हरहुन्नरी कुणाल

10 Aug 2022 20:21:43
 
kunal
 
 
अभिनयासोबतच लेखनातही आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या ठाण्यातील कुणाल प्रमोद लिमये या हरहुन्नरी कलावंताविषयी...
 
अभिनयासोबतच लेखन करणार्‍या ठाण्यातील कोपरी येथील कुणाल लिमये याचा जन्म दि. २४ मे, १९७७ रोजी मुंबईत झाला. आजोबा, आत्या आणि वडील असे सर्वच जण रिझव्हर्र् बँकेत नोकरीला असल्याने कुणालचे बालपण आनंदात गेले. घरात शिक्षणासाठी पुरक वातावरण होते. कुणालचे प्राथमिक शिक्षण गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये झाले, तर उच्च माध्यमिक शिक्षण ठाण्यातील सरस्वती सेकेंडरी या मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. अंगभूत विद्वत्ता ठासून भरलेली असल्याने करीअर करण्यासाठी कुणालला सर्वच क्षेत्रे खुणावत होती. माटुंगा येथील ‘पोतदार कॉलेज ऑफ कॉमर्स’ येथून ‘बी.कॉम’ पूर्ण केल्यानंतर चर्चगेट येथील ‘गव्हर्नर्मेंट लॉ कॉलेज’मधून त्याने ‘एलएलबी’ची पदवी मिळवली.
साधी राहणी, उच्च विचार आणि कठोर परिश्रम अशा धाटणीच्या कुणालला बालपणीपासूनच अभिनयात रूची होती. तो राहत असलेल्या परिसरात होणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव तसेच अन्य सण-उत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात कुणाल सादरीकरण करीत असे. त्याचबरोबर महाविद्यालयातील एकांकिका स्पर्धेतही भाग घेऊन ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) स्पर्धेतही ठसा उमटवला होता. वडिलांचा दीर्घकाळ नाट्यक्षेत्राशी संबध असल्याने त्याला या क्षेत्रात पदार्पण करण्यास प्रोत्साहन मिळाले. नाट्यक्षेत्रात वडिलांच्या बर्‍यापैकी ओळखी होत्या. त्यामुळे वयाच्या २०व्या वर्षी मराठी रंगभूमीवरील ख्यातनाम, ज्येष्ठ निर्माते मोहन वाघ यांच्या ’चंद्रलेखा’ नाट्यसंस्थेत पहिल्यांदा कुणालला संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने करीत तब्बल पाच वर्षे रंगभूमी गाजवली. ‘चंद्रलेखा’ने मुंबई दूरदर्शनसाठी बनवलेल्या ’गरूडझेप’ या नाटकात कुणालने साकारलेली छत्रपती शिवाजी महारांजांची भूमिका विशेष गाजली होती. विशेष म्हणजे, या नाटकात प्रख्यात नट प्रभाकर पणशीकर हेदेखील होते. पुढे ‘चंद्रलेखा’च्या ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘चेहरा मोहरा’, ‘गोड गुलाबी’ या नाटकात संधी मिळाली. ‘गोड गुलाबी’मुळे तर थेट अमेरिका वारीची संधी त्याला मिळाली.
 
‘आयएनटी’च्या आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, ‘अस्तित्वाची कल्पना एक अविष्कार अनेक’ या खुल्या एकांकिका स्पर्धेत कुणाल सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. राज्य नाट्य स्पर्धांमधून दोन-तीन वर्षे विविध भूमिका साकारल्या. व्यावसायिक रंगभूमीवर काम करायची इच्छा असल्याने लेखक, दिग्दर्शक अशोक समेळ यांनी सर्वप्रथम त्याला ‘घर अण्णा देशपांडेचं’ या व्यावसायिक नाटकात प्रभाकर पणशीकरांसोबत काम करण्याची संधी दिली. या माध्यमातून अभिनेते-दिग्दर्शक असलेले सचिन गोस्वामी, बाळ रणखांबे, अशोक समेळ, दिलीप कोल्हटकर, प्रमोद शेलार, वैभव पवार आदींच्या दिग्दर्शनाखाली कुणालने विविध नाटकांमध्ये काम केले.
 
एकीकडे रंगभूमी गाजवत असताना कुणालने मराठी चित्रपटातही जम बसवला. २०४ मध्ये ‘उत्तरायण’, २००५ मध्ये ‘बेभान’, २००६ साली ’असा मी काय गुन्हा केला’, तर२००७ साली ’भरत आला परत’ इत्यादी चित्रपटात भूमिका केल्या. रंगभूमीवरील नाटके त्याकाळी सीडीमध्ये रुपांतरित केली जात, अशा सीडी माध्यमातील अनेक मराठी नाटकांमध्ये कुणालने काम केले आहे. विशेष म्हणजे, ’मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या ‘सीडी’ माध्यमासाठी कुणालने केलेली नथुरामची भूमिका बरीच गाजली होती. लेखक-दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांच्या ‘केव्हांतरी पहाटे’ या नाटकात कुणालने नामवंत अभिनेते रमेश भाटकर याच्यासोबत अभिनय केला. ‘कृपासिंधु’ या श्री स्वामी समर्थांवरील मालिकेतही ’चोळप्पा’ या शिष्याची भूमिका त्याने साकारली.
रंगभूमी आणि सिनेक्षेत्रात वाटचाल करीत असताना कुणालला एका टिव्ही मालिकेवर विडंबनात्मक लेखन सूचले. तिच त्याची ‘पहिली ऑप्शन’ ही एकांकिका दूरदर्शनच्या विविध भाषिक वाहिन्यांच्या स्पर्धेत पहिल्या नंबरची पुरस्कार विजेती एकांकिका ठरली.त्यानंतर ‘अपूर्णांक’, ‘घडले आहे’, ‘घडते आहे’, ‘घडणार आहे’, ‘सिंफनी’ यासह बर्‍याच एकांकिका त्याने लिहिल्या. ‘सिंफनी’ या एकांकिकेचे गुजराती, इंग्रजी तसेच बंगाली भाषेतही रुपांतरित प्रयोग झाले. दूरदर्शनच्या ‘दिशा’ या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले तसेच वर्षा उसगावकर यांच्यासोबत कुणालने काम केले. सिने-नाट्य क्षेत्रासह टिव्ही मालिकातून अनेक नामवंत अभिनेते- अभिनेत्रीसोबत कुणालने काम केले आहे.
 
महाविद्यालयीन जीवनात एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनय तसेच लेखनासाठी अनेक पुरस्कार कुणालने पटकावले. याशिवाय ‘आयएनटी’ तसेच ‘अस्तित्व’च्या एकांकिका स्पर्धां आणि राज्य हौशी नाट्य स्पर्धेत अभिनयासाठी कुणालला पुरस्काराने गौरविण्यात आले. दूरदर्शनचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ आणि ‘साहाय्यक अभिनेता’ हे मानाचे पुरस्कार एकाच वर्षी कुणालला मिळाले. अशा या प्रतिभावान हरहुन्नरी कलावंतास भावी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
Powered By Sangraha 9.0