लोकहो, २५ वर्षे धीर धरा!

16 Aug 2022 21:45:38
sanjay raut & mkishori pednekar
 
 
ताईंचे सख्खे बंधू शोभावे, असे संजय राऊत सध्या उपलब्ध नसल्याने दररोज सकाळी रंगणारी ती पत्रकार परिषद लुप्त झाली. त्यात मोठ्या साहेबांचे फेसबुक लाईव्हसुद्धा सातत्याने येत नाही. महाराष्ट्राने कोणाच्या तोंडाकडे पाहावे? काय एकावे? तर रूको जरा.. ताई आहेत ना! उद्धव साहेब, संजय साहेबांपेक्षाही लोकप्रिय विधान करणार्‍या आपल्या किशोरीताई पेडणेकर. त्या म्हणाल्या, “मुंबईतील शिवसेना भवनात ५०व्या स्वातंत्र्य दिनाला बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले होते. ७५व्या स्वातंत्र्य दिनाला उद्धव ठाकरे यांनी ध्वजारोहण केले. आता स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन शिवसेना भवनात झेंडावंदन करतील, हे लिहून ठेवा.”
 
 
किशोरीताईच त्या, त्यांनी काहीही म्हंटले तरी त्यावर चर्चा तर होणारच. यावर नेहेमीच्या नतद्रष्टांचे म्हणणे आहे की, ताई हे म्हणत असताना दिवा फडफडला होता का? हो, यावरूनच तर ताई ओळखतात की, निर्णय चांगला की वाईट. असो. किशोरीताईंच्या या भविष्यवाणीवर महाराष्ट्राने आकडेमोड करून प्रश्न विचारला आहे की, आदित्यसाहेब दिल्लीहून इकडे येतील तेही २५ वर्षांनंतर? इतका मोठा कालावधी? या कालवधीत पाच निवडणुका सहज होतील.
 
 
म्हणजे दिल्लीहून साहेब इथे यायला २०४७ साल उजाडायची आम्हा मराठी माणसाने वाट पाहायची? तसेच, ताईंच्या या विधानावर सर्वसामान्य मराठी माणूस संभ्रमित आहे. कारण, ताईंचे नेते तर ‘दिल्लीपुढे झुकेगा नही, वाकेगा नही...’ असलं काही बोलत असतात. इतकेच नव्हे, तर दिल्लीहून अफजुल्या, औरंग्या वगैरे येतात असेही त्यांचे नेते म्हणतात. मग असल्या भयंकर दिल्लीत आदित्यराजेंना पाठवायचा ताईंचा मनसुबा का असावा? काहीही म्हणा ताईंच्या विधानांनी काही वर्षांपूर्वीच्या स्मृती जागृत झाल्या.
 
 
२०१९ साली टेक्सास येथे ‘हाऊडी मोदी’ हा अतिशय भव्य कार्यक्रम झाला. सेना-भाजपमध्ये नवा वाद सुरू होता. त्यावेळी आदित्य ठाकरे हे आमदारकीची निवडणूक लढवणार जाहीर सभा झाली. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, भविष्यात ”मिस्टर ट्रम्प आपल्याला (म्हणजे आदित्य ठाकरेंना) प्रचारासाठी बोलावतील. मग आम्ही म्हणू ‘हाऊडी आदी.” ‘हाऊडी आदी’ या संकल्पनेचे काय झाले माहिती नाही, पण आता किशोरीताईंच्या म्हणण्याची सत्यता पटवायला आणखीन २५ वर्षे वाट पाहावी लागणार आहे. तेव्हा, धीर धरा लोकहो...धीर धरा!
 
 
बालकाच्या मृत्यूचे दुःख
 
 
राजस्थान जालौरमध्ये एका शिक्षकाने नऊ वर्षांच्या विद्यार्थ्यांला इतकी मारहाण केली की, त्यामध्ये या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्यार्थी अनुसूचित जातीचा होता. त्याने पाण्याच्या मडक्याला हात लावला म्हणून त्याला शिक्षकाने मारहाण केली. मानवतेला काळीमा फासणार्‍या या घटनेचे पडसाद देशभर उमटले. आजही देशात अशा प्रवृत्ती आहे हे खेदजनक आहे. मात्र, देशविघातक मानसिकतेच्या काही लोकांनी या घटनेचा संबंध थेट देशाच्या स्वातंत्र्याशी जोडला.
 
 
त्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षालाच ‘मृत स्वातंत्र्य’ घोषित केले. बालकाच्या मृत्यूच्या दुःखापेक्षा केंद्रात भाजप सरकार असताना ही घटना घडली म्हणून त्यांना जणू आनंद झाला. त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट केले- ”स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे
बडवा रे ढोल ढोंगी *व्यांनो” खरे तर बालकाच्या मृत्यूचे दुःख आहेच. पण, ते दुःख व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आणि त्या स्वातंत्र्याचा अभिमान आनंद असलेल्या करोडो भारतीयांना ढोंगी म्हणण्याचे स्वातंत्र्य या तथाकथित ढोंग्यांना कोणी दिले?
 
 
जातपात धर्म, वर्ग, वर्ण, प्रांत, भाषा हे सगळे लांघून भारतीय म्हणून एक आहोत, ही भावना ‘हर घर तिरंगा’ अभियानाने भारतीयांमध्ये जागरुक केली. हे शल्य ‘तुकडे तुकडे गँग’च्या जिव्हारी लागले. त्यांनी स्वातंत्र्याला शिवीगाळ केली. मात्र, राजस्थानच्या गेहलोत सरकारबद्दल अळीमिळी गुपचिळी राखली. एकंदर बालकाच्या मृत्यूचे भांडवल करण्यासाठी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ इच्छा असणारी ‘डफली गँग’ सक्रिय झाली. याचा अर्थ बालकाच्या मृत्यूचा धिक्कार करू नये का? तर तो सर्व समाजातून व्हायलायच हवा.
 
 
मात्र, हे करत असताना दोन समाजात तेढ माजवत, देश आणि संपूर्ण समाजाला अपराधी ठरवण्याचा प्रयत्न करणे योग्य नव्हे. जातीभेदाच्या मानसिकतेतून बालकाचा खून करणार्‍या गुन्हेगाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात्मक कायद्यामुळे सजा होईलच. संविधानावर करोडो भारतीयांचा विश्वास आहे. सदासर्वकाळ देशाविरोधात गरळ ओकणार्‍यांना बाबासाहेबांचा कायदा काय कळणार? त्यामुळेच तर ते बाबासाहेबांना प्रिय असलेल्या भारत देशाला आणि भारतीय स्वातंत्र्याला शिवीगाळ करत आहेत. तुर्तास बालकाच्या मृत्यूचा संताप आणि दुःख यामुळे माझे तरी शब्द स्तब्ध आहेत..
 
 
Powered By Sangraha 9.0