उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयाने विरोधी पक्षांनाही भगदाड?

11 Aug 2022 16:22:01


MVA
 
 
मुंबई : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोण विराजमान होणार? यामुळे महाविकास आघाडीत सध्या चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. 'विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावं', असा दावा महाराष्ट्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी गुरुवारी (दि. १० ऑगस्ट) ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेते पदासाठी शिफारस केल्याने त्यांची वर्णी लागली. ठाकरेंच्या याच निर्णयामुळे सध्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या मित्रपक्षांकडून नाराजीचे वारे वाहताना दिसतायत. इतकंच नव्हे तर ठाकरे गटातील अनेकानाही हा निर्णय रूचला नसल्याने अंतर्गत धूसफूस वाढीला लागली आहे.   
 
विरोधी पक्षात काम करण्याची आमचीही मानसिकता होती
"महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाही. राज्याच्या जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला होता. मात्र २०१९ मध्ये झालेल्या राजकीय घडामोडी नंतर आम्ही आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला होता. जनतेच्या हितासाठी सोनिया गांधींनी हा निर्णय घेतला असल्याने आमचीसुद्धा विरोधी पक्षात काम करण्याची मानसिकता होती.", असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मत आहे.
 
निर्णय समन्वयातून घ्यावे हीच अपेक्षा!
उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांच्याबद्दल घेतलेल्या निर्णयावर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "महाविकास आघाडीचे निर्णय हे समन्वयातून व्हावे, एवढीच काँग्रेस पक्षाची अपेक्षा आहे.", असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.
 
ज्यांचं संख्याबळ जास्त, विरोधी पक्षनेता त्यांचाच! 
"खरंतर ज्यांचं संख्याबळ जास्त असतं, त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली जाते. विधानसभेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असल्याने तिथे राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता झाला. विधान परिषदेत १२ लोकं शिवसेनेचे, १० राष्ट्रवादीचे, १० काँग्रेसचे आणि १ अपक्ष अशी साधारण संख्यारचना आहे. तर विधान सभेत राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे उपसभापतींच्या निर्णयानंतर अंबादास दानवे यांच्या नियुक्तीबद्दल आणखी वाद आम्हाला वाढवायचा नाही.", असे अजित पवार यांचे म्हणणे आहे.
 
त्यामुळे काँग्रेस पक्षाची नाराजी पाहता उद्धव ठाकरेंनी आघाडीतील पक्षांना विश्वासात न घेता तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयाने विरोधी पक्षांनाही आता भलं मोठं भगदाड पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0