पुणे : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दोन दिवसाच्या राजधानी दिल्ली दौऱ्यावर आहेत. ९ जून २०२२ रोजी दिल्लीतून रात्री ९ वाजता मुख्यमंत्री शिंदे विमानाने थेट पुणे विमानतळावर उतरणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुणे मार्गे सोलापूरचा प्रवास मुख्यमंत्री करणार आहेत.
दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण पंढरपूर येथे शासकीय पूजेसाठी जाणार असल्याचे जाहीर केले होते. ९ जून २०२२ रोजी दिल्ली येथील त्यांचे शासकीय कार्यक्रम आटोपल्यावर शिंदे रात्री विमानाने पुणे येथे जाणार आहेत. पुण्यात त्यांचे कोणतेही शासकीय कार्यक्रम नाहीत. त्यामुळे पुणेमार्गे सोलापूरला जाऊन रात्रीचा मुक्काम शिंदे सोलापुरात करणार आहेत.
१० जून २०२२ रोजी सोलापुरातून पंढरपूरकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयाण करणार आहेत. दरवर्षी पंढरपुरातील विठ्ठल-रुखमाई मंदिरात आषाढी एकादशीच्या पूजेचा मान हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मिळतो. त्याप्रमाणे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त आयोजित शासकीय पूजेसाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुखमाई मंदिरातील पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.