’राष्ट्रगीताकरिता सांगीतिक लढा’

    13-Aug-2022
Total Views |
 
75
 
 
 
प्रतिभावान कलावंत संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव (महाराष्ट्रात ’कृष्णा मास्तर’ किंवा नुसते ’मास्तर’ हे नाव अधिक प्रचलित) यांनी शास्त्रीय संगीताबरोबर नाट्यसंगीत, चित्रपट संगीत, भक्तिसंगीत, सुगमसंगीत व देशसंगीत या क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी केलेली आहे. तसेच, ’वंदे मातरम्’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणा गीत स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे, याकरिता मास्तर कृष्णरावांनी भारतीय घटना समितीबरोबर अमूल्य कार्य केलेले आहे. राष्ट्रगीताकरिता बाणेदारपणे दिलेल्या या सांगीतिक लढ्याबद्दल माहिती देण्याचा या लेखातून केलेला हा प्रांजळ प्रयत्न!
 
 
सिद्धहस्त कवी व कादंबरीकार बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या लेखणीतून अवतरलेल्या व मातृभूमीबद्दलच्या प्रेमादराने ओतप्रोत भरलेल्या ‘वंदे मातरम्’ या ओजस्वी गीताचे मास्तर कृष्णराव कट्टर समर्थक होते. हे गीत स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे, हा ध्यास मास्तरांनी अगदी तरुण वयापासूनच घेतला होता. ब्रिटिश सरकारने पारतंत्र्याच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवलेल्या भारतमातेला मुक्त करण्यासाठी भारतातील काही क्रांतिकारकांनी सशस्त्र लढ्याचा मार्ग स्वीकारला, काही देशभक्तांनी अहिंसेचा मार्ग पत्करला, तर काही स्वातंत्र्यवीरांनी धारदार लेखणी हाती घेऊन भारतीय जनतेमध्ये ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध बंड पुकारून असंतोष फैलावत जाणीव जागृती घडवण्याचा मार्ग अवलंबला.
 
 
देशभक्त मास्तरांच्या हातात त्यांचं लाडकं संगीत होतं आणि देशकार्याकरिता मास्तरांनी त्यांचं हुकूमी अस्त्र म्हणजे संगीत हाच मार्ग वापरला. त्यांना १९३० साली विद्यमान शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी ‘संगीतकलानिधी’ ही यथार्थ पदवी दिली होती. ‘वंदे मातरम्’ या मातृभूमीच्या प्रार्थनेला राष्ट्रगीत म्हणून सर्वोच्च स्थान मिळावे, यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले.
  
उद्या पुणे येथे कार्यक्रम
 
 
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रतिभावंत कलाकार तसेच देशभक्त असलेले संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून पुण्यातील कोथरुडच्या शाकुंतल कलामंदिरात ’वंदे मास्तरम्’ या कार्यक्रमाचे सोमवार, दि. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मिलिंद सबनीस आहेत. सूत्रसंचालन प्रिया फुलंब्रीकर आणि गायन डॉ. राम नेने करणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त फुलंब्रीकर कुटुंबीयांनी केले आहे.
१९३४ मध्ये मास्तरांनी ‘धर्मात्मा’ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक म्हणून पुणे येथील ’प्रभात फिल्म कंपनी’मध्ये प्रवेश केला. तिथे ते संगीतकार म्हणून कार्यरत असताना ‘प्रभात’ कंपनीचे एक भागीदार व चित्रपट दिग्दर्शक असलेल्या व्ही. शांताराम यांची रीतसर परवानगी घेऊन ‘प्रभात’चे गायक व वाद्यवृंद यांच्या साथीने मास्तरांनी तेथील म्युझिक स्टुडिओत ‘वंदे मातरम्’ या गीतास विविध रागात चाली देण्याचे नवनवीन प्रयोग सुरू केले. अनेक दिवस त्यांनी या गीताविषयी सखोल चिंतन केले. शेवटी मुख्यत्वे मंद्र व मध्य सप्तकात गायल्या जाणार्‍या ’झिंझोटी’ या रागाची निवड करून त्यांनी त्या रागात ‘वंदे मातरम्’ संगीतबद्ध केले आणि ‘प्रभात’च्या स्टुडिओत त्याचे रेकॉर्डिंगही केले. अल्पावधीतच ते सुलभ व सुमधुर चालीतील गीत लोकप्रिय झाले.
 
 
मास्तर अंतर्बाह्य सच्चे देशभक्त असल्यामुळे आपल्या अनेक शास्त्रीय मैफलींची सांगता स्वकृत चालीतील ‘वंदे मातरम्’ गीताचे गायन करून करत असत. त्यांनी कायम या गीताकडे राष्ट्रगीत या दृष्टिकोनातून बघितले; त्यामुळे त्यांनी हे गीत कधीच गायकी अंगाने विस्तार करून न गाता कायम राष्ट्रगीतासारखेच गायले. त्या स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश राजवटीत ‘वंदे मातरम्’जाहीरपणे गायला सरकारी पातळीवर बंदी होती. तरीसुद्धा मास्तरांनी धाडसी वृत्तीने आकाशवाणीवरील त्यांच्या एका कार्यक्रमात नाट्यपदाला जोडून अचानक ‘वंदे मातरम्’चे गायन सुरू केले. हे लक्षात येताच स्टेशन डायरेक्टर बुखारी यांनी तत्काळ ध्वनिक्षेपक बंद केले.
 
 
याचा परिणाम म्हणून मास्तरांनी रेडिओवर (तेव्हा ‘इंडिया स्टेट ब्रॉडकास्टिंग’ कंपनी असे नाव होते) गायन सादर करण्यास पूर्णपणे बहिष्कार टाकला. त्याकाळी दूरदर्शनचे आगमन भारतात झालेले नव्हते म्हणून रेडिओ हेच कलावंतांचे उपजीविकेचे आणि रसिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रमुख व प्रभावी माध्यम होते. मास्तरांना रेडिओवर ‘वंदे मातरम्’ गाऊ न दिल्याच्या घटनेचा जनतेकडून आणि बहुसंख्य नेते मंडळींकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
 
 
सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून या घटनेची दखल घेऊन त्याविषयी जहाल लेख लिहिले गेले. पुढे स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात असताना १९४७ साली गुढीपाडव्याला देशाचे उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीमुळे आकाशवाणीने मास्तरांना ‘वंदे मातरम्’ गायला सन्मानाने आमंत्रित केले. तेव्हा मास्तरांनी आकाशवाणीवर ‘वंदे मातरम्’ गाऊन बहिष्कार मागे घेत आपल्या रेडिओवरील सांगीतिक कारकिर्दीस पुन्हा प्रारंभ केला. तसेच आकाशवाणीच्या विनंतीनुसार नव्यानेच सुरू झालेल्या पुणे आकाशवाणी केंद्राचे अधिकृत संगीतकार, शास्त्रीय गायक व सल्लागार म्हणून मास्तरांनी काही काळ उत्तम कार्य केले.
 
 
भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी राष्ट्रगीत कोणते हे निश्चित झाले नव्हते; त्यामुळे दि. १४ ऑगस्ट, १९४७ रोजी दिल्लीमधील रात्रीच्या कार्यक्रमात ’जन गण मन’ व ’वंदे मातरम्’ ही दोन्ही गीते गायली गेली होती. डिसेंबर १९४७ मध्ये घटना समितीच्या कामास सुरुवात झाली, त्यावेळी मास्तरांनी पंतप्रधान पंडित नेहरूंना ’वंदे मातरम्’ विषयी एक संगीततज्ज्ञ म्हणून माझे मत ऐकावे’ अशी दिल्लीला तार केली. तार मिळताच पं. नेहरूंनी मास्तरांना दिल्लीला भेटण्याकरिता व सादरीकरणासाठी निमंत्रण पाठवले. मास्तरांनी दिल्लीत घटना समितीच्या सदस्यांसमोर समूह गायनातील व केवळ वाद्यवृंदातील ‘वंदे मातरम्’ची स्वतः कष्टाने तयार केलेली एकूण दोन ध्वनिमुद्रणे ऐकवली.
 
 
तसेच,स्वतः तिथे सर्व सदस्यांसमोर समक्ष प्रात्यक्षिके सादरही करून दाखवली. परंतु, पं. नेहरूंनी संयुक्त संघात किंवा परदेशात सहजगत्या वाजविता येईल अशा प्रकारची रचना हवी असे सुचवले. मग मास्तर मुंबई पोलीस वाद्यवृंदाचे प्रमुख बॅण्डमास्टर सी. आर.गार्डनर या ब्रिटिश अधिकार्‍याला या संदर्भात भेटले. ‘मिश्र झिंझोटी’ रागातील हीच रचना मास्तरांनी गार्डनर यांच्या मदतीने पाश्चात्य पद्धतीनुसार बँडवर बसवून घेतली. त्याची पाश्चात्य पद्धतीची स्वरावली छापून घेतली. बँडवर या ‘वंदे मातरम्’च्या सादरीकरणासाठी तीन ध्वनिमुद्रिका तयार केल्या.
 
 
याबरोबरच गार्डनर आणि नेव्हल बँडचे प्रमुख स्टॅन्ली हिल्स अशा पाश्चात्य संगीत तज्ज्ञांचे अभिप्राय, ‘बँड नोटेशन‘ व ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत होण्यासाठी स्वतःची संगीतकार म्हणून असलेली मते यांची मास्तरांनी पत्रके छापून घेतली. हे सर्व साहित्य आणि साथीदारांसह मास्तर पुन्हा दिल्लीत पोहोचले. तत्कालीन संसदेमध्ये घटना समितीच्या सदस्यांसमोर मास्तरांनी परत बँडवरील ‘वंदे मातरम्’चीप्रात्यक्षिके सादर केली. एक मिनिट पाच सेकंदांचे तसेच ध्वजारोहणाच्या वेळी वाजविण्यात येणारे २० सेकंदांचे ‘वंदे मातरम्’ अशी ध्वनिमुद्रणे ऐकवली. थोडके अपवाद वगळता भारतातील जवळजवळ सर्वपक्षीय नेत्यांचा या देशभक्त कलावंताला या देदीप्यमान कार्यासाठी एकमुखाने पाठिंबा होता.
 
 
मास्तरांच्या सर्वच संगीत रचनांमध्ये सहजसुंदरता व माधुर्य दिसून येते. या ‘मिश्र झिंझोटी’ रागातील ‘वंदे मातरम्’ची संगीतरचनासुद्धा सुरेल व सर्व वयातील स्त्री-पुरुषांना सांघिकरित्या गाता येईल, अशी सुलभ होती. या तेजस्वी कार्याबद्दल सर्व संसद सदस्यांनी मास्तरांचा गौरव केला. पं. नेहरूंनी देखील “आपण देशातील सर्वश्रेष्ठ संगीतकार आहात,” अशा शब्दांत त्यांचा गौरव केला.
 
 
‘वंदे मातरम्’ या गीताला राष्ट्रगीताचे स्थान मिळण्याकरिता नेहरूंसह काही जणांनी घेतलेले सर्व आक्षेप मास्तरांनी आपल्या संगीत रचनांमधून साफ खोडून काढले होते. अगदी ‘मार्चिंग साँग’सारखेही ‘वंदे मातरम्’चे गायन-वादन होऊ शकत, अशी प्रात्यक्षिके त्यांनी दिलेली होती. ही सर्व मेहनत मास्तरांनी स्वखर्चाने केलेली होती. त्याकरिता स्वाभिमानी मास्तरांनी खूप पैसा खर्च केला होता. शिवाय अगदी स्वतः पोलीस परेडमध्ये भाग घेऊन ‘मार्च साँग’साठी परिश्रम घेतले होते. परंतु, स्वातंत्र्यानंतर देशात वाद नकोत, अशी कदाचित राज्यकर्त्यांची भूमिका असावी. स्वातंत्र्य लढ्यात प्रेरणादायी ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या शब्दांचे महत्त्व, स्थान आणि मास्तरांचे राष्ट्रगीताकरिताचे अथक प्रयत्न यामुळे ‘वंदे मातरम्’ला पूर्णपणे डावलणे राज्यकर्त्यांना अशक्य झाले.
 
 
विविध राज्यप्रमुखांची मतेही ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत व्हावे, या बाजूची होती. स्वतः गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांनी ‘वंदे मातरम्’चे पहिले जाहीर गायन 1896 मध्ये केले होते. ते या गीताचे पुरस्कर्ते होते. परंतु, दुर्दैवाने १९४७ मध्ये ते हयात नव्हते. शेवटपर्यंत शूर योद्ध्याप्रमाणे हा सांगीतिक लढा मास्तर लढत होते. हा लढा बघायला मास्तरांचे पितृतुल्य गुरुवर्य पं. बखलेबुवा हयात नव्हते; परंतु मास्तरांचे परात्परगुरू असलेले जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अल्लादिया खांसाहेब यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मास्तरांच्या ‘झिंझोटी’ रागामधील चालीची मुक्त कंठाने प्रशंसा करून त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. ही शाबासकीची पावती म्हणजे जणू थोर परात्पर गुरूंकडून मोठा आशीर्वादच मास्तरांना मिळाला होता.
 
 
मास्तरांनी प्रचंड बुद्धिचातुर्य वापरून झुंजारपणे लढा दिला खरा. परंतु, दिल्लीत वेगळेच नाट्य घडले. दि. २४ जानेवारी, १९५०च्या घटना समितीच्या अखेरच्या बैठकीत कोणतेही मतदान न घेता घटना समितीचे अध्यक्ष व देशाचे राष्ट्रपती असलेल्या डॉ. राजेंद्रबाबू प्रसाद यांनी ’जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत राहिल आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीयगीत राहील व त्यास राष्ट्रगीताइतकाच समान दर्जा देण्यात येईल, असे एकतर्फी जाहीर केले. त्यावेळी मास्तर दिल्लीतच होते. त्यांची अर्थातच घोर निराशा झाली होती.
 
 
नव नवोन्मेषशालिनी प्रतिभाशक्तीचे त्यांना निसर्गदत्त वरदान लाभले असल्यामुळे ते सातत्याने संगीतात नवनवीन प्रयोग करून बघत असत व ते सर्व प्रयोग यशस्वी होत असत. त्यांनी ‘वंदे मातरम्’ हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे, हा ध्यास घेतला होता व त्यासाठी अनेक वर्षे अविरत परिश्रम घेतले होते. ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत होऊ शकले नाही, याचा मास्तरांना जरूर खेद वाटला; परंतु त्यातही ‘वंदे मातरम्’ला पूर्णपणे न डावलता त्या गीतास राष्ट्रगीताइतकाच समान बहुमान मिळाला, ही समाधानाची गोष्ट घडली होती. या सरकारने घेतलेल्या निर्णयास इतर कारणांबरोबर मास्तरांनी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत होण्याकरिता दिलेला हा प्रखर सांगीतिक लढा प्रामुख्याने कारणीभूत होता.
 
  
मास्तर हे बहुआयामी, दिलखुलास वृत्तीचे जगन्मित्र कलावंत होते. मनात अढी घेऊन एककल्लीपणे जगत राहणे त्यांच्या स्वभावात नव्हते. पुढच्या काळातदेखील संगीतात इतर नवनिर्मितीबरोबरच मनात कडवटपणा न ठेवता ते आपल्यापरिने ‘वंदे मातरम्’चा प्रचार व प्रसार करतच राहिले. त्यांच्या संगीत मैफलीचा शेवट ‘वंदे मातरम्’ गायनानेच व्हावा, याकरिता आता मैफलीस उपस्थित राहणारे संगीत श्रोते आग्रह धरू लागले होते. १९५३च्या सुमारास भारत सरकारतर्फे चीन भेटीवर गेलेल्या कलावंतांच्या सांस्कृतिक पथकामध्ये एक प्रमुख कलावंत म्हणून मास्तर सहभागी होतेच.
 
 
त्या कलावंतांनी चीनमध्ये सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आरंभीच मास्तरांनी स्वकृत चालीतील संपूर्ण कडव्यांसहीत ‘वंदे मातरम्’चे गायन केले होते व त्यास त्यांना इतर सहभागी कलावंतांनी गायन साथ दिलेली होती. मास्तरांनी संगीतबद्ध केलेल्या व स्वतः गायलेल्या ‘वंदे मातरम्’ची ध्वनिमुद्रिका महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये अनेक वर्षे (सुमारे 1970 पर्यंत) दररोज वाजवली जाई. अनेक संस्थांच्या सभासमारंभातदेखील ही ध्वनिमुद्रिका वाजवली जात असे. तसेच मास्तर स्वतः ठिकठिकाणी जाऊन सर्व वयोगटातील लोकांना सांघिकरित्या ‘वंदे मातरम्’ बसवून देत असत. शिवाय अनेक संस्था आपल्या विशेष सभा व कार्यक्रमांमध्ये मास्तरांना संपूर्ण कडव्यांसहीत त्यांचे स्वकृत चालीतील ‘वंदे मातरम्’ प्रत्यक्ष गाऊन सादर करायला आमंत्रित करत असत.
 
 
आपली कला राष्ट्रहितासाठी अर्पण करणार्‍या आणि कलेसाठी स्वाभिमान-राष्ट्राभिमान दाखविणार्‍या भारतातील निवडक बाणेदार कलावंतांमध्ये मास्तर कृष्णरावांचे नाव कायम अग्रणी राहील. अनेक वर्षे अथक प्रयत्न करून दिलेल्या या सांगीतिक लढ्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, काकासाहेब गाडगीळ, सरदार पटेल, वीर नरीमन आदी प्रभृतींनी मास्तरांचे कौतुक केले, तर सरोजिनी देवी नायडू यांनी ’गायकांचा नेता’ असे संबोधून मास्तरांचा मुंबई येथील समारंभात जाहीर गौरव केला. या तेजस्वी कार्याचा गौरव करताना पु. ल. देशपांडे मास्तरांच्या षष्ट्यब्दीपूर्ती समारंभात पुणे येथे झालेल्या त्यांच्या जाहीर भाषणात म्हणाले, ‘वंदे मातरम्’ साठी मास्तरांनी घेतलेले परिश्रम पाहून मास्तरांनाच ‘वंदे मातरम्’ म्हणावेसे वाटते!
 
  
अनेक रसिक व क्रांतिवीरांचे अपरंपार प्रेम लाभलेले मास्तर कृष्णराव आज देहाने आपल्यात नाहीत. परंतु,जोपर्यंत ‘वंदे मातरम्’ हा मंत्र उच्चारला जाईल तोपर्यंत भारतमातेच्या या वीर पुत्राचे स्मरण राहील. हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून खास आहे; शिवाय हे वर्ष मास्तर कृष्णराव यांचे १२५वे जन्मवर्ष म्हणजेच शतकोत्तर रौप्य महोत्सव असल्यामुळे खास आहे. या औचित्याने आजच्या दिव्य स्वातंत्र्य दिनी या थोर देशभक्त कलावंताच्या स्मृतीस विनम्र मानवंदना - ‘वंदे मातरम्’!
 
 
- प्रिया फुलंब्रीकर