‘करो या मरो` : कराच गड्यांनो!

10 Aug 2022 12:25:40
 rahul & priyanka gandhi
 
 
 
देशाच्या तानाशाही सरकारविरोधात आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी आता ‘करो या मरो` सारखे आंदोलन करण्याची गरज आहे,” मी म्हणालो. पण, माझ्या बोलण्याकडे कुणीच लक्ष देत नाही बाबा. काय म्हणता ‘करो या मरो`म्ाध्ये काय करायचे आणि का मरायचे? हे काय विचारणे झाले? काय करायचे म्हणजे मोदी सरकारची निंदा करायची आणि का मरायचे म्हणजे आमच्यासाठी मरायचे!! आम्हाला सत्ता नाही, ती जर लोक मिळवून देत नसतील, तर मग लोकांनी का जगायचे? त्यामुळे आम्ही सत्तेत नाही म्हणून लोकांनी ‘करो या मरो` म्हणत आंदोलनं केली पाहिजेत.
 
  
मीच देशाची गरिबी हटवू शकतो. काय म्हणता, गेल्या 70 वर्षांत पणजोबा नेहरू, आजी इंदिरा आणि बाबा राजीव यांनी पण असेच म्हंटले होते. त्यांचा वारसदार म्हणूनच मी म्हणतो की, देशाची गरिबी मीच हटवू शकतो. आपल्याकडे काय कमी ‘आयडिया` आहेत. आलूपासून सोना बनवा, ही ‘आयडिया` मीच तर दिली होती. पण, माझे ‘टॅलेंट` देशाच्या उपयोगी पडू नये, म्हणून देशद्रोही लोकांनी त्या ‘आयडिया`ची टिंगल केली, तर ही एकच ‘आयडिया` आणि देशात प्रत्येक भारतीयाच्या घरी आज सोनं असतं सोनं...
 
 
इथून आलू तिथून सोनं. जाऊ दे, तर लोकांनी आता ‘करो या मरो`सारखे आंदोलन केले पाहिजे. आम्ही काही साधे लोक आहेात का? आम्ही काहीही केले आणि कितीही भ्रष्टाचार झालेला असू दे, आमच्यावर कारवाई तर सोडाच, पण आमच्याविरूद्ध शब्दही उच्चारण्याची हिंमत भाजपच्या सरकारची कशी झाली? आम्ही कोण आकाशातून आलेलो आहोत का की आमच्यावर कारवाई नको? असे विचारू नका! आमच्यामुळे घराणेशाहीचा बाजार सुरू आहे. आमची प्रेरणा घेऊनच देशभरात सगळीकडे घराणेशाही सुखनैव नांदते.
 
 
महाराष्ट्रात आमच्या मित्रपक्षाने नवे तेजस अस्त्र बाहेर काढलेच ना? राजघराण्यातला लोकांचा विशेष हक्क असतो, तो म्हणजे ‘राजा का बेटाही राजा बनेगा!` सत्ताधारी नेत्यांच्या घरात, कुटुंबात जन्मणे हे किती मोठे कर्तृत्व असते ते! मोदींनी हा नियम का तोडला? मोदींनी ‘अब राजा का बेटा ही राजा नही बनेगा,` असे सिद्ध केले म्हणून तरी लोकहो ‘करो या मरो` आंदोलन करा रे..नाही तर हा मी चाललो देश सोडून!!! मग बसा कंटाळत!!! मी नसेन तर मनोरंजनाच्या एक एक क्षणाला तरसाल!!! हे सगळ टाळायचे असेल, तर ‘करो या मरो` आंदोलन कराच गड्यांनो!
 
 
भोंग्यांची सवय खूप वाईट!
दोघेही दिल्लीला जातात, पण पाळणा काही हलत नाही,” असे माजी ‘बेस्ट सीएम` उद्धव ठाकरे उपरोधिकपणे म्हणाले होते. पण, काल मंत्रिमंडळाचा पाळणा हलला. मंत्र्यांनी शपथा घेतल्या. या अशा वेळी रोखठोक दूरदृष्टी संजयरावांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज ते असते तर? सकाळीच आपल्याला त्यांचे भव्यदिव्य विचार प्रासादिक आणि मधुर शैलीत ऐकायला मिळाले असते. केसांची झुल्फे उडवत त्यासोबत भुवयांचा विभ्रम सुरेख साधत त्यांनी मंत्रिमंडळाचे काय होणार, याबद्दल लोकांनी न विचारताही माहिती दिली असती. ‘पुढील 25 वर्षे महाविकास आघाडीच राहणार` अशी त्यांची खात्री होती. पण, ती 25 वर्षे कशी अडीच वर्षांत संपली काही कळलेच नाही. ना तुम जानो ना हम, अशीच अवस्था.
आज शिंदे आणि फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ जाहीर होत आहे, अशा वेळी खरंच किमानपक्षी तरी संजय राऊत हवे होते. ते नाहीत म्हणून त्यांची जागा आदित्यसाहेब भरून काढत होते. आदित्य साहेबांनी संजय यांची कमी जराही जाणवू दिली नाही. नवनवे शब्दप्रयोग ‘गद्दार` वगैरे बोलत त्यांनी मार्केटमध्ये हवा करण्याचे तंत्र अवलंबले. पण, म्हणे त्यांचीही तब्येत ठीक नाही. त्यामुळे ते घरी परतले, तर मग संजय यांचा बाणा कोण पुढे कायम राखणार? पण, महाविकास आघाडी कोसळल्यानंतर थोरले साहेब पण त्यांचे आवडते फेसबुक लाईव्ह जास्त करत नाहीत. त्यांनी तरी एखाद्दुसरे फेसबुक लाईव्ह करायला हवे. पण, तसे काही चिन्ह दिसत नाही.
हो, मात्र सुप्रिया सुळे ताई वांग्याची शेती राखत काहीतरी बोलल्या. अर्थात, त्यांच्या बोलण्याला अजून मनोरंजनाची ‘डेप्थ` यायची आहे. पण, शिकतील हळूहळू. नाही शिकल्या तरी काय आहे? वडिलांनंतर मुलगा किंवा मुलगी गेला बाजार पुतण्या वगैरे ही संकल्पना महाराष्ट्रात रूजवली असल्याने त्यांनी काहीही केले नाही तरी राजकारणात त्या टिकू शकतात. त्यांनी प्रतिक्रिया दिली की, मंत्रिमंडळात महिलांना स्थानच नाही. पण, अजून मंत्रिमंडळाचा विस्तारही होऊ शकतो आणि होणार आहे, हे सुळेबाई विसरल्या. असो. नव्या मंत्रिमंडळाबाबत काही वादचर्चा आहेतच. त्यावर पुन्हा केव्हातरी सविस्तर. सध्या तरी कसे सुने सुने वाटते. काहीही झाले की, भोंगे ऐकायची सवय झाली होती दुसरे काय?
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0