प्रारब्ध लडी उलगडणारा कथाकार : जी. ए. कुलकर्णी

    09-Jul-2022
Total Views |

kulakarni
 
 
 
मराठी साहित्यातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि लोकप्रिय घाट म्हणजे कथा. गेल्या ४०-५० वर्षांमध्ये मराठी कथा अनेक अंगाने विकसित होताना आपण पाहिली.जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांनी या घाटाला (फॉर्म) एक अतिशय सशक्त अशी झळाळी देत तिला महाकाव्याच्या मखरात नेऊन बसवले. जीए यांची जन्मशताब्दी आज दि. १० जुलै रोजी प्रारंभ होत आहे. त्या निमित्ताने या कथाकाराच्या वाड्.मयीन विश्वाची ही धावती सैर...
 
 
आपल्या आयुष्यात प्रवेश करणार्‍या छंदांचे आणि त्यातून निर्माण होणार्‍या आनंदपर्वांचे हळूहळू विकसित होणारे टप्पे असतात. जसे की लहानपणी आपण एकदम काही गंभीर आणि तात्विक वाचायला जात नाही. कारण, तेवढी आपली समज वाढलेली नसते. सुरुवातीला ‘चांदोबा’, ‘कुमार’, ‘कॉमिक्स’ असे वाचत वाचत आपण थोड्या कळत्या वयात ‘श्यामची आई’पासून सुरुवात करून रहस्यकथांपाशी येतो. मग कालांतराने पुलं, वपु, दमा आपल्या आयुष्यात येतात. दरम्यान आपली मानसिक आणि बौद्धिक भूक वाढीस लागली, तर मात्र हे पुरेसे होत नाही. अधिक समृद्ध, अधिक वास्तववादी, भाषिक आणि वैचारिक स्पष्टता देणारे साहित्य/कला /चित्रपट आपल्याला साद घालू लागतात. माझ्या या जडणघडणीच्या काळात मी मुंबईत असल्यामुळे माझी पाऊले जहांगीर आर्ट गॅलरीकडे वळली. छबिलदास, पृथ्वी थिएटरने नाटक कसे असते, हे दाखून दिले. ‘राशोमान’, ‘बायसिकल थिव्हज’ने चित्रपटाचे सामर्थ्य आणि सौष्ठव दाखवले. याच भारावलेल्या काळात ‘काजळमाया’ हा कथासंग्रह माझ्या हाती पडला. वाचायला लागलो आणि जीए यांच्या सशक्त लेखणीची ताकद एकेक पानातून जाणवू लागली. मी ‘विदूषक’ या कथेपाशी पोहोचलो. वाचली आणि पुस्तक समोर ठेवून एक कडकडीत सलाम ठोकला.
 
 
‘विदूषक’, ‘विजयराज’, ‘चंचला’, ‘अभयराज’, ‘धृवशीला’ या व्यक्तिरेखांनी मनाचा ताबा कसा आणि कधी घेतला, हे कळलेही नाही. आपण या कथेत अक्षरशः टाईम मशीनवर बसून मध्ययुगात पोहोचतो. यातील युक्तिवाद आणि प्रोजेक्शन्स इतकी तर्कशुद्ध आहेत की, कल्पनाशक्तीचे इमले समोर दिसत असूनही कथा वास्तवतेची डूब देत राहते. ही कथा म्हणजे एक प्रकारचा बुद्धिबळाचा भन्नाट सामनाच आहे. एखादा निष्णात खेळाडू आपल्या पुढच्या 15-20 चाली ठरवू शकतो, प्रतिस्पर्ध्याच्या सर्व संभाव्य चाली लक्षात घेत आपली भूमिका पक्की करतो आणि आपले प्यादे पुढे सारतो. हा सर्व खेळ पाहताना प्रेक्षक दंग होऊन जातात. जीए या कथेच्या वाचकांना हाच अनुभव देतात. आपल्या प्रतिभेला विदूषकाच्या मल्लीनाथीमध्ये असे विरघळून टाकतात की, एक घोटीव आणि संपृक्त असा आकार घेत कथा तोर्‍यात उभी राहते. ही कथा तब्येतीत, निवांत आणि ताणरहित वातावरणात वाचावी अशी आहे. या दीर्घकथेवर अतिशय सुंदर अशी रंगमंचावर नेण्याजोगी संहिता बेतता येऊ शकते. कुणी ही कथा नीट समजून घेऊन हा प्रयत्न मनापासून केला, तर एक सुंदर कलाकृती रसिकांना पाहायला मिळेल. ‘काजळमाया’ या संग्रहातल्या बहुतांशी कथा या ऐसपैस आणि कथाजगतातल्या मेरुमणी ठराव्यात, अशा आहेत. कथा ही वाचकांवर प्रभाव टाकते. व्यक्ती आणि प्रसंगांतून अनेक उत्कटभावनांचे दर्शन घडवते. तरीही वाचकांशी त्या कलाकृतीचे नाते काही अंतर राखूनच उमलते. कादंबरीतून मात्र आपणही त्या भोवतालाचा भाग आहोत की काय, अशी भावना निर्माण होऊ शकते. जीएंच्या या कथा हे दोन्ही स्तर कवेत घेतात. कारण, एकीकडे त्यांच्या कथांमधील व्यक्तिरेखा आपल्याच मोहोल्ल्यातल्या वाटतात, तर दुसरीकडे जगण्यातल्या निरर्थकतेचे, नियतीशरणतेचे काळेकुट्ट आणि अभद्र वाटावे, असा व्यापक कॅनव्हास ठेवत अंतिम सत्याच्या पायथ्याशी आणून उभे करतात.कथांमधील रुपकांमधून, व्यक्ती-व्यक्ती संबंधाच्या अतिसूक्ष्म निरीक्षणातून ते वरवर भडक वाटेल, असे पण अतिशय वस्तुनिष्ठ चित्रण आपल्यासमोर ठेवतात. रंजकता हा त्यांच्या साहित्याचा स्थायीभाव नाहीच मुळी.त्यामुळे सतत प्रासादिक, कल्पित, अतिरंजित वाचायची सवय झालेल्या वाचकांना या कथांमधील दाह सोसत नाही. या कथा वाचून झाल्यानंतर वाचानानंदाबरोबरच कमालीचे रितेपणही जाणवते. केवळ शब्दसंपत्तीवर आणि रुपकांच्या ताकदीवर हा माणूस आपल्यावर राज्य करत नाही, तर भाषेतील लयीबरोबर वास्तवतेचे बियाणेही ते आपल्या कथांमधून पेरतात आणि आपल्याला त्या सकस भूमीशी आपले सेंद्रिय नाते निर्माण करतात.
 
 
ढोबळमानाने विचार केला, तर जीएंच्या कथा ‘शोकांतिका’ या सदरात मोडतील. एक वाचक म्हणून शोकांतिकेकडे आपण ‘एक करूण अंत’ म्हणून आणि नियतीचा कुटील डाव म्हणून पाहतो. गंमत अशी की, हे लेखकमहाशय तो जगण्यातला एक अविभाज्य भाग म्हणून स्वीकारतात. त्यामुळे या कथा वाचकांवर होऊ घातलेल्या परिणामांचा विचार न करता एक तटस्थ कलाकृती म्हणून आपल्या समोर येतात. त्यांच्या कथांमधून चेटूक, भूतपिशाच्च, भानामती असे प्रकार ही येतात. पण, ते अंधश्रद्धेची दवंडी पिटण्यासाठी येत नाहीत. माणसाच्या जगण्यातल्या असाहाय्यतेचे दर्शन घडवण्यासाठी ते येतात. मानवी आणि अति मानवी यामधील धूसर सीमारेषा सांगण्यासाठी येतात. माणसांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा यांचा अनादर न करता येतात. गमतीचा भाग असा की, या सगळ्या रूढी-परंपरांची सकारात्मक दखल घेणारे जीए धर्मसंस्थांबद्दल कडवटपणे व्यक्त होताना दिसतात. त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे- “मी कदाचित चंबळ खोर्‍यातला अट्टल दरोडेखोर होऊ शकेन, पण मी कधी एखाद्या स्वामीचा, मठाचा, व्यक्तीचा शिष्य होऊ शकत नाही.” अध्यात्मिक उन्माद हा त्यांना मानव जाती विरुद्धाचा कट वाटतो. तरीही श्रद्धा-अंधश्रद्धा याचा मानवी आयुष्यातला सहभाग ते नाकारत नाहीत. जीएंच्या कथा म्हणजे महाकाव्य आहेत, असे अनेक समीक्षक जेव्हा म्हणतात तेव्हा त्यातील खोली, व्याप्ती आणि मानवतेला समग्र स्पर्श करणारी त्यातील दृष्टी त्यांना अभिप्रेत असावी.
 
 
जीए हे माणूसघाणे होते, त्यांना माणसात रमायला अजिबात आवडायचे नाही, हा त्यांच्यावर नेहमी होणारा आरोप. पण, त्यांच्या कथा मात्र अनेकविध माणसांनीच गजबजलेल्या दिसतात. एवढी चित्रविचित्र, वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेली, विद्याविभूषित, कुणी अशिक्षित,गावंढळ माणसे त्यांना कुठे बरे भेटली असतील, असे वाटून जाते. ज्या तर्‍हेने ते या माणसांना फळांवरील सालींसारखे सोलून आपल्यासमोर मांडतात, त्यावरून हा निव्वळ कल्पनाशक्तीचा भाग आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. प्रत्येक माणसाचे इवलेसे भावविश्व सागरासारखे अफाट असते, हे त्यांच्या कथांनी आपल्याला दाखवून दिले.
 
 
‘निळा सावळा’, ‘रक्त चंदन’, ‘हिरवेरावे’, ‘पारवा’, ‘सांजशकून’, ‘पिंगळा वेळ’, अशा कथासंग्रहांमधून त्यांनी माणूस आणि नियतीच्या खेळ याचे भावबंध दाखवले आहे. भाषेला पोत असतो म्हणजे काय, हे पाहायचे असेल, तर त्यांची कोणतीही कथा उलगडून वाचावी. रांगडी, राकट, खडबडीत, हृदयाचा ठोका चुकवणारी भाषेची विविध रूपे दाखवून त्यांनी आपल्याला स्तिमित करून सोडले. रूपकांचा वापर करताना तर त्यांची प्रतिभा शक्ती रसनिष्पत्तीचा उत्कर्ष बिंदू गाठताना दिसते.
त्यांच्या उपमा, वर्णने ही त्या त्या व्यक्तीची, प्रसंगांची नेमकेपणाने मांडणी करत कथेतील वास्तव अधिक गडद करतात. केवळ प्रौढांसाठी नाही, तर मुलांसाठीही ते लिहिते झाले. जीएंचे साहित्य न आवडणारा त्यांच्यावर टीका करणारा एक गट आपल्याकडे आहेच. ‘जीएंचे साहित्य म्हणजे मोठ्यांचा ‘चांदोबा’ मासिक आहे,’ अशी टीकाही केली गेली. पण, मुलांसाठी लिहितानाही त्यांनी पारंपरिक चांदोबाच्या कक्षा ओलांडून अद्भुततेला एक सर्वसामावेशकत्व दिले.त्यामुळे ‘बखर बिंबाची’ आणि ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ ही पुस्तके मोठ्यांनाही तेवढाच आनंद देतात, हे मुद्दाम आवर्जून सांगावेसे वाटते .
 
 
त्यांच्या लेखनाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, कथा प्रारूपाच्या आवाक्याबाहेरचा काही आशय त्यांच्या कथांमधून डोकावतो. माणसाची अगतिकता, जगण्यातली निरर्थकता आणि एकूणच हात धुवून मागे लागलेली नियती यांनी आपले आयुष्य पूर्णपणे झाकोळून गेले आहे, असे सार व्यक्त करूनच त्यांची लेखणी थांबतनाही तर त्या कथा गाभ्याचे वाचकांच्या अंतर्मनात प्रतिष्ठापना करून त्यांच्या मनात आपल्या अस्तित्वाबद्दलच प्रश्नांचं मोहोळ ते उठवतात. हे त्यांच्या कथेचे सूर मारणे हे ‘माणसाचे काय माकडाचे काय’ , ’स्वप्न’ , ’कळसूत्र’ या कथांमधून अनुभवायला येते. मानवी आकलनाच्या मर्यादा असतात, या गृहितकाला सकारात्मक रितीने सामोरे जात ते आपल्या कथांमधून वाचकांची नियतीशी गळाभेट घडवतात.
 
 
जीए कथेचे बांधकाम अतिशय निगुतीने करतात. विषयानुरुप त्याची रचना केलेली असते. पौराणिक,मध्ययुगीन कथानक असेल, तर हेमाडपंथी, गॉथिक शैलीत त्यांचे शब्द आणि परिच्छेद तो काळ समोर उभा करताना दिसतात. नाटकाला जसे नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, पार्श्वसंगीत असते, तसे ते त्यांच्या कथांमधून अनुभवयाला येते. आपल्या शैलीतून ते आपल्याला इतिहासाच्या, पुराण पुरुषाच्याजवळ नेऊन ठेवतात. तिथला गंध आपल्याला जाणवायला लागतो. त्या मातीचा स्पर्शही व्हायला लागतो. कथा समजून घेण्यात याचा अतिशय उपयोग होतो. त्यात दिलेल्या शापांची-उःशापांची, आशीर्वादांची स्पंदने आपल्याला जाणवू लागतात. जगण्यातली निष्फळता, नियतीवाद असे काही योजून त्यांची कथा आकार घेत नाही.
 
 
माणसाच्या जगण्यावर अति तीव्र ‘सर्च लाईट’ टाकून सत्याची गाळीव रत्ने ते बाहेर काढतात. ‘रेडिमेड उत्तरे’ हातात न देता, ते वाचकांनाच सत्य काय आहे, हे शोधायला प्रवृत्त करतात. त्यामुळे त्यांच्या कथा प्रत्येक वाचकाला त्याच्या त्याच्या आकलनानुसार भिडत जातात. कथेचे हे निर्गुण रूप प्रत्येक रसिक वाचकाला आपापला पांडुरंग भेटवते. ही जीएंच्या कथांची खासियत म्हणता येईल.
 
 
एकलकोंडा, डोळ्यावर गॉगल ठेवून वावरणारा हा लेखक आपल्या दिव्यदृष्टीचे दर्शन आपल्या साहित्यातून घडवतो. तेव्हा त्यांच्याकडे साहित्याच्या मूलद्रव्यांची एवढी बेगमी कशी झाली असेल, असे वाटून जाते. प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळण्यात मागे असणारे जीए पत्ररूपाने मात्र अनेकांच्या अतिशय जवळ आले. हा माणूस मैत्र जपणारा होता, मिश्किल होता, विद्वत्तेचे प्रदर्शन न करताही आपल्या अथांग ज्ञान सागरातील थेंब मुक्त हस्ते वाटणारा होता. ही त्यांची ओळख ‘जीए निवडकपत्रे खंड 1 ते 4’ या ग्रंथांमधून गडद होते. पु. भागवत, राम पटवर्धन माधव आचवल, म. द. हातकणंगलेकर, कवी ग्रेस, जयवंत दळवी यांच्याशी त्यांनी केलेला पत्रव्यवहार, जीए यांच्या माणूसघाणेपणावरच्या आरोपाला सपशेल खोडून काढतो. त्यांना माणसांच्या उबदार सहवासाची आस आहे, असे या पत्रांतून वाटून जाते. सुनीताबाई देशपांडे यांच्याशी त्यांनी केलेला पत्रसंवाद हा निखळ मैत्रीचा उत्तम नमुना आहे. त्यांचा बुजरेपणा यात व्यक्त झालाय तसा त्यांचा व्यासंगही!
 
 
हा माणूस काय काय वाचतो आणि ती नावेसुद्धा आपण ऐकलेलीही नाहीत, अशी अपराधी भावना मनात निर्माण करतो. बालपणीच्या आठवणी, बहिणीबद्दलचे प्रेम, पुस्तके, माणसे यांना विश्लेषक वृत्तीने सहजपणे तपासण्याची सवय हे सारे आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडते. पत्रलेखनातून ते समोरच्याला आपल्या स्नेहरज्जूत असे काही गुंतवून ठेवतात की,प्रतिसाद देताना तो अधिक मोकळेपणाने व्यक्त होताना दिसतो. पत्र हे माध्यम माणसा-माणसात दिलखुलास संवाद साधण्यात किती उत्तम भूमिका बजावू शकते, याचे अनोखे दर्शन या पुस्तकांमधून होते. पत्रांच्या माध्यमातून साहित्य विश्वाचा भला मोठा कालखंड जीए उभा करतात.
 
 
रसग्रहण, समीक्षा, व्यक्तिदर्शन असे कोणतेही कप्पे न करताही हे सगळे साहित्याचे पैलू त्यांच्या ओघवत्या लेखणीतून वाचकांपर्यंत पोहोचतात. पत्र या ‘फॉर्म’चा एवढा चांगला उपयोग आणि प्रयोग आपल्याकडे क्वचितच झाला आहे.जाता जाता सहजपणे अनेक कादंबर्‍या,चित्रपट याविषयी ते सांगतात. माणसे अशी बारकाईने वाचतात की, पार त्यांच्या स्वभावाच्या मुळाशी जाऊन त्यांचे अंतरंग ते उलगडून दाखवतात. जीए हे एक असं बेट होतं की जे स्वतःच्याच खासगीपणा जपणार्‍या अथांग समुद्रांनी वेढलेले होते. बेटावर गेले की, आपण इतर जगाशी असलेला आपला संपर्क आणि संदर्भ विसरू पाहतो. मिळणार्‍या एकांताला कवेत घेऊन आपण त्या गूढ गंभीर वातावरणाशी एकरूप होऊ पाहतो. पण, आपल्याला एक नक्की माहीत असते की, काही काळासाठीच आपला इथे मुक्काम आहे. हे जग वेगळे आहे. जीएंच्या कथा वाचताना हे सगळे अनुभव आपल्याला मिळतात.
आपण इथले केवळ प्रवासी आहोत, ही भावना घट्ट करत आपण वाचन आनंदाच्या तराफ्यावर बसून आपल्या पार्थिव जगात परत येतो. खासगी पत्रव्यवहारात स्पष्टपणा आपोआपच येतो. कोणतीही भीडभाड न ठेवता आपली मते मांडायची मोकळीक यात मिळते. जीएंनी याचा पुरेपूर लाभ घेत संबंधित माणसांचे स्वभावपैलू छान उलगडून दाखवले आहेत. कोणत्याही साहित्यिक परिसंवादात, संमेलनात,उत्सवात सामील न होणार्‍या जीएंनी ‘निवडक पत्रे’ या व्यासपीठाच्या माध्यमातून साहित्य, समीक्षा याविषयीचे आपले चिंतन तटस्थपणे आणि सखोलपणे मांडले. या सर्व पत्रसंग्रहातून आपोआपच जीएंच्या स्वभावाचे अनेक पैलू समजतात. त्यांच्यामध्ये दडलेला शिस्तबद्ध माणूसही या पत्रात जागोजागी भेटतो. ‘सहजासहजी प्राप्त होणार्‍या; हात उंच करताच आवाक्यात येणार्‍या स्वप्नांसारखे मलीन, क्षुद्र या जगात काही नसेल’ असे म्हणणारे जीए स्वप्नांचे नेमके मूल्य जाणणारे साहित्यिक होते, याची रुजुवात या खंडांतून होते.
 
 
एखाद्या ब्रिटिश माणसाप्रमाणे ’जस्ट फार अ‍ॅण्ड नो फर्दर’ ही वृत्ती असल्यामुळे आपलं वैयक्तिक आयुष्य, आपला एकांत यात कुणाला ढवळाढवळ करून न देता जीए एखाद्या व्रतस्थाप्रमाणे लिहिते राहिले. या टोकाच्या लहरीपणामुळे ते काहीवेळा टीकेचे धनीही झाले. सुप्रसिद्ध नाटककार गिरीश कर्नाड यांना त्यांनी भेट नाकारली होती तो त्याकाळी चर्चेचा विषय झाला होता. सुलभा देशपांडे यांनी त्यांच्या कथेच्या हक्काविषयी चर्चा करण्यासाठी भेट मागितली असताना, ‘हे हक्क प्रकाशकाकडे आहेत त्यांच्याशी संपर्क साधा,’ असे कळवून ते मोकळे झाले होते.
त्यांच्या या स्वभावाचे दर्शन चित्रकार लेखक सुभाष अवचट यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या ‘जीए - एक पोर्ट्रेट’या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर विराजमान आहे. जीएंचे घर आणि त्याला लावलेले भले मोठे कुलूप चितारून अवचट यांनी या कुलूपबंद लेखकाची सार्थ ओळख करून दिली आहे.
 
 
हे घर पाहण्याची संधी मला 2008 साली मिळाली. मी हुबळीला गंगुबाई हनगल यांची मुलाखत ध्वनिचित्रमुद्रित करण्यासाठी गेलो होतो. जाताना धारवाड लागले. माझ्यासोबत प्रा. कमलाकर परचुरे हे अतिशय रसिक आणि अभ्यासू प्राध्यापक होते. त्यांना मी म्हणालो, “मला जी. ए. कुलकर्णी यांचे घर बघायचे आहे. जाऊया का?” ते ‘हो’ म्हणले. लेखक कसा दिसतो, हे वाचकांना पाहायचे असते, तसेच त्याचे घर पाहणे हाही एक आनंदाचा भाग असतो. पत्ता विचारत निघालो. अनेकांना ते कोण, हे माहितीही नव्हते. शेवटी कसाबसा त्यांच्या घराचा पत्ता एकाने सांगितला. जीएंच्या घराच्या शेजारील कुटुंबाकडे चौकशी केली.त्यांनी ते सायकलवर फिरत असे सांगितले. कुणात फारसे मिसळणारा त्यांचा स्वभाव नव्हता, ही आम्हाला ठाऊक असलेली माहितीही त्यांनी पुरवली. त्यांनी आस्थेने आपल्या मुलाला घर दाखवण्यास सांगितले. घर बंद होतेच, पण तिचे स्वरूप डोळ्यात साठवून ठेवताना वाटत होते - या वास्तूने किती तरी कथांचा जन्म पाहिला असेल. जीएंनी रंगवलेल्या अनेक व्यक्तिरेखांनी याच जागेत आकार घेतला असेल. ते घर कॅमेर्‍यात चित्रबद्ध करून आम्ही हुबळीकडे रवाना झालो. प्रवासात सतत जीए आठवत होतेच.
अतिशय बांधीव आणि अर्थगर्भ अशा कथा लिहिणारे जीए त्यांच्या कथा सर्वांच्याच पचनी पडतातच असे नव्हे. जीए दुर्बोध आहेत, असे अनेकजण म्हणतात. पण, मला तसे वाटत नाही. त्यांची भाषाशैली, रूपकं समजायला बिलकुल अवघड नाहीत. कथानकाला आणि व्यक्तिरेखांना भिडण्याचा त्यांचा ‘अप्रोच’ समजला की, सुरगाठीसारखे सारे उमजत जाते. माणसा-माणसांमधील भावबंध मोठ्या आत्मीयतेने टिपणारे गुरुनाथ आबाजी म्हणजेच जीए हे आपल्या साहित्य विश्वातील महत्त्वपूर्ण पर्व आहे. दुःख, वेदना याच चिरंजीवी आहेत, शाश्वत आहेत असं मानणारा हा लेखक! कथांमध्ये असणार्‍या व्यक्तिरेखा आणि त्यांची गाडाभर दुःखे यांचीच आरास करून वेदनेच्या वाटांवर धीराने चालण्यास त्यांनी वाचकांना शिकवले. ‘ट्रॅजेडी’चे चिवट समर्थन करणारे जीए हे केवळ शब्दांचे खेळ करणारे कारागीर नव्हते, तर मानवी आयुष्याचे सार नीटपणे समजलेले तत्त्ववेत्ते, भाष्यकार होते. झापडबंद निरस आयुष्य जगत असताना आपण करत असलेल्या कंटाळवाण्या जीवन प्रवासात जीएंसारख्या वटवृक्षाच्या सावलीत घटकाभर थांबण्याची इच्छा होणारा वाचक त्यामुळे भाग्यवान ठरतो. कारण, सुखासीनतेचा पाठलाग करताना,जीवनमरणाचा खेळ खेळताना मानगुटीवर बसलेली लालसा, त्याचाच परिपाक म्हणून मनात निर्माण होणारी भाबडी श्रद्धा, हे सगळे कसे निरर्थक आणि वांझ थांबे आहेत, हे माहीत होणे म्हणजे आयुष्याचे कोडे उलगडणेच नव्हे काय?
 
 
 
 - डॉ. केशव साठ्ये