मूर्तिशास्त्राचे जेष्ठ अभ्यासक डॉ. गो.बं.देगलूकर यांना आज १ऑगस्ट रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.त्यानिमित्त त्यांनी बाबासाहेबांबद्दल व्यक्त केलेले हे मनोगत.
महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान च्यावतीने नुकतीच विश्वस्त अभिषेक जाधव आणि राधा पुरंदरे-आगाशे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आणि आजच्या या पुरस्कार सोहोळ्याचे निमित्त साधून मुंबई तरूण भारत ने डॉ. गो.बं. देगलूरकर सरांशी चर्चा केली यात बाबासाहेबांबद्यल सरांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या शब्दात आम्ही देत आहोत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळणे याचा विलक्षण आनंद आहेच,तो अवर्णणीय आहे.बाबासाहेब आणि माझा परिचय १९५३ पासूनचा.आम्ही अनेकदा अनेक कार्यक्रमात भेटलो.त्यांचा सहवास म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवित ते छत्रपती शिवरायांच्या काळात सैर करून आणीत असत.अगदी एखाद्या ध्येयाने,श्रध्देने त्यांनी हा देदिप्यमान इतिहास जगासमोर आणला.खर्या अर्थाने शिवाजी महाराजांचे कार्य त्यांनी जिवंत ठेवण्यात अपार परिश्रम घेतलेत.
बाबासाहेबांनी केवळ इतिहास लिहिला नाही तर ते अक्षरशः हा इतिहास जगले असे मला वाटते.त्यांचे जीवन एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अखंड तेवणारे आहे.त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी मला या निमित्ताने प्रेरणा देत आहेत. तसा मी कॉलेजध्ये इतिहासाचा विद्यार्थी.शिवाजी द ग्रेट अभ्यासतांना मला ही गोडी निर्माण झाली, मात्र चक्क बाबासाहेब पुरंदरेंचा सहवास मला लाभणे हे मी माझे भाग्य समजतो. कारण इतिहास लिहिणार्या नव्हे तर जगणार्या व्यक्तीसोबत राहण्याची संधी मला मिळाली हा आनंद माझ्यासाठी विशेष आहे. याहून विशेष म्हणजे यापूर्वी मला जे पुरस्कार मिळाले त्यातील काही बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते मला प्रदान करण्यात आले आणि आज त्यांच्याच नावाचा पुरस्कार मिळणे हा आनंद खुप आत्मिक समाधान आणि चिरंतन असा आहे.
त्यांचा माझ्यावर विशेष लोभ होता. जेव्हा केव्हा आमच्या भेटी होत असत ते भरभरून उत्साहाने बोलत असत.केवळ शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिणे हे त्यांचे ध्येय नव्हते तर त्या काळात शिवाजी महाराजांना प्रत्येकवेळी कशा प्रसंगांना,संकटांना सामोरे जावे लागत असे हे प्रत्यक्ष अनुभवून त्यांनी इतिहास लेखन केले आहे. त्यामुळे त्यातील जिवंतपणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कतृत्व लोकांना अधिक भावते असे मला वाटते.अगदी समरस होऊन त्यांनी हे कार्य तडीस नेले यात शंकाच नाही.
हे चरित्र केवळ लिहून ठेवणे येथपर्यंत त्यांनी आपले कार्य थांबविले नाही तर हे कार्य लोकांपर्यत नेण्याची त्यांची धडपड नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.त्यांनी खर्या अर्थाने हा शिवचरित्राचा इतिहास लिहून महाराष्ट्र धर्माचं संकीर्तन केलं असं मला वाटतं.
शिवाजी महाराजांवरील महानाट्यावर लोकांनी भरभरून प्रेम करणं ही त्यांच्या या कतृर्त्वाची पावती आहे. १५० लोकांना किंबहूना कलाकारांना घेऊन जिवंत घोडे आणि तो काळ साकारणं हे काही सोपं काम नाही.ते इतक्या प्रभावीरित्या त्यांनी साकारलं की छत्रपतीं शिवाजी महाराज नव्या पिढीपर्यंत अत्यंत प्रभावीरित्या माहित झालेत.
जिज्ञासा हा बाबासाहेबांचा गुण अतिशय मौलिक असा वाटतो. इतर विषयात देखील त्यांनी ही जिज्ञासा प्रकट करून माहिती गोळा केली. माझ्या मूर्तिशात्रातील काही माहिती जाणून घेतांना ते नेहमी पांडुरंगाची योगस्थानक मूर्ती, नर्मदा नदीचे वाहन, श्रीगणेशमूर्तीची उजवी सोंड याबाबत माझ्याशी चर्चा करीत असत. केवळ इतिहास हा त्यांचा आवडता प्रांत होता पण एक राष्ट्रभक्त बाबासाहेब मला विशेष भावतात. १९६२ च्या चीनच्या आक्रमणानंतर त्यांनी नागपूरातील झालेल्या व्याख्यानाचे मिळालेले पैसे हे आपल्या देशातील लष्कर सेवेसाठी दिले होते.
सुधीर फडके, भाऊराव वाकणकर, बिंदुमाधव जोशी यांच्या समवेत ते गोव्याच्या तुरूंगात देखील होते.नगर हवेली संग्रामात त्यांनी सक्रीय सहभाग घेत आपल्या देशभक्तीचा परिचय देखील दिला. लोकसंग्रह हा त्यांचा आणखी एक गुण मला विशेष भावतो.
बाबासाहेब पुरंदरे या महान व्यक्तीच्या नावे मिळणारा हा पुरस्कार या पुण्यनगरीत घेतांना त्यांच्या सहवासातील आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणे नक्कीच सुखावह आहे.
- अतुल तांदळीकर