रहिमुल्ला हक्कानी आणि ‘इसिस’

    12-Aug-2022   
Total Views |
hakkani
 
 
नुकतेच अफगाणिस्तानातील काबूल येथे मदरशामध्ये आत्मघातकी हल्ला झाला. त्यात ‘हक्कानी नेटवर्क’चा धार्मिक गुरू असे अधिष्ठान प्राप्त झालेल्या रहिमुल्ला हक्कानी, त्याचा पाच वर्षांचा मुलगा आणि भाऊ यांचा मृत्यू झाला. रहिमुल्ला हे तसे बडे प्रस्थ. तालिबान्यांच्या सरकारमध्ये रसुरक्षामंत्री सिराजुद्दीन याचा रहिमुल्ला हा गुरू. रहिमुल्ला याच्यावरच्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी ‘इस्लामिक स्टेट’ अर्थात ‘इसिस’ने घेतली. इस्लामिक विचारांवर सत्ता मिळवण्याचा हक्कदार कोण? तर केवळ ‘इस्लामिक स्टेट’ समूह असावा, असे या दहशतवादी संघटनेचे म्हणणे. त्यामुळे तालिबानी सत्तेत आल्यापासून ‘इसिस’ने अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांना प्रारंभ केला.
  
 
अफगाणिस्तानमध्ये शिया मुस्लीम अल्पसंख्याक आहेत. त्यांच्यावर हल्ले करणे, तालिबान्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेवर हल्ला करणे, असे ‘इसिस’ने सुरू केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘इसिस’ने रहिमुल्लावर आत्मघातकी हल्ला का केला? रहिमुल्ला हा पाकिस्तानच्या दारूल- उलुम-हक्कानिया मदरशाचा स्नातक होता. तिथेच त्याला दहशतवादी विचारांची ओळख झाली असेल, असे काही लोकांचे म्हणणे आहे. तालिबान सरकार स्थापन होण्यापूर्वी नऊ वर्षे तो पाकिस्तानमध्ये राहात होता. पेशावरमध्ये त्याने ‘मदरसा जुबैरी’ नावाची संस्था स्थापन केली. दहशतवाद्यांना इथे धार्मिक शिक्षण दिले जायचे. इथूनच तालिबानसाठी जगभरातून पैसा गोळा केला जायचा. तालिबान्यांनी अफगाणवर सत्ता स्थापित केल्यावर एकाअर्थाने तालिबानी सरकार रहिमुल्लाच्या विचारांवर सुरू होती.
 
 
दुसरीकडे रहिमुल्ला जगभरात सलाफी विचारधारेचा, हदिसचा विद्वान म्हणून गणला जाऊ लागला. त्याने प्रसारमाध्यमांचा आधार घेत इस्लामिक धर्मविचारवंत म्हणून स्वतःचीओळख निर्माण केली. त्याला मुस्लीम राष्ट्रामध्ये लाखो फॅनफॉलोअर तयार झाले. तालिबान्यांच्या ‘हक्कानी नेटवर्क’चा हा धर्मविचार गुरू अफगाणिस्तानसोबतच इतर मुस्लीम राष्ट्रामध्येही लोकप्रिय होत होता. त्यामुळे ‘इसिस’पेक्षा ‘हक्कानी नेटवर्क’चे सगळ्याच बाबतीतले संघटन वाढत होते. ‘इसिस’ला संघटन करताना ‘हक्कानी नेटवर्क’च्या रहिमुल्लाचे मोठे आव्हान होते. तालिबान्यांच्या राजवटीत त्यांच्या वैचारिक धर्मगुरूची हत्यारघडवून ‘इसिस’ने स्वतःला तालिबानपेक्षा आपणच मोठे दहशतवादी आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
 
 
 
‘इसिस’चाच मुद्दा निघाला, तर ‘इसिस’ आणि आपला देश याबद्दलही माहिती घ्यायला हवी. दि. ९ ऑगस्ट रोजी जामिया मिलिया इस्लामिया युनिर्व्हसिटीमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षाला शिक्षण घेणार्‍या मोहसिन अहमद याला बाटला हाऊस येथून ‘एनआयए’ने अटक केली. तो १५ ऑगस्टपूर्वी भारतात घातपात करणार आहे, अशी माहिती ‘एनआयए’ला प्राप्त झाली होती. याचा अद्याप तपास सुरू आहे. मात्र, तपासाअंतर्गत माहिती मिळाली ती अशी की, तो ‘इस्लामिक स्टेट’च्या संबंधित लोकांशी संपर्कात आला. ऑनलाईन मैत्री त्यानंतर प्रत्यक्ष भेट, संपर्क आणि त्यानंतर तो ‘इसिस’साठी काम करणार्‍या एका जिहादी महिलेच्या प्रेमात पडला. तिने त्याला ‘इसिस’च्या कारवायांसाठी पैसे गोळा करण्यास सांगितले. अहमद क्राऊडफंडिंगसाठी सीरिया, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश आणि श्रीलंकेमधील ‘इस्लामिक स्टेट’ समूहाच्या सदस्यांशी संपर्कात होता. त्याला ज्यावेळी पकडण्यात आले, त्यावेळी क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून त्याने चार लाख रुपये गोळा केले होते.
 
 
 
याआधी २०२१ साली मालवणी-मालाडच्या मुस्लीम युवकांना ‘इसिस’ समूहमध्ये भरती करणार्‍या रिझवान अहमद आणि मोहसिन सय्यद या दोघांना अटक झालीच होती. यावर्षी दि. ३१ जुलै आणि दि. १ ऑगस्ट रोजी ‘एनआयए’ने महाराष्ट्रातून ४८ जणांनी अटक केली. ‘इसिस वॉईज ऑफ हिंद’ नावाचे मासिक प्रकाशित करते. ‘एनआयए’च्या निदर्शनास आले की, या मासिकामध्ये महाराष्ट्राबाबतच्या अगदी स्थानिक स्तरावरची इत्यंभूत माहिती येत होती. ही माहिती कोण देते, यावर लक्ष ठेवत ‘एनआयए’ने या ४८ जणांना अटक केली. याचाच अर्थ इस्लामिक स्टेट समूहाने महाराष्ट्रात देशात हातपाय पसरायला सुरुवात केली होती. पण, केंद्र सरकारने इस्लामिक स्टेटच्या सगळ्याच हालचालींवर गंभीरतेने कारवाई सुरू केली आहे. तरीही रात्र वैर्‍याचीच आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.