देशात महागाई ओसरतेय! केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर

16 Aug 2022 18:31:30

sabji
 
 
नवी दिल्ली : कडकडून तापलेल्या तव्यावर पाणी ओतले की जशी होणारी आग कमी व्हायला लागते, तशीच गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या महागाईने पोळून निघालेल्या सामान्य जनतेच्या दुःखावर दिलासादायक फुंकर घालणारी बातमी आली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील महागाईचा भर आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे. देशातील घाऊक किंमत आधारित निर्देशांकाने पाच महिन्यांची नीचांकी पातळी नोंदवत १३.९३% टक्क्यांवर घसरला आहे.
 
 
जून महिन्यात १५.१८% इतका असणारा घाऊक किंमत आधारित निर्देशांक जुलै महिन्यात पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. भाज्या, फळे, दूध यांच्या दरांत झालेल्या घसरणीमुळे हे चित्र दिसत आहे. जरी घाऊक किंमत निर्देशांकात घसरण झालेली असली तरी इंधनाच्या चढ्या किंमती, औषधे, स्वयंपाकाचा गॅस यांच्या किंमतीत होणारी वाढ ही अजूनही चिंतेचीच बाब आहे असेही वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
 
 
"गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी झालेली इंधन, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यान्नांच्या किंमतीत झालेली वाढ यासर्वांच्याच किंमतीत वाढ झालेली होती. याचमुळे देशातही महागाईचा दर वाढतच राहिला. अजूनही काही क्षेत्रातील महागाई हा चिंतेचा विषय असला तरी येत्या काळात त्यांतही उतार पडेल" असे स्पष्टीकरण वाणिज्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0