मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील केलेल्या पूजाविधीबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेतला आहे. मंत्रालयातील कामकाज हे संविधानानुसारच व्हायला हवे, अशी भूमिका मांडत त्यांनी मंत्रालयातील पूजाविधीला विरोध केला आहे.
मिटकरी म्हणाले, "शिंदे साहेब धार्मिक आहेत, याबद्दल आमच्या मनात आदरच आहे. दुमत असण्याचं कारण नाही मात्र पूजा आणि विधीचे अधिकार हे आपल्या घरातच असावेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आज पदभार स्वीकारताना आपल्या कार्यालयात धार्मिक विधी केली असं कळतं. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहेआणि महाराष्ट्राचं मंत्रालय असेल किंवा विधानभवन असेल किंवा विधिमंडळाचं कामकाज हे भारतीय संविधानावर चालतं."
"शिंदे साहेब धार्मिक आहेत याबद्दल आमच्या मनात आदरच आहे. दुमत असण्याचं कारण नाही मात्र पूजा आणि विधीचे अधिकार हे आपल्या घरातच अशा प्रकारे सेक्युलर राष्ट्रामध्ये जर पूजाविधी मांडण्याचा थाट मुख्यमंत्र्यांकडून होत असेल तर निश्चितच ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. भारतीय संविधानाच्या अनुसार पंचवीस, सव्वीस, सत्तावीस या ज्या काही कलमं आहेत अठ्ठावीस यामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे.
मात्र अशा ठिकाणी जिथं शासकीय कार्यालय आहेत तिथं कुठल्याही प्रकारचा धार्मिक पूजाविधी होता कामा नये. हा संविधानाचा एक प्रकारे अपमान आहे", असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारची पूजा केल्यानंतर लोकशाही जिवंत आहे का? याचं चिंतन पण या निमित्तानं झालं पाहिजे कारण ही गोष्ट लोकशाहीला मारक आहे. मी या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यावर केली.