वरळीतील मच्छीमारांकडून 'अंबरग्रीस' वनविभागाकडे सुपूर्द

14 Aug 2022 19:36:50
ambergris
 
 
 
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): वरळीतील स्थानिक मच्छीमारानी 'व्हेल' माश्याची 'उलटी' कांदळवन कक्षाकडे सुपूर्द केली आहे. संजय बैकर यांनी आपल्याकडे 'स्पर्म व्हेल' माश्याची उलटी असल्याचे सांगून ती कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली. ही उलटी घन स्वरुपात असून वरळीच्या लोटस जेट्टी बंदरावर, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक विरेंद्र तिवारी यांच्या उपस्थितीत हे 'अंबरग्रीस' (स्पर्म व्हेलची उलटी) ताब्यात घेण्यात आले.
या घन स्वरूपातील उलटीचे तुकडे हे पाण्याच्या प्रवाहातून वाहून आले होते. मच्छीमार लावत असलेल्या बोटीजवळ समुद्राच्या ओहोटीच्या वेळी हे 'अंबरग्रीस' आढळून आल्याचे संजय बैकर आणि अल्लाउद्दीन नियाजखान यांनी सांगितले. कांदळवन कक्षाने या दोन मच्छीमारांकडून ४.२०० किलो अंबरग्रीस ताब्यात घेतले. ही कारवाई कांदळवन कक्षाच्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाई दरम्यान आदर्श रेड्डी, विभागीय वन अधिकारी, कांदळवन कक्ष सुरेश वरक वनपरिक्षेत्र अधिकारी मध्य मुंबई, राकेश बर्मन वन्यजीव कंटोल ब्युरो, धनश्री बगाडे कांदळवन प्रतिष्ठान, भगवान रामचंद्र मोढवे वनपाल, रामदास पुंजाराम सोर वनपाल, कृष्णा हुलप्पा पोले वनरक्षक, रामदास गोपाळ राक्षे वनरक्षक उपस्थित होते
 
 
 
ambergris1
 
 
 
काय आहे अंबरग्रीस?
व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अंबरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अ‍ॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अंबरग्रीस पासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो.
 
 
 
Powered By Sangraha 9.0