दीड महिन्यांपूर्वी सर्वात मोठी ५० थरांची दहीहंडी फोडली : एकनाथ शिंदे

19 Aug 2022 15:59:07
EKNATH SHINDE
 
 
 
ठाणे : दहीहंडी उत्सवाची पंढरी मानली जाणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंबी नाका दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थित असलेल्या गोविंदाप्रेमींना शुभेच्छा देताना "तुम्ही या हंड्या फोडताय,आम्ही देखील सगळ्यात मोठी हंडी  दीड महिन्यापूर्वी पन्नास थर लाऊन फोडली". "तशी आमची हंडी कठीण आणि उंच होती, पण तुमच्या सगळ्यांचा शुभेच्छा आणि स्वर्गीय हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या आशीर्वादाने ही हंडी आम्ही फोडली" असे वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी  ठाकरे गटाला चिमटा काढला.
 
 
हे सरकार शेतकरी,कष्टकरी कामगारांचं त्याच प्रमाणे गोविंदाचे देखील आहे. आपल्या सरकार ने गोविंदासाठी तीन महत्वाचे निर्णय घेतले असून त्यामध्ये दहीहंडी निमित्त सार्वजनिक सुट्टी दिली. दहीहंडी खेळताना गोविंदाचा अपघात झाल्यास खबरदारी म्हणून गोविंदासाठी दहा लाखांचे विमाकवच सरकारने घोषित केले.
 
 
त्याच प्रमाणे प्रो कबड्डीप्रमाणे प्रो गीविंदा ही स्पर्धा पुढच्या वर्षापासून सुरु होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केले. आता गोविंदाचा साहसी खेळत समावेश होणार असल्याने सरकारी नियमाप्रमाणे गोविंदा खेळणाऱ्या मुलांना सरकारी नोकरीचे पाच टाक्यांचे आरक्षण लागू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
 
 
एक दिवस ठाणेकर राज्याचा मुख्यमंत्री व्हावा, असे दिघेंसाहेबांचे स्वप्न होते. दिघेसाहेबांच्या भगिनी अरुणाताई यांनी हे आपल्याला सांगितल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना सांगितले. त्यामुळे दिघेसाहेबांच्या हंडीला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उपस्थित होण्याचे भाग्य लाभले याचा आनंद झाल्याचे सांगताना आता गुहाटीच्या कामाख्य देवीच्या दर्शनाला लवकरच जाऊया, असेही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.
 
 
सगळ्यांनी कोव्हीड आणि स्वाईन फ्यू्ची काळजी घेऊन उत्सव साजरा करा. आता मोठ्या जल्लोषात गणपती उत्सव व नवरात्र उत्सव साजरा करायचा आहे. दोन अडीच वर्ष आपण खूप निर्बंध पाळले. त्यामुळे आपल्या सरकारने सर्व नियम शिथिल केलेत, मंडळांना मंडपांची परवानगी देखील दिलेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
 
त्यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या  बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचे स्वागत करताना त्यांनी मराठीत केलेल्या भाषणाचे  त्यांचे कौतुक करून  श्रद्धा कपूर यांच्या  मातोश्री मराठी कुटुंबातील असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0