"भारताची इंधन सुरक्षा महत्वाची, रशियाकडून होणारी तेल आयात योग्यच"

17 Aug 2022 18:49:38
jayshankar
 
बँकॉक: "भारताची इंधन सुरक्षा आपल्यासाठी महत्वाची असल्याने आपल्याला जर स्वस्त दरात रशियाकडून तेल मिळत असेल तर ते योग्यच आहे" अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. बँगकॉकमधील भारतीय समुदायासमोर ते बोलत होते. यामुळे रशिया - युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. याच भूमिकेमुळे रशिया - युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर निर्बंध घालूनसुद्धा भारत रशियाकडून तेल आयात करतो आहे.
 
 
इंधनांसाठी भारत हा पूर्णपणे आयातीवरच अवलंबून असल्याने भारताला त्यासाठी इतर देशांवरच अवलंबून राहावे लागते. रशिया हा जगातील सर्वात मोठ्या खनिज तेल उत्पादक देशांमधील एक आहे. भारत रशिया यांचे गेल्या ७ दशकांपासूनचे मैत्रीचे संबंध आहेत, त्यामुळे जर ते संबंध लक्षात घेऊन रशिया भारताला स्वस्तात तेल विकत असेल तर ते भारताने का घेऊ नये ? असा सवालही  जयशंकर यांनी विचारला आहे. भारताला महाग तेल परवडणार नाही. म्हणून भारताने हा प्रस्ताव स्वीकारला. 
 
 
रशिया - युक्रेन युद्धात जगातील जवळ जवळ सगळे प्रमुख देश युक्रेनसोबत उभे असताना आशियातील प्रमुख शक्ती असलेला भारताने मात्र तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. या भूमिकेमुळे भारत अनेक देशांकडून लक्ष्य केला जातोय पण भारताला भारतीयांचेही हित बघायचे आहे त्यामुळे भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदीचा प्रस्ताव स्वीकारला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधात आपल्या देशवासीयांची हित बघण्यास भारत प्राधान्य देतो असे जयशंकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0