चर्मकार समाजासाठी झटणारा कार्यकर्ता

12 Aug 2022 21:36:59
 
mayur
 
वडिलांच्या आकस्मिक निधनानंतरही ते डगमगले नाहीत. त्यांनी नंतर चर्मकार समाजाच्या हितासाठी स्वतःला वाहून घेतलं. जाणून घेऊया सामाजिक कार्यकर्ते मयुर कांबळे यांच्याविषयी...
 
 
मुंबईतील दादर-नायगाव परिसरातील प्रतिष्ठित व्यापार्‍यांपैकी एक नाव म्हणजे मयुर कांबळे. याच परिसरात त्यांचे बालपण गेले. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही त्यांनी समाजाशी आपला संपर्क कमी होऊ दिला नाही. परिसरातील प्रत्येक विभागाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध. दांडगा जनसंपर्क बाळगणार्‍या मयुर कांबळे यांचा जीवनप्रवास अजिबात सोपा नव्हता.
 
 
व्यवसाय करणार्‍या व्यक्ती तशा राजकारणात अगदी दुर्मीळ. समाजकारणाशीही त्यांचा क्वचितच संबंध येतो. मात्र, मयुर कांबळे हे यापेक्षा वेगळे ठरले. सर्व काही सुरळीत सुरू असताना त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यांना मोठा धक्का बसला. त्यातून त्यांनी सावरण्याचा प्रयत्न करत एक अवघड वाट निवडली. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी समाजकारण व राजकारणात प्रवेश केला आणि विविध सामाजिक उपक्रम राबवित आपल्या कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला. याद्वारे ते लोकांची सुखदुःखं जाणून घेऊ लागले. विशेष म्हणजे, कोणताही पूर्वानुभव नसताना त्यांनी आपल्या समाजकार्याचा आणि लोकांच्या मदतीला धावून जाण्याच धडाका सुरुच ठेवला. कोणतीही व्यक्ती समस्या किंवा एखादे काम त्यांच्याकडे घेऊन गेल्यास कांबळे त्या व्यक्तीची शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर प्रशासकीय मदतीची आवश्यकता असल्यासही ते सहकार्य करतात. चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
 
दुर्लक्षित गटई कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण परिपत्रके मंजूर करून घेतली. समाजाकरिता निरपेक्षपणे काम करण्याची वृत्ती आणि चिकाटी पाहून संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ येथे त्यांची संचालकपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर महामंडळाशी संबंधित समस्या सोडविण्याकरिता त्यांनी प्रशासकीय स्तरावर रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरीप्रयत्न केले. २०१४ नंतर त्यांच्या कामाला आणखी गती मिळाली. एखादे प्रलंबित काम प्रशासकीय अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करून ते पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. देवनार येथील दोन एकर जागेवर महामंडळाचे कार्यालय व्हावे, याकरिता त्यांनी पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावला. ‘कौशल्य भवन’ या बहुमजली इमारत बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न केले. मुंबई पालिका हद्दीतील गटई कामगारांचे रद्द अनुज्ञापत्र पुनर्स्थापना करणे व थकीत भाडे भरून घेणे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. खोपोली नगर परिषद हद्दीतील तीस गटई कामगारांना त्यांनी स्टॉल अनुज्ञापत्रे मिळवून दिले.
 
 
चर्मकार समाजातील चप्पल विक्री व चप्पल दुरूस्ती करणार्‍या गटई कामगारांचा ‘बाळासाहेब ठाकरे विमा योजने’त समावेश करण्यासह चर्मकार समाजाच्या वस्तीत ग्रंथालायस प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. चर्मकार समाजातील गटई कामगारांना निवृत्ती योजना लागू करणे, ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत त्यांना ‘स्वच्छता दूत’ म्हणून सामावून घेणे, जातपडताळणीच्या जाचक अटी शिथिल करण्यासाठीही त्यांनी आवाज उठवला. वर्षानुवर्षे रस्त्याच्या कडेला बसून चप्पल दुरूस्ती व चप्पल विक्री करणार्‍या चर्मकार समाजातील गटई कामगारांचा अत्यावश्यक सेवक म्हणून समावेश करण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध रविदास महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर त्यांनी केलेल्या प्रयत्नांनाही यश आले.
 
 
चर्मकार समाजातील गटई कामगारांचे सर्वेक्षण गणना करून या कामगारांकरिता स्वतंत्र धोरण राबविण्यासाठी प्रशासनाची मंजुरी मिळाली. याकरिताही कांबळे यांनी पाठपुरावा केला होता. ते सर्व महापुरूषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करतात. संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज जयंतीही ते विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी मध्यरात्री चैत्यभुमी येथे लाडूवाटप करून आनंदोत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे होणार्‍या भीम अनुयायांकरिता दि. ५ व ६ डिसेंबर रोजी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले जाते. कांबळे हे वारकरी कुटुंबात वाढल्याने त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत. पंढरपूरला जाणार्‍या वारकरी बांधवांसाठी त्यांच्यामार्फत मोफत छत्र्यांचे वाटप केले जाते. तसेच, आषाढी एकादशीनिमित्त वडाळा येथील विठ्ठल मंदिरात वारकरी बांधवांसाठी फराळाचे वाटप व मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले जाते.
 
 
कांबळे यांच्या समाजकार्याची यादी प्रचंड मोठी आहे. कारण, चर्मकार समाजाच्या हितासाठी झटण्याचा निश्चय त्यांनी केला आणि त्यादिशेने ते वाटचालदेखील करत आहे. चर्मकार समाजासाठी खर्‍या अर्थाने मयुर कांबळे हे नाव एका आधारासारखे आहे. कारण, कोणत्याही अडीअडचणीत मयुर कांबळे मदत करतील, असा त्यांच्यावर प्रेम करणार्‍या हजारो नागरिकांना विश्वास आहे. मयुर यांच्या समाजकार्याला आणि आगामी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वकशुभेच्छा...
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0