सुप्रिया सुळेही करुणा मुंडेंची माफी मागणार का? चित्रा वाघ यांचा सवाल!

    11-Aug-2022
Total Views |

ss
 
मुंबई: महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचाही समावेश होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. "भाजपने राठोडांना क्लिन चिट देऊन आणले आहे. त्यांनी राठोडांची, त्यांच्या पत्नीची, त्यांच्या मुलांची आणि बंजारा समाजाची माफी मागायला हवी." असे त्या म्हणाल्या.
 
"जर संजय राठोड यांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची तर, तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार का? त्यामुळे उगाच शहाणपणाच्या गोष्टी करू नयेत." असे खडेबोल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावले आहे.
 
"राज्यात महाविकास आघाडी सरकार होते. त्यावेळी ज्या पद्धतीने करुणा यांची धिंड काढली, तिच्या गाडीत कशा पद्धतीने पिस्तुल ठेवण्यात आले, तिला कशा पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आले, हे संपूर्ण राज्याने बघितले आहे. त्यामुळे तुम्ही करुणा मुंडेंची (शर्मा) माफी मागणार का?" असा सवालही वाघ यांनी विचारला आहे.
 
राठोड यांच्या विरोधातील लढा चालूच राहणार असून ज्या पद्धतीने आमची आधी भूमिका होती, त्याच पद्धतीने हा लढा पुढेही सुरू राहील. याबरोबरच राठोड यांना महाविकास आघाडीने आणि ठाकरे सरकारनेच सर्वांत पहिले क्लीन चिट दिली होती, असा घणाघातही वाघ यांनी केला.