पटोलेंना तिरंग्याचीही पोटदुखी

11 Aug 2022 21:53:21

nana
 
हर घर तिरंगा’ अभियानासाठी चीनमधून झेंडे आयात केले, हा राष्ट्रीय सेनानींचा आणि राष्ट्रीय ध्वजाचा अपमान आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे म्हणणे. ‘मुह मे आया बक दिया’ची पंरपरा चालवताना आता नानांनी राष्ट्रीय ध्वज आणि अस्मितेलाही मध्ये आणले. त्यामुळेच पटोलेंच्या विधानातला खोटारडेपणा जनतेसमोर यायलाच हवा.
 
 
‘घर घर तिरंगा’ अभियानासाठी चीनमधून झेंडे आयात केले जातात, असा जावईशोध नानांनी कुठून लावला असेल? नाना नागपूरकर आहेत. नागपूरच्या गावोगावी तिरंगा ध्वज कुठून वितरित होत आहेत? याचा गृहपाठ तरी त्यांनी करायचा. उदाहरणादाखलविदर्भाचेच पाहू. तर जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत कार्यरत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील स्थापित स्वयं साहय्यता समूहांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर झेंडे उपलब्ध करून देण्यात आले.
 
 
 
नागपूरमध्ये ‘उमेद अभियाना’अंतर्गत नागपूरच्या बचतगटांना ध्वजनिर्मितीचे काम देण्यात आले. विदर्भातली वर्धा येथील ‘वर्धिनी बचतगटा’ने तीन लाख ध्वज बनवले. महाराष्ट्रातल्या विविण शहरांतील, ग्रामीण भागातील बचतगटांनी कंत्राट घेत हे ध्वज बनवले. भारत सरकारने यासाठी ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळाची निर्मिती केली होती. पटोले यांना सत्ता गेल्याचे दुःख इतके झाले की, त्यामुळे कदाचित ते विसरले की नागपूर, वर्धा आणि इतर सगळी शहर भारतातच येतात, चीनमध्ये नाही.
 
पटोले असे उगीचच निरर्थक का म्हणाले असतील? पाहिले तर कारण हे की त्यांना वाटले ते काहीही बोलले तरी त्याची शहानिशा करायला कोण आहे? दुसरे असे की, नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर लोक डोळे बंद ठेवून विश्वास करतात. चीन भारताचा शत्रू आहे. मोदींचे सरकार चीनकडून ध्वज आयात करते, हे ऐकून लोक ‘घर घर तिरंगा’ अभियानात भाग घेणार नाहीत. मोदींना लोकांच्या रोषास पात्र व्हावे लागेल, असे नानांना वाटले असावे. असो.‘घर घर तिरंगा’ अभियानामधे खोटी आवई उठवण्याचा अतिशय खालच्या पातळीवरचा प्रयत्न नानांनी केला. या पाश्वर्र्भूमीवर नानांचे सर्वेसर्वाराहुल गांधींनी चिनी दुतांच्या गाठीभेटी घेतल्याचे ते सपशेल विसरले असावे. मग त्या गाठीभेठींमागे काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांची कोणती देशभक्ती होती, हे नाना सांगतील का?
 
 
‘आप’मतलबी खोटारडेपणा!
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतविजयी झालेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले. मात्र, राष्ट्रकुल स्पर्धेत ६८ किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेत टोंगा देशाच्या टायगर लिली कॉकर लिमालीचा पराभव करणार्‍या भारताच्या दिव्या काकरान यांनी याबाबत अरविंद केजरीवालांना उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, ”अरविंद केजरीवाल आता अभिनंदन करीत आहेत. पण, यापूर्वी तुमच्याकडे खेळासंदर्भात सहकार्य मागितले तेव्हा तुम्ही लक्ष दिले नाही.” दिव्या यांनी केजरीवालांना उत्तर दिले म्हणून मग दिल्ली ‘आप’चे आमदार सौरभ भारद्वाज म्हणाले की, ”बहन, तुझा आम्हाला गर्व आहे, पण मला आठवत नाही की, तू दिल्ली राज्यासाठी खेळली आहेस. तू तर उत्तर प्रदेशाकडून खेळतेस. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी यांनी तुला सहकार्य केले नसेल, तर दिल्लीचे मुख्यमंत्री तुला नक्की सहकार्य करतील.”
 
थोडक्यात, सौरभ यांचे म्हणणे होते की, ”दिव्या या दिल्लीच्या खेळाडू नाहीत, तर उत्तर प्रदेशच्या खेळाडू आहेत. दिव्या यांनी केजरीवालांकडून नाही, तर योगी आदित्यनाथांकडून मदत मागावी.” यावर देशवासीयांचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू हे एका राज्याचे नसतात, तर ते सगळ्या राष्ट्राचे असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणार्‍या खेळाडूला विशेष राज्याशी बांधून टाकण्याचा अधिकार आपच्या आमदाराला आणि ‘आप’ पक्षाला कुणी दिला?
 
तसेच, दिव्या काकरान यांनीही सौरभ भारद्वाज आणि ‘आप’ला जोरदार प्रत्युत्तर दिले. २०११ ते २०१७ पर्यंत राष्ट्रीय स्तरावर दिल्लीतर्फे दिव्या खेळल्या आणि त्यांनी १७ सुवर्ण पदक मिळवून दिली, असे पुराव्यासकट जाहीर केले. दिल्लीतर्फे खेळणार्‍या खेळाडूंकडे दुर्लक्ष करून वर त्यालाच ‘तू कुठे खेळतेस, त्यांच्याकडून सहकार्य माग!’ असा उद्दाम सवाल करणार्‍या आम आदमी पार्टीचा खरा चेहरा उघड झाला आहे. ‘आप’चे राजकारण केवळ दिल्ली आणि पंजाबमधील हिंसक आंदोलनाचे समर्थन करण्यासाठीच आहे का? दिव्या काकरान नावाच्या खेळाडूला कशासाठी सहकार्य हवे आहे? सहकार्य केल्याने देशाला काय फायदा होईल, याचा सारासार विचार करायची केजरीवालांना गरज वाटली नाही. वर दिव्याला उत्तर प्रदेशची खेळाडूही ठरवले गेले. यातच ‘आप’चा ‘आप’मतलबी खोटारडेपणा दिसून येतो.
 
 
 
Powered By Sangraha 9.0