नवी दिल्ली : महागाई, पेट्रोल- डिझेल दरवाढ या सर्वच गोष्टींनी ट्रस्ट झालेल्या सर्वसामान्य भारतीयांना दिलासादायक घटना घडली आहे. भारतात आयात होणाऱ्या खाद्यतेलाच्या किंमतीत २०० रुपयांपर्यंतची मोठी घट झाली आहे. इंडोनेशिया, मलेशिया या देशांनी ते निर्यात करत असलेल्या खाद्यतेलांच्या किमतीत घट केल्यामुळे भारतातील किमतींमध्येही घट झाली आहे.
भारत सर्वात मोठ्या खाद्यतेल आयातदार देशांपैकी एक आहे. प्रामुख्याने सूर्यफूल तेल, पामतेल यांची भारतात मोठ्याप्रमाणावर आयात केली जाते. युक्रेन हा जगातील सर्वात मोठा सूर्यफुल उत्पादक देश असल्याने, रेंगाळलेल्या रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात टंचाईची स्थिती निर्माण झाली. भारतातवरही याचा मोठा परिणाम झाला आणि त्यातून खाद्यतेलांच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांकडून पामतेलाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी भारताकडून विशेष प्रयत्न केले गेले होते.
भारतात वाढलेल्या खाद्यतेलांच्या किंमती आटोक्यात याव्यात यासाठी भारत सरकारने आयात शुल्कात कपात केली होती. इंडोनेशिया, मलेशिया या देशांकडूनही भारताला होणाऱ्या निर्यातीच्या शुल्कात कपात केली गेली होती या सर्वांचा परिणाम म्हणून भारतात पामतेल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेल यांच्या दरात प्रत्येकी २०० ते २५० रुपयांची घट झाली आहे. प्रति १५ लिटर मागे सूर्यफूल तेल २५०० रुपये, पामतेल २२५० रुपये तर सोयाबीन तेल २३०० रुपयांना भारतीय बाजारात उपलब्ध होत आहे. भारत आजही खाद्यतेलांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आयातीवरच अवलंबून आहे. तेलबियांचे भारतातील उत्पादन वाढावे यासाठी भारतात सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.