येत्या २४ तासात मुंबईला येल्लो अलर्ट; तर पुणे,नाशिक, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा!

16 Aug 2022 16:59:05
paus
 
 
मुंबई:  भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) येत्या २४ तासात मुंबईसाठी 'यलो' अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सूचित केले आहे. मुंबईत मंगळवारी दि. १६ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसह मध्य रेल्वेच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. तसेच शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.
 
 
मुंबईत येत्या आठवड्यात ‘अति मुसळधार पाऊस’ पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. दि. १७ ऑगस्ट मुंबई 'येल्लो’ अलर्टवर राहणार असून, पालघर जिल्हा ‘ऑरेंज’ अलर्टवर राहणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुणे,नाशिक, रायगड, सातारा, पालघर, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. दुपारी जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. मुंबईच्या मुलुंड पूर्वेतील नाणेपाडा येथे सोमवारी सायंकाळी ७.४६ वाजता एका मैदानाचे आणि दुमजली इमारतीचे पहिल्या मजल्यावरील छत कोसळून दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइनला दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0