पाकमध्ये ‘प्राणी विकणे आहे`

10 Aug 2022 11:47:57
lion 
 
 
 
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने पाकिस्तानच्या तिजोरीतही नुसताच खडखडाट आहे. महागाई तिथे दररोज नवनवीन उच्चांक गाठते आहे. पैसे नसल्याच्या कारणावरून पाकिस्तानातील प्राणिसंग्रहालयांची अवस्थाही तितकीच बिकट. त्यातच लाहोर येथील प्राणिसंग्रहालयाने तर कहर केला असून, चक्क प्राणिसंग्रहालयातील प्राणीच विक्रीला काढले आहेत.
 
 
महागाईने होरपळलेल्या नागरिकांसोबतच आता मुक्या प्राण्यांनाही महागाईच्या झळा सोसाव्या लागत असून पाकिस्तानचा निर्दयीपणा पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना खायला घालायलाच पैसे नसल्याने येथील अधिकाऱ्यांनी चक्क प्राणी विक्रीला काढले. यामध्ये सिंह, मोठे मांजर आणि वाघांचा समावेश असून त्यांचा लिलाव होणार आहे. खासगी संस्थांना हे प्राणी विकले जातील. प्राण्यांच्या विक्रीमुळे दररोज लागणारी जागा आणि पैशांची बचत होईल, या उद्देशाने प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांनी हा निर्दयी आणि संतापजनक निर्णय घेतला आहे.
 
  
दरम्यान, लाहोर येथील प्राणिसंग्रहालयाचे उपाध्यक्ष अहमद जनजुआ यांनी सांगितल्यानुसार, दोन ते पाच वर्ष या वयोगटातील 12 सिंहांचा दि. 11 ऑगस्ट रोजी लिलाव केला जाणार आहे. हे सर्व सिंह आफ्रिकन असून तब्बल दीड लाख पाकिस्तानी रुपये म्हणजे भारतातील 50 हजार रुपये इतकी एका सिंहाची किंमत निश्चित करण्यात आली आहे. एकूण 12 पैकी तीन सिंहिणी असून खासगी ‘आवास योजना` किंवा पशुपालनाची आवड असणाऱ्या लोकांना सिंहिणी सवलतीच्या दरात देण्याचा प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे.
 
 
पाकिस्तानातील बाकीची प्राणिसंग्रहालये विस्तार आणि क्षेत्रफळानुसार लहान आहेत. मात्र, लाहोर प्राणिसंग्रहालय मोठे आणि विस्तीर्ण असल्याने प्राण्यांच्या देखभालीसाठी मोठा खर्च येतो. दिवसेंदिवस हा खर्च वाढत चालल्याने नाईलाजाने प्राणी विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विक्रीतून येणाऱ्या पैशातून उत्पन्न मिळवण्याचा संग्रहालय व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. 142 एकरांवर पसरलेल्या या प्राणिसंग्रहालयात जवळपास 40 सिंहांचे वास्तव्य असून त्यासाठीच हे प्राणिसंग्रहालय पाकिस्तानात प्रसिद्ध आहे.
 
 
प्राणी विकण्याचा पाकिस्तानातील हा काही पहिला प्रयत्न नाही. गेल्या वर्षीही तब्बल मर्यादित जागा असल्याचे कारण पुढे करत तब्बल 14 सिंहांची विक्री करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, पाकिस्तानात म्हशींपेक्षा सिंह स्वस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे दोन लाख पाकिस्तानी रुपये किमतीच्या चार बकऱ्या आहेत. त्यामुळे इमरान यांची प्राणीप्रेमाची आवड समोर आली होती.
 
 
परंतु, आता एका माजी पंतप्रधानाला इतकी मोठ्या प्रमाणावर प्राणीप्रेमाची आवड असूनही पाकिस्तानवर सध्या प्राणी विकण्याची वेळ येणं, हे दुर्दैवी म्हणावे लागेल. पाकिस्तान सध्या श्रीलंका होण्याच्या वाटेवर आहे. जो जो चीनच्या नादी लागला, त्याचा कार्यभाग बुडाला, याप्रमाणे श्रीलंकेने चीनच्या वळचळणीला जाऊन स्वतःचं वाटोळं स्वतः करून घेतलं आणि त्यानंतर आता तर बांगलादेशही हळूहळू त्याच मार्गावर आहे. परंतु, बांगलादेशने वेळीच चीनच्या चाली ओळखल्याने त्यांचा श्रीलंका होणार की नाही, याविषयी आताच सांगणे कठीण आहे.
 
 
माणसांसमोर रोजच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने तिथे प्राण्यांच्या जीवममरणाचा विचार कोण करेल म्हणा... सामान्य पाकिस्तान जनता संघर्ष करत असताना मुक्या जनावरांचा विचार करणार तरी कोण? इमरान खान असो की आताचे शाहबाज शरीफ सरकार, सत्ताबदलानंतरही पाकिस्तानातील परिस्थिती ‘जैसे थे`च आहे. आज पैसे नाहीत म्हणून प्राणी विकले, भविष्यात तर तिथे आणखीन काय काय विकायची वेळ येईल, याचे उत्तर तूर्त तरी देता येत नाही. भारताला वारंवार स्वतःच्या ताकदीची जाणीव करून देण्यासाठी दर्पोक्ती करणाऱ्या पाकिस्तानला आता त्यांच्या देशातील प्राणिसंग्रहालयातील प्राणीही विकावे लागत असतील, तर यासारखी दुर्दैवी बाब नाही!
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0