कातकरी समाजाच्या उत्थानासाठी...

15 Aug 2022 20:09:20
manasa
 
 
शेतमजुरी, वीटभट्टी स्थलांतर या चक्रातच आयुष्य होरपळणार्‍या कातकरी समाजाच्या उत्थानासाठी सर्वंकष प्रयत्न करणारे रवींद्र नागो भुरकूंडे यांच्या कार्यविचाराचा घेतलेला मागोवा...
 
 
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. देशाच्या सर्वोच्चपदी आमच्या द्रौपदी मुर्मू विराजमान आहेत. हा आम्हा समाजबांधवांचा मोठा गौरव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून वनवासी समाजाला ‘घरकुल योजने’चा मोठ्या प्रमाणात लाभ झाला. समाजासाठी अनेक योजना निर्माण झाल्या. त्यामुळे समाजात सकारात्मक बदल झाला,” रवींद्र भुरकूंडे सांगतात. रवींद्र भुरकूंडे यांची ‘लोकविकास मंडळ’ नावाची सामाजिक संस्था आहे. त्याद्वारे ते परिसरातील कातकरी समाजातील विद्यार्थ्यांसाठी हंगामी वसतिगृह चालवतात.
 
 
 
केंद्र सरकारच्या आदिवासी विभागातर्फे ‘ट्रायबल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ सुरू आहे. त्या माध्यमातून ते कातकरी समाजाच्या विविध प्रश्नांवर संशोधन करतात, समाजातील समस्या सोडवण्यासाठी कार्य करतात. या विभागातर्फे ते कातकरी शिक्षण आणि विस्थापन या आयामात सक्रियपणे कार्यरत आहेत. तसेच कातकरी समाज बांधवांचा बचत गट तयार करून त्याद्वारे त्यांना विविध स्वयंरोजगाराचे मार्ग उपलब्ध करण्यासाठी ते प्रयत्न करतात. अशा काही बचतगटांना वीटभट्टी सुरू करण्यासाठी त्यांनी प्रशासकीय माध्यमातून कर्जही उपलब्ध करून दिले आहे. ‘कातकरी समुदाय : एक ऐतिहासिक अभ्यास (1972 ते 2006)’ या विषयावर रवींद्र पीएच.डी करत आहेत.
 
 
 
रवींद्र वाडा तालुक्यातील सापनी बुद्रुक गावचे कातकरी समाजाचे सुपुत्र. स्वत: अनुभवलेल्या सर्वच वंचिततेचे भांडवल न बनवता त्यातून पुढे-पुढे मार्गक्रमण त्यांनी केले. त्यांचे वडील नागो आणि आई लाडकाय दोघेही कष्टकरी आणि समाजातील इतरांसारखेच गरिबीच्या विळख्यात संसार चालवणारे. ते दोघेही गावात सहा महिने शेतमजुरी करत आणि दिवाळी ते मे महिना रत्नागिरी, रायगड, पनवेल, पुणे येथे वीटभट्टीच्या कामासाठी स्थलांतर करत. सहा महिने ते गावाबाहेरच असत. त्यातच नागो यांना दारूचे व्यसन. पण समाजात हे व्यसन म्हणजे विशेष बाब नव्हती. मात्र, या व्यसनामुळे लाडकाय आणि मुलांना खूप त्रास भोगावा लागला. राब राब राबूनही पैशाला पैसा राहत नसे. कारण, तो दारूमध्ये जात असे.
 
  
अशा काळात रवींद्रचे आजोबा घुर्‍या आणि आजी भागीरथी यांनी मुलांना खूप प्रेम दिले. रवींद्र यांना शाळा शिकायची होती.पण शिकून काय करायचे म्हणून त्यांना शाळेत टाकले नव्हते. नागो आणि लाडकाय त्यांना वीटभट्टीच्या कामावर सोबत नेऊ लागले. रवींद्र यांनी खूप हट्टच धरला, म्हणून त्यांना पुन्हा आजीकडे पाठवण्यात आले. या सगळ्या काळात गरिबीची मार खूप मोठी होती. शिकण्यासाठी दोन नातवंडं सोबत होती. त्यांना खायला काय घालायचे? शेतकर्‍यांनी धान्य काढलं की, परिसरातील उंदीर जमिनीवर पडलेले धान्य बिळात न्यायचे. आजी उंदरांची बिळं शोधायची. त्यातील धान्य काढायची.
 
 
त्याच धान्याचं पीठ बनवून मुलांना खाऊ घालायची. पुढे शाळेत प्रमोद पाटील आणि शांताराम कनोजा हे दोन मित्र लाभले. हे दोघेही रवींद्र यांना खूप जीव लावायचे. या सगळ्या परिस्थितीमध्ये रवींद्र यांनी शाळेत पहिला क्रमांक काही सोडला नाही. त्यामुळे शाळेत शिक्षक त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊ लागले. मात्र, दहावीनंतर पैशांअभावी ते महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकले नाहीत. त्यांनी एक वर्ष हमालीचे काम केले आणि दुसर्‍या वर्षी बारावीची परीक्षा देण्याची तयारी केली. मात्र, त्याचकाळात त्यांना ‘बेस्ट’मध्ये वाहकाची नोकरी मिळाली.
 
 
घरची गरिबी, वृद्ध आई-वडिलांची दुरवस्था, यामुळे रवींद्र यांनी नोकरी स्वीकारली.
पालघर, बोईसर, जव्हारमध्ये काम करताना त्यांना समाजाचे प्रश्न पुन्हा सामोरे आले. आपण शिकलो, वीटभट्टीतून सुटका करून घेतली, पण पालघर आणि परिसरातील जिल्ह्यातील कातकरी समाजातील बहुसंख्य मुलांच्या नशिबी शिक्षण सोडून विस्थापित होणेच होते. हे सगळे पाहून रवींद्र अस्वस्थ झाले. समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी ठोस काम करण्याचे त्यांनी ठरवले. पालक जेव्हा गाव सोडून वीटभट्टीच्या कामाला जात त्यावेळी मुलांनाही सोबत नेत. याचा परिणाम असा व्हायचा की, मुलांचे शिक्षण सुटत असे. यावर उपाय म्हणून रवींद्र यांनी गावातल्या 22 विद्यार्थ्यांसाठी स्वत:च्या घरातच हंगामी वसतिगृह सुरू केले.
 
 
‘बेस्ट’मधील मित्र, समाजातील दानशूर व्यक्ती यांच्याकडून मुलांसाठी रेशन आणि दैनंदिन वस्तूंचे संकलन केले. यासाठी वनवासी कल्याण आश्रमचे चौधरी तसेच आ. विष्णू सवरा आणि त्यांचे पुत्र हेमंत सवरा यांनी सहकार्य केले. या सगळ्या कामात त्यांची पत्नी रेखा यांनी साथ दिली. 2006 साली सुरू झालेले हे वसतिगृह पालघर आणि परिसरातील वनवासी भागासाठी आदर्श ठरले.
 
 
या योजनेवरूनच प्रशासनानेही वनवासी वीटभट्टी मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह सुरू केले. पुढे समाजासाठी पूर्ण वेळ काम करता यावे, म्हणून रवींद्र यांनी ‘बेस्ट’च्या नोकरीला रामराम केला. सध्या ते कंत्राटी स्वरूपात वनवासी प्रकल्पामध्ये काम करतात. या माध्यमातून ते कातकरी समाजाबद्दल संशोधन आणि कल्याणकारी योजना राबवतात. समाजात काही ठिकाणी धर्मांतर होण्याचे प्रकार घडतात. रवींद्र समाजबांधवांना म्हणतात, “दोन-तीन पिढ्यांपूर्वी आपले बापजादे आजच्यापेक्षाही गरीब होते, पण काही पैशांसाठी त्यांनी धर्म सोडला नाही. देवाचा देव महादेवाला विसरले नाहीत.
 
 
पूजापाठ विसरले नाहीत. मग आज आपण का आपला नियम मोडायचा? महादेवाला सोडायचे?” अर्थात, रवींद्र यांना समाजात मान आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे लोक ऐकतातही. त्यांना समाजात आर्थिक सुस्थिती यावी, असे वाटते. शिकलेल्या मुलांच्या हाताला काम मिळावे, बेरोजगारी संपावी, हे त्यांचे स्वप्न आहे. वनवासी परिसरात पारंपरिक उद्योगधंद्यांना गती येऊन समाजाचे उत्थान होईल, अशी खात्री त्यांना आहे. कातकरी समाजाचे उत्थान हे रवींद्र यांचे लक्ष्य आहे. ती लक्ष्यप्राप्ती होणारच...!
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0