नुपूर शर्मा प्रकरणाचं पुढं काय झालं?

10 Aug 2022 21:40:11
nupur sharma
 
 
 
नवी दिल्ली : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या कथित अपमानजनक टिप्पण्यांबद्दल नोंदवलेले प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) एकत्र करून ते दिल्ली पोलिसांना हस्तांतरित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले आहेत.
 
 
देशभरात विविध ठिकाणी दाखल एफआयआर दिल्ली येथे स्थानांतरित करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्या. जे. बी. पार्डिवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याच्या जीवाला आणि सुरक्षेस असलेल्या गंभीर धोक्याची दखल न्यायालयाने यापूर्वीच घेतली आहे. त्यामुळे नुपूर शर्मा यांच्याविरोधातील सर्व एफआयआर हस्तांतरित करून दिल्ली पोलिसांकडे तपासासाठी हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.
 
दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्सद्वारे (आयएफएसओ) एफआयआरची चौकशी केली जाईल. त्याविषयी न्यायालयाने म्हटले की, आयएफएसओला खटला तार्किक अंतापर्यंत नेण्यासाठी इतर पोलिस दलांकडून मदत घेण्यास स्वातंत्र्य असेल. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत नुपूर शर्मा यांना दिलेले अंतरिम संरक्षण कायम राहील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे नुपूर शर्मा यांना सध्याच्या आणि भविष्यातील एफआयआर रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकारदेखील कायम ठेवण्यात आला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0