मुंबई : सातत्याने वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक घटना घडली आहे. देशात सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये घसरण झाली असून सीएनजी ६ तर पीएनजी ४ रुपयांनी स्वस्त झाला आहे. ही दरकपात बुधवारपासून लागू होईल. सरकारने नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा दरकपातीचा निर्णय कंपन्यांकडून घेतला गेला आहे. आता सीएनजीची सुधारित किंमत ८० रुपये प्रतिकिलो असणार आहे.
८ लाखांहून अधिक सीएनजी वाहने असणाऱ्या मुंबईकरांसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. घरगुती वापराच्या गॅसच्या खर्चातही १८ टक्क्यांची कपात होणार आहे . त्यामुळे सर्वच ग्राहकांकडून या दरकपातीचे स्वागत होत आहे. मुंबईतील सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांची संख्याही खूप जास्त आहे, गेल्या ऑगस्ट पर्यंत सातत्याने वाढत असणाऱ्या सीएनजीच्या दरांमुळे, रिक्षांच्या कमान भाड्यात वाढ करावी अशी मागणी रिक्षा चालकांकडून करण्यात येत होती पण आता ती भाडेवाढीची वेळ तूर्तास तरी टळली आहे.