‘स्मार्टनेस’ आणि चलाखी

15 Aug 2022 21:56:46
smartness
 
आईन्स्टाईनही हुशार आणि ‘स्मार्ट’ व्यक्ती होती. त्यांनी एक महत्त्वाचे तत्त्व सांगितलं आहे की, जर माझ्याकडे जगाला वाचवायला एक तास असेल, तर 55 मिनिटे मी समस्येची व्याख्या करण्यास देईन आणि पाच मिनिटे उपाय शोधण्यात घालवीन. या विधानावरून समस्या सोडवणार्‍या चाणाक्ष लोकांच्या दृष्टिकोनाबद्दल कल्पना येते. कुठल्याही समस्येचे निराकारण करण्याआधी हे लोक त्या समस्येच्या मूळ कारणाचे योग्य विश्लेषण करतात. वर वर्णन केलेले गुण मुळात आयुष्याच्या अनुभवातून शिकावे लागतात आणि मगच तुम्ही स्वतःची ‘स्मार्ट’ वा चलाख आवृत्ती बनवू शकता.
 
 
आपल्याला एक गोष्ट नक्की समजते, ती म्हणजे चलाख लोकांमध्ये काहीतरी आहे. आपण आपल्या शाळा महाविद्यालयात ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून गौरवलेले लोक पाहिले आहेत. त्यांना कायम ‘ए ग्रेड’ मिळते, ते क्रिकेट टीमचे कर्णधार असतात. त्यांना गाणेही छान गाता येते. आपल्या नोकरीच्या ठिकाणीसुद्धा एखादा ‘स्टार’ असतोच. त्यांचे प्रकल्प वेळेत पूर्ण झालेले असतात. त्यांना छान छंद असतात. आस्थापनेचा त्यांच्यावर विश्वास असतो. त्यांना बढती वेळेत मिळत असते. त्यांचा एकंदरीत अंदाज पाहता ते यशस्वी आणि महत्त्वाकांक्षी असतात. आपल्या घराशेजारील, आपल्या बरोबरीची मैत्रीण खूप हुशार असते. तिला सगळे व्यावहारिक प्रश्न व्यवस्थित विचारता येतात. ती आपली हाती घेतलेली गोष्ट पूर्णत्वाला नेते.
 
 
तिची प्रेरणा जबरदस्त असते. ती बोलता-बोलता सुज्ञपणे अनेक गोष्टी करते. छोटासा उद्योगधंदा खूप आत्मविश्वासाने चालू करते खरी, पण तो हवा तसा चालत नाही. पण, या अपयशाने ती काही खचून जात नाही. ती पुन्हा त्याच आत्मविश्वासाने नव्याने सुरुवात करते आणि तिचा उपक्रम खूप यशस्वी होतो. ती तशीच असते, सकारात्मक आत्मविश्वासाने ओतप्रेत भरलेली.
 
 
मग, तुम्ही स्वत:कडे पाहता. आपण जे काही काम करत आहोत, त्यात इतके काही म्हणावे तसे यश आलेले दिसत नाही. तुम्ही तुम्हाला आवडत नाही, रस नाही, अशा नोकरीत अडकून राहिले आहात.गेल्या पाच-सहा वर्षांत तुमच्या मनाला आवडेल, अशी नोकरी तुम्ही करत नाही आहात. करिअर कधी समृद्ध झालेच नाही तुमचे. खरंतर तुम्हालाही मनातून नव्या, ‘स्मार्ट’ लोकांच्या परिघात जायचे असते.
 
 
आपल्या आळसावलेल्या जीवनशैलीतून तुम्हाला बाहेर पडून गतिशील बनायचे आहे. मग, तुमच्या मनात अनेक प्रश्न दाटून येतात. एक प्रश्न नेहमीच येतो की, मी ‘स्मार्ट’ का नाही? माझ्याबरोबरचे लोक इतके हुशार कसे झालेत? त्यांच्यात इतकं विशेष काय आहे? कसे काय ते इतक्या गोष्टी साध्य करू शकतात? मला ते का जमत नाही?
 
 
आपला बुद्ध्यांक जास्त असणे म्हणजे ‘स्मार्ट’ हे मिथक आहे. अनेक लोक जे ‘बुद्धिबळ चॅम्पियन्स’ आहेत, ‘संगणक हॅकर्स’ आहेत, विलक्षण ‘पियानो टॅलेंट’ असलेले आहेत, आपण त्यांना हुशार, बुद्धिवादी मानतो, पण ‘स्मार्ट’ असणे आणि त्याचा वापर व्यवहारात करता येणे, यात फरक आहे. ही ‘स्मार्ट’ माणसे उत्सुक असतात. प्रत्येक गोष्टींवर त्यांना प्रश्न पडतो. आहे त्यात समाधानी असण्यापेक्षा पुढच्या वळणावर काय असू शकेल, हा प्रश्न त्यांना पडतो.
 
 
नवीन गोष्टीचा वेध त्यांना घेत राहायचा असतो. सर्व काही आहे, अशावेळी चलाखी दाखवणे अगदी सोपे असते, पण सर्व काही सपाट होते, तेव्हा तुम्ही कसा धीर धरता आणि सगळ्या कठीण गोष्टींचे आकलन करून त्वरित आणि ज्ञानाचा उत्तम वापर करुन परिस्थितीतून बाहेर पडायची क्षमता या ‘स्मार्ट’ लोकांमध्ये दिसून येते, ज्या लोकांना तुमच्या इतक्याच क्षमतेने संकल्पना समजत नाही, अशा लोकांना आपल्या ज्ञानाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यापेक्षा त्यांना ज्ञान देणार्‍या, शिकवणार्‍या व्यक्ती ‘स्मार्ट’ असतात. यामुळे तुम्ही केवळ चांगल्या व्यक्ती बनता असे नाही, तर तुमच्या मेंदूचे प्रभुत्व वाढीस लागते.
 
 
‘स्मार्ट’ लोकांना शिकण्याची भूक असते. शिकण्याचा फायदा ते स्वतःच्याप्रगतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने करतात. या व्यक्ती अनेक पुस्तके, मासिकांची सदस्यता, ब्लॉग, ऑनलाईन नवीन अभ्यासक्रम इत्यादीमध्ये गुंतलेले आढळतात. ते त्यांच्या मेंदूच्या पेशी धारधार करण्यात मग्न असतात.
 
  
आयुष्यातील अनेक गोष्टींवर काही नवनवीन प्रयोग करत राहणे ‘स्मार्ट’ लोकांचं वेगळेपण सिद्ध करतं. ठराविक पातळीवर जोखीम घ्यायला त्यांना आवडतं. वर्गात एखादं उत्तर चुकीचं ठरू शकतं, याचा अंदाज असूनही हात वर करणार्‍या मुलांना ‘स्मार्ट’ म्हणता येईल. एखादी नवी संकल्पना मांडून काहीतरी नवीन ‘प्रॉडक्ट’ बाजारात आणणारी मंडळी या वर्गात मोडतात. आपल्या आयुष्यातील कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे या व्यक्तींना कळते आणि त्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
 
 
 काय महत्त्वाचे आहे आणि काय करणे आवश्यक आहे, याचे नियोजन ते करतात आणि यासाठी वेळेचा सदुपयोग ते करतात. आपली शक्ती कोणत्या वेळी कुठे अणि कशी गुंतवायची, हे ते चिन्हांकित करतात. हा सूज्ञपणा या ‘स्मार्ट’ लोकांना उंचीवर घेऊन जातो.
 
 
तुम्ही जर महान व्यक्तींना भेटत असाल, तर तुमच्या एक लक्षात येते की, ते खूप चांगले श्रोते आहेत. त्यामुळेच खरेतर ते उत्तम नेते बनतात.
 
आईन्स्टाईनही हुशार आणि ‘स्मार्ट’ व्यक्ती होती. त्यांनी एक महत्त्वाचे तत्त्व सांगितलं आहे की, जर माझ्याकडे जगाला वाचवायला एक तास असेल, तर 55 मिनिटे मी समस्येची व्याख्या करण्यास देईन आणि पाच मिनिटे उपाय शोधण्यात घालवीन. या विधानावरून समस्या सोडवणार्‍या चाणाक्ष लोकांच्या दृष्टिकोनाबद्दल कल्पना येते. कुठल्याही समस्येचे निराकारण करण्याआधी हे लोक त्या समस्येच्या मूळ कारणाचे योग्य विश्लेषण करतात.
 
वर वर्णन केलेले गुण मुळात आयुष्याच्या अनुभवातून शिकावे लागतात आणि मगच तुम्ही स्वतःची ‘स्मार्ट’ वा चलाख आवृत्ती बनवू शकता.
 
 
 
डॉ.शुभांगी पारकर  
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0