सर्व जीवन म्हणजे योग आहे

14 Aug 2022 22:09:35

arbindo
 
कर्म, ज्ञान, आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित ‘पूर्णयोगा’ची मांडणी योगी श्रीअरविंदांनी केली. पूर्णयोग तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयातून, भौतिक जीवनामध्ये दिव्यत्व आणण्याचा प्रयत्न करण्यावर भर आहे. आज महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी श्रीअरविंद यांची जयंती. त्यानिमित्त जाणून घेऊया योगी श्रीअरविंद यांच्या तत्त्वज्ञानात्मक विचार व पूर्णयोगाविषयी...
 
 
सर्व जीवन म्हणजे योग आहे’, हे विधान श्रीअरविंदांच्या तत्त्वज्ञानाचे सारसूत्र म्हणता येईल. भारतामध्ये तत्त्वज्ञानाची एक मोठी परंपरा आहे. ही विचारपरंपरा मायावाद, चिद्विलासवाद या क्रमाने प्रगत होताना दिसते आणि कदाचित त्याचाच पुढील टप्पा म्हणून श्रीअरविंदांच्या ‘पूर्णयोगा’च्या, ‘अतिमानसयोगा’च्या तत्त्वज्ञानाकडे निर्देश करता येणे शक्य आहे. ब्रह्म तेवढेच सत्य आणि हे जगत मिथ्या अशी मांडणी मायावाद करतो, तर हे जगत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एका ‘चित्’चा विलास आहे, या भूमिकेतून चिद्विलासवाद या जगताकडे पाहतो. जगतामध्ये ईश्वराचाच निवास असला तरी जगतामध्ये येताना तो ईश्वर विकारी होऊन उतरतो, आपल्या मूळ रूपापासून विचलित होतो. आपल्याला जग जे अपूर्ण, अंधकारमय, अज्ञानी असल्याचे जाणवते ते त्यामुळेच! पण या पृथ्वीवरच ‘दिव्य जीवन’ शक्य आहे, अशी श्रीअरविंदांची धारणा होती. नव्हे, तो त्यांचा स्वानुभव होता आणि म्हणून केवळ व्यक्तिगत जीवनामध्येच नाही, तर समष्टी जीवनामध्येही दिव्यत्व अवतरावे, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून श्रीमाताजींनी येथील जीवनाचे ‘दिव्य-जीवना’त रूपांतर व्हावे म्हणून वाटचाल केली आणि इतरांसाठी मार्ग प्रशस्त करून दिला.
 
 
समजुतीचा घोटाळा
 
‘सर्व जीवन म्हणजे योगच आहे’ या विधानाचा सखोल अर्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. तसे केले नाही, तर फसगत होण्याची शक्यता आहे. अन्यथा आपल्या सामान्य जीवनालाच योग समजून, आपण फार मोठे योगी आहोत, असा वृथा, भ्रम आणि अहंकार तेवढा निर्माण होण्याचीच शक्यता अधिक. तेव्हा या विधानाचा गर्भितार्थ जाणून घेतला पाहिजे. ज्यांच्या मनात जीवनाविषयीची दांडगी आसक्ती आहे, अध्यात्म जीवनासाठी त्याग करण्याची ज्यांची तयारी नाही, अगदी ईशविरोधी असणार्‍या गोष्टींनाही नकार देण्याची ज्यांची बिलकूल तयारी नाही, अशा मंडळींकडून या विधानाचा सोयीस्कर वापर होण्याचा आणि त्यांची स्वतःचीच दिशाभूल होण्याचा मोठा धोका संभवतो. सर्व जीवन योगच आहे, त्यामुळे आपले वासनाविकार, इच्छाआकांक्षा, रागलोभादी षड्रिपु इ. जसेच्या तसे चालूच राहतील, असे समजणे ही भ्रांती होय. तेव्हा अशी समजूत असणार्‍या मंडळींना श्रीअरविंदांनी स्पष्ट शब्दांत जाणीव करून दिली आहे की, ‘सर्व जीवन योग आहे याचा अर्थ, आहे ते जीवन तसेच चालू ठेवणे असा होत नाही.’
 
पूर्णयोग कोणासाठी?
सर्व जीवन म्हणजे योगच आहे, हे विधान बरेचदा सोयीस्कररीत्या वापरले जाते असे दिसते. या विधानाचा अर्थ जाणून घेण्यासाठी आधी आपण ‘पूर्णयोग’ कोणासाठी? हे नीट समजून घेतले पाहिजे. श्रीमाताजी म्हणतात, “मानव जे जे काही साध्य करू शकतो ते सर्व काही ज्यांनी साध्य केले आहे, पण तरीही जे समाधानी नाहीत, हे जीवन देऊ शकणार नाही अशा उच्चतर गोष्टींची जे या जीवनाकडून अपेक्षा करतात; अशाच माणसांसाठी ‘पूर्णयोग’ आहे. ज्यांनी अज्ञाताचा ध्यास घेतलेला आहे आणि जे पूर्णत्वाची आस बाळगतात, भंडावून सोडणारे प्रश्न जे स्वतःला विचारत राहतात आणि तरीही ज्यांना त्या प्रश्नांची कोणतीही निश्चित अशी उत्तरे सापडत नाहीत, अशी माणसंच ‘पूर्णयोगा’साठी तयार झालेली असतात.” म्हणजेच, आहे हे जीवन परिपूर्ण नाही, याची जाण झाल्यामुळे, आहे त्याच जीवनात जे समाधानी नाहीत; सद्यकालीन जीवनापेक्षा जे अधिक परिपूर्ण जीवनाचा वेध घेऊ पाहतात, त्यांच्यासाठी पूर्णयोग आहे. या जीवनाचा नव्हे, तर जीवनातील आसक्तीचा त्याग करण्याची ज्यांची तयारी आहे, त्यांच्यासाठी पूर्णयोग आहे. या जीवनापासून जे पलायन करू पाहतात किंवा आहे याच जीवनात जे समाधानी आहेत, ज्यांना या जीवनाच्या अपूर्णतेची कोणतीही जाण नाही, त्यांच्यासाठी पूर्णयोग नाही, तर या जीवनाच्या अपूर्णतेची सार्थ जाणीव ज्यांना झाली आहे आणि याच जीवनात जे पूर्णत्व आणण्याची आस बाळगून प्रयत्नशील आहेत, त्यांच्यासाठी पूर्णयोग आहे.
 
सर्व जीवन
‘सर्व जीवन हा योग आहे’ या वाक्यातील पूर्वार्ध म्हणजे सर्व जीवन, त्यामध्ये नेमका कशाकशाचा समावेश होतो हे पाहणे उचित ठरावे. व्यक्ती तसेच समष्टी, व्यक्तिगत अस्तित्व, विश्वात्मक अस्तित्व तसेच विश्वातीत अस्तित्व या सार्‍यांचा समावेश ‘सर्व जीवन’ यामध्ये होतो. अगदी व्यक्तिगत स्तरावर विचार केला तरी, आजवरचे पारंपरिक योग व्यक्ती-जीवनाच्या कोणत्यातरी एकाच अंगाला हाताशी धरून योगयुक्त होण्याचा प्रयत्न करत असत. म्हणजे कोणाला कर्ममार्ग जवळचा वाटे, तर कोणाला ज्ञानमार्ग, तर कोणाला भक्तिमार्ग; कोणी मनाला हाताशी धरून राजयोगाच्या मार्गाने जाऊ पाहत असे, तर कोणी प्राणाला हाताशी धरून हठयोगाचा मार्ग अवलंबू पाही, तर कोणी शरीराला हाताशी धरून तंत्रमार्गाचा अवलंब करू पाहत असे. परंतु, हे सारेच मार्ग महत्त्वाचे असले तरी ते परिपूर्ण नाहीत, ही गोष्ट श्रीअरविंदांनी सांगितली.
 
आपले अस्तित्व म्हणजे फक्त मन, फक्त प्राण किंवा फक्त शरीर नाही, आपल्या अस्तित्वामध्ये या सार्‍यांचा अंतर्भाव आहेच. परंतु, त्याहूनही अधिक काही आहे. चैत्य पुरुष आहे, आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर आहे, आत्मा आहे. तसेच, अगदी भौतिकाचाच विचार करायचा झाला, तर आपल्या इच्छाआकांक्षा, वासना, उर्मी, संवेदना, प्रेरणा, भाव-भावना, विचार, कल्पना, स्मृती इ. सार्‍या गोष्टी जीवनाचाच भाग आहेत. या सार्‍यांना वगळायचे आणि कोणतेतरी एकच एक अंग हाती धरून प्रगत व्हायचे, हा पारंपरिक मार्ग श्रीअरविंदांना अमान्य होता. ते म्हणतात,“...जगाशी, जीवनाशी काहीही कर्तव्य नाही असे मानणे किंवा संवेदना मारून टाकणे किंवा त्यांच्या कृतींना पूर्णपणे अटकाव करणे या गोष्टी माझ्या योगाचा (पूर्णयोगाचा) भाग असू शकत नाहीत. दिव्य सत्याचा प्रकाश, सामर्थ्य, आनंद आणि त्यांची गतिशील निश्चितता जीवनामध्ये खाली उतरवून, त्यायोगे हे जीवन रूपांतरित करणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. हा ऐहिकाचा त्याग करणारा संन्यासवादी योग नसून, हा ‘दिव्य जीवना’चा योग आहे.” स्वतः श्रीअरविंद जेव्हा योगमार्गाकडे वळले तेव्हादेखील भौतिक जीवनाचा परित्याग करायला लावणारा योग त्यांना नको होता, तर ज्या योगामुळे आपले अंगीकृत देशकार्य अधिक जोमाने करता येईल, असा शक्ति-प्रद योग त्यांना हवा होता.
 
पारंपरिक योगमार्ग
पूर्वीच्या योगमार्गांचा अवलंब करून, ईश्वराची प्राप्ती एखाद्या योग्याला साध्य झाली, तर तो जीवनापासून दुरावत असे किंवा त्याने त्याचे सारे प्रयास जग जिंकण्याच्या दृष्टीने बाह्य दिशेने वळविले, तर ईश्वरास गमावण्याचा धोका असे. आणि त्यामुळेच लौकिक जीवन आणि आध्यात्मिक प्रगती, पूर्णत्व यांमध्ये फारकत असल्याचे आढळून येत असे आणि कोणी यामध्ये दोहोंचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, तर तो अगदी अपुरा ठरे. बहुधा योगी आध्यात्मिक जीवनाच्या प्राप्तीसाठी सामान्य जीवनापासून दूर जातात आणि या सामान्य जीवनावरील ताबा गमावून बसतात; आत्म्याची श्रीमंती मिळविण्याच्या प्रयत्नांत मानवी गतिविधींच्या बाबतीत कफल्लक बनत जातात, असे आढळून येते. एकेकाळी ही कल्पना एवढी प्रभावी ठरली होती की, योगसाधना करणे म्हणजे जीवनापासून पलायन हेच समीकरण झालेले होते. परंतु, श्रीअरविंदांच्या मते, “जगापासून किंवा जीवनापासून निवृत्त होऊन स्वर्ग, निर्वाण यांच्याकडे प्रयाण हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. उलट, हा योग जीवनामध्ये आणि अस्तित्वामध्ये परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगतो. ते गौण आणि अनुषंगिक उद्दिष्ट आहे असे तो मानत नाही, तर ते वैशिष्ट्यपूर्ण आणि केंद्रवर्ती उद्दिष्ट आहे, असे तो मानतो.”
 
जीवन कशासाठी?
 
जीवनापासून पलायन हे योगासाठी उचित का नाही, याची श्रीअरविंदांनी केलेली मांडणी लक्षवेधी आहे. ते म्हणतात, “मानव हा उच्चतर अस्तित्वाचा भौतिकामध्ये उतरलेला असा प्रतिनिधी आहे की, ज्यामध्ये कनिष्ठ प्रकृतीचे पराप्रकृतीमध्ये रूपांतर होणे शक्य असते आणि पराप्रकृतीने कनिष्ठ प्रकृतीमध्ये स्वतः प्रकट होणे शक्य असते. ही शक्यता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी म्हणून मानवाला जे जीवन प्रदान करण्यात आलेले आहे, त्यापासूनच दूर पळणे किंवा त्याचाच परित्याग करणे, ही योगाची आवश्यक अट असू शकत नाही किंवा ते योगाचे अंतिम उद्दिष्टही असू शकत नाही.“ ते म्हणतात, “योगाचे पूर्ण आणि खरे उद्दिष्ट तेव्हाच साध्य होऊ शकेल जेव्हा मानवातील चेतनयुक्त योग हा प्रकृतीतील अवचेतन योगाप्रमाणे बनेल, म्हणजे असे की, तो योग बाह्यतः जीवनाशी संलग्न असेल आणि या दोहोंचे मार्ग व सिद्धी यांच्याकडे पाहून ‘सर्व जीवन हे योगच आहे,’ असे आपल्याला खर्‍या अर्थाने म्हणता येईल."
 
The true and full object and utility of yoga can only be accomplished when the subconscious yoga in nature, outwardly conterminous with life itself ans we can once more ,looking out both on the path and the achievement, say in a more perfect and luminous sense : "All yoga life is Yoga"
 
योगाचे हे उद्दिष्ट साध्य करावे म्हणूनच श्रीअरविंदांनी ‘योगसमन्वया’ची मांडणी केली. त्यामध्ये मानवी जीवन पूर्णत्वाला नेणे आणि या पूर्ण जीवनात ईश्वर व प्रकृती यांचे ऐक्य घडवून आणणे हे साध्य आहे. यामध्ये आंतरिक अनुभूती व बाह्य कर्मांचा मेळ घातला जावा, अशी अपेक्षा असते.
 
जीवनाचे रूपांतरण
 
केवळ आंतरिक अनुभूतीमध्ये रममाण झालेला योगी शांत ब्रह्माचा अनुभव घेऊ शकेल. पण तो गतिमान ब्रह्मापासून दुरावू शकतो. शांत ब्रह्माशी एकत्व पावून मुक्ती साधणे आणि तद्नंतर ईश्वरामध्ये विलय पावणे, हे श्रीअरविंदांच्या योगाचे उद्दिष्ट नाही,तर शांत ब्रह्माशी एकत्व पावून मिळालेली दिव्य शांती, दिव्य प्रकाश, दिव्य ज्ञान, दिव्य शक्ती आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये उतरविणे आणि त्यांचा पोत बदलविणे, सामान्य मानवी व्यवहारांना त्यांच्या मूळ रूपाप्रत नेणे, जीवनाच्या किंबहुना अस्तित्वाच्या मन, प्राण, शरीर या अंगांना त्यांच्या मूळ रूपांप्रत नेणे आणि त्यांच्याशी संयुक्त करणे हे अभिप्रेत आहे. सद्यःस्थितीतील शरीर हे जडत्वाचे जणू धाम आहे, ते परिपूर्ण सौंदर्य व सुसंवाद यांनी युक्त बनविणे; आज मानवी मन हे गोंधळलेले, अज्ञानयुक्त आहे त्याला अचूक ज्ञानाचे वाहन बनविणे; आज आपल्यातील प्राण हा वासनाविकारांनी संचालित होताना आढळतो, त्याला अमोघ शक्ती व सामर्थ्याचे माध्यम बनविणे; आज व्यक्तीला आपल्यातील आंतरात्मिक अस्तित्वाची, चैत्य पुरुषाची क्वचितच जाणीव असते, तो चैत्य पुरुष ओळखणे आणि त्याला खर्‍याखुर्‍या आणि विशुद्ध प्रेमाचे वाहन बनविणे, हे पूर्णयोगामध्ये अभिप्रेत आहे.
 
श्रीअरविंद म्हणतात, “आपल्या सर्व अस्तित्वाने - आपला आत्मा, मन, इंद्रियगण, हृदय, इच्छा, प्राण, शरीर या सर्वांनी स्वतःच्या सर्व शक्ती इतक्या पूर्णतेने, अशा प्रकारे ईश्वरचरणी समर्पित करावयास हव्यात की, ज्यामुळे आपले समग्र अस्तित्व हे ईश्वराचे सुयोग्य साधन होईल. हे घडवून आणणे हे काही सोपे काम नाही. कारण, जगातील प्रत्येक वस्तू एका ठाम चाकोरीतून चालत असते; ही चाकोरी, ही सवय हाच तिचा कायदा असतो; कोणत्याही वस्तूला मौलिक बदल नको असतो; ती अशा बदलाला विरोध करते आणि पूर्णयोग मात्र जी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, त्या क्रांतीहून कोणताही बदल अधिक मौलिक असू शकत नाही. पूर्णयोगाचा अभ्यास करत असताना प्रकृतीच्या प्रत्येक अंशाला केंद्रभूत श्रद्धेकडे, इच्छेकडे, सतत ओढून आणावे लागत असते.”
 
 
 
योग म्हणजे काय?
 
श्रीअरविंद म्हणतात, “जीवनाचा व योगाचा योग्य विचार केला असता, असे दिसून येते की, सर्व प्रकारचे जीवन हे योगच आहे. मग ते पूर्ण जाणीवपुरस्सर असो किंवा अर्ध-जाणिवेचे असो. ‘माणसामध्ये सुप्त असलेल्या क्षमतांच्या आविष्करणाद्वारे, आत्मपूर्णत्वाच्या दिशेने चाललेला पद्धतशीर प्रयत्न हा योग या संकल्पनेचा आमचा अर्थ आहे. आणि या प्रयत्नांमध्ये विजय प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली उच्चतम अट म्हणजे, मानवामध्ये आणि विश्वामध्ये अंशत: आविष्कृत झालेल्या विश्वात्मक आणि विश्वातीत अस्तित्वाशी मानवी व्यक्तीचे ऐक्य, ही होय.’ जीवनाच्या सर्व दृश्य रुपांच्या पाठीमागे आपण नजर टाकली तर, असे दिसून येईल की, हे जीवन म्हणजे एक महान योग आहे-निसर्ग, प्रकृती हा जीवनरूपी योग अभ्यासीत आहे. आपले स्वत:चे पूर्णत्व गाठणे हा या प्रकृतीच्या मनातील उद्देश आहे; आपल्यातील विविध शक्तीसारख्या वाढत्या प्रमाणात प्रकट करीत, प्रकृती आपले पूर्णत्व गाठू इच्छिते. या योगाच्या आश्रयाने प्रकृती आपल्या दिव्य सत्य स्वरूपाशी गाठ घेऊ इच्छिते.मानव हा प्रकृतीचा विचारशील घटक आहे; त्याच्याद्वारे प्रकृतीने, आत्मजाणीवयुक्त साधनांचा आणि कृतींच्या संकल्पयुक्त व योजनाबद्ध व्यवस्थेचा, या पृथ्वीवर प्रथमच वापर केला आहे, जेणेकरून तिचा हा महान हेतू अधिक वेगाने आणि प्रभावीपणे साध्य व्हावा.
स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे, “ ‘योग’ ही व्यक्तीने आपल्या पार्थिव जीवनामध्ये असताना, स्वत:ची विकासप्रक्रिया शीघ्रतेने एकाच जन्मात, किंबहुना काही वर्षांमध्येच, वा काही महिन्यांमध्येच साध्य करून घेण्याचे साधन आहे. प्रकृतिमाता आपल्या अफाट उर्ध्वमुखी विकास-परिश्रमांत ज्या सामान्य विकासपद्धतींचा उपयोग करत आहे, त्या पद्धती काटेकोर नाहीत, तीव्र नाहीत; त्या शिथिल आहेत, पसरट आहेत, सावकाश पावले टाकणार्‍या आहेत. या शिथिल विकासपद्धतीत द्रव्य व शक्ती यांचा मोठाच अपव्यय होताना दिसतो; तथापि या पद्धतीत प्रकृती द्रव्याचा व शक्तींचा संयोग, मेळ, काटेकोर पद्धतीहून अधिक पूर्ण असा घडवीत असते. प्रकृतिमातेच्या विकासपद्धतीतून तयार केलेली एक तीव्रतायुक्त पद्धती, ही दृष्टी योगासंबंधाने आपण स्वीकारली म्हणजे आपल्याला योगपद्धतींच्या योग्य आणि तर्कशुद्ध समन्वयाला योग्य अधिष्ठान लाभते. ही दृष्टी हेच ते अधिष्ठान होय, हाच तो पाया होय.”
आपल्यामध्ये अंगभूत असणार्‍या सुप्त क्षमतांच्या पूर्णत्वासाठी चाललेली धडपड, त्या प्रयत्नांच्या माध्यमातून चाललेले त्यांचे आविष्करण आणि दिव्य सत्य रूपाशी पडणारी त्यांची गाठ हा जर योगाचा अर्थ घेतला, तर प्रत्येक व्यक्तिगणिक योगाचे भिन्न भिन्न रूप आपल्या नजरेस पडू शकते. व्यक्तीच्या अंगी असणार्‍या क्षमतांचा विचार केला, तर विविध कला, क्रीडा, कौशल्ये, छंद इ. सार्‍या सार्‍याचा समावेश योगामध्ये होऊ शकतो. योगसाधना करण्यासाठी या सर्वांचा त्याग करण्याची आवश्यकता नाही, तर या सार्‍या गोष्टीदेखील ईश्वरोपासनेचे, ईश्वराच्या आराधनेचे एक उत्तम साधन बनू शकते, ही जाण पूर्णयोगामध्ये आढळून येते. वास्तविक ईश्वराव्यतिरिक्त या विश्वात अन्य काही नाहीच, पण आपल्या मूळ रूपापासून ढळल्यामुळे, ईश्वरविन्मुख झाल्यामुळे जी गोष्ट विकृत, विरोधी स्वरूपाची असल्याचे भासते, तिला ईश्वराभिमुख बनविणे हे येथे आवश्यक ठरते. जीवनाचे एकेक अंग अशा रीतीने ईश्वराभिमुख करत न्यायचे, हीच पूर्णयोगाची साधना आहे. अर्थात हे साधणे तितके सोपे नाही.
मग हे सारे प्रत्यक्षात कसे उतरवायचे? हा नेहमी पडणारा एक प्रश्न आहे. श्रीमाताजींना हा प्रश्न एका साधकाने विचारलेला होता. “जे कर्म ईश्वराप्रत समर्पित केले जाते आणि जे ईश्वराच्या आदेशाने केले जाते, तेच कर्म हे आध्यात्मिक शुद्धीकरण करणारे असते, असे श्रीअरविंद म्हणतात. असे असेल तर मग सर्व जीवन हा योग कसा?” हा तो प्रश्न होता. तेव्हा श्रीमाताजींनी त्यास असे उत्तर दिले की, “तुम्ही जे काही करत असाल, ते सर्व कर्म ईश्वरासाठी करत आहात, असे समजून करा. सुरुवातीला दिव्य शक्ती ग्रहण करण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून तुम्ही ते करा. उदाहरणार्थ, तुम्ही लांब उडीचा सराव करत असाल, तर तो सराव केवळ सरावाच्या आनंदासाठी न करता, त्यामुळे तुमचे शरीर दिव्य शक्तीच्या ग्रहणासाठी सक्षम बनेल आणि मग तुम्ही त्या दिव्य शक्तीचे आविष्करण करण्यास योग्य व्हाल, असा विचार करून तो सराव करा.”
म्हणजेच आपले सामान्य दैनंदिन व्यवहार करत असताना, आपण ते कशासाठी करत आहोत? उदा. आपले जेवणखाण, विश्रांती, व्यायाम, निद्रा, इ. सार्‍या गोष्टी आपल्याला ईश्वराची सेवा करण्यासाठी शरीराची तंदुरुस्ती आवश्यक आहे म्हणून करायच्या आहेत, हा भाव मनात नित्य असणे आवश्यक आहे. प्रत्येक कृती करताना, ती कृती ईश्वराकडे वळविणे; जीवनातील प्रत्येक संवेदना, भावना, विचार, ईश्वराकडे वळविणे, त्याचा अभ्यास करणे, हीच साधना. अर्थातच येथे एक गोष्ट लक्षात येईल की, ही साधना २४ तास करण्याची साधना आहे. ध्यान, पूजाअर्चा, जप, स्नानसंध्या इ. ठरावीक चारदोन गोष्टी केल्या म्हणजे साधना केली असे येथे अभिप्रेत नाही, तर जीवनातील प्रत्येक हालचाल, प्रत्येक कृती, प्रत्येक स्पंदन हेच ईश्वराभिमुख करायचे आहे आणि अशी साधना करण्याचा प्रयत्न करत राहिलो, तर मग साधना वेगळी आणि जीवन वेगळे असे म्हणताच येणार नाही. अशा वेळी मग, ’सर्व जीवन म्हणजे योगच आहे’, असे म्हणण्यास कोणताही प्रत्यवाय राहणार नाही.
 
 
 - डॉ. केतकी मोडक
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0