्रमांत मीदेखील भाग घेतला आहे. मला सर्वांत जास्त आवडलेला उपक्रम म्हणजे ‘पपेट शो’. मी सहावीत असताना या उपक्रमात भाग घेतला होता. उपक्रमासाठी तीन जणांची मदत गरजेची होती. त्यामुळे माझी मैत्रीण सई, मित्र अंशुल आणि मी असा आमचा एक गट तयार झाला. संवाद लिहिण्याची जबाबदारी माझी होती. ‘पपेट शो’चा विषय कुटुंब असल्याने आम्ही संवादातून एका बेजबाबदार मुलीला तिच्या वडिलांनी जबाबदारीचे भान कसे दिले हे उलगडून दाखवले होते. संवादासाठी आम्हाला चतुर्थ क्रमांकाचे बक्षीसदेखील मिळाले. ‘शिक्षण विवेक’च्या या उपक्रमामुळे मला ‘पपेट’ तयार करता आले. संवाद लेखन करता आले व माझा आत्मविश्वास वाढल्यामुळे ‘शिक्षण विवेक’चा हा उपक्रम माझ्या स्मरणात कायमस्वरूपी राहिला आहे.
- मुक्ता भिरंगे, आठवी, एस.पी. एम. इंग्रजी माध्यम शाळा, पुणे
 
 
‘शिक्षण विवेक’चा आणि आमचा संबंध आला साधारण नऊ वर्षांपूर्वी. दिशा गोळवलकर शाळेत जायला लागल्यापासून त्याचं दर महिन्याला आमच्या घरी आगमन होतंय ते आजतागायत. त्यातील विविध सदरे, माहितीपूर्ण लेख आणि कोडी सगळंच दर्जेदार आहे. तो आल्यानंतर सुरुवातीला मी दिशाला या सगळ्या गोष्टी वाचून दाखवायचे. पण, जसजशी ती मोठी झाली, अंक आल्यावर दुसर्‍याच दिवशी तिने तो वाचून पूर्ण केलेला असतो. कोडी सोडवलेली असतात. अंकाचा दर महिन्याचा विषय रंजक होईल याची काळजी संपादक मंडळ घेताना दिसते. मधल्या काळात तो ऑनलाईन स्वरूपात येत होता, पण त्याची रंजकता बिलकूल कमी झाली नाही. ‘शिक्षण विवेक’ने आयोजित केलेल्या अनेक स्पर्धांमध्ये आम्ही सहभागी होतो. कोरोना काळात तर सांगू का गोष्ट ही ऑनलाईन स्पर्धा आयोजित करणारे ‘शिक्षण विवेक’ हे प्रथम आयोजक होते. त्यानंतर अशा अनेक स्पर्धा झाल्या. ‘शिक्षण विवेक’च्यारूपाने मुलांवर वाचन संस्कार करण्यासाठी पालकांना एक छान मित्र मिळाला आहे हे नक्की!
- दीपा सपकाळ, पालक
 
 - संजीवनी शिंत्रे 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.