छंद जीवाला लावी ‘पिसे’

07 Jul 2022 09:45:10


mansa 
 
 
 
आकाशात विहरणार्‍या पक्ष्यांची पिसे (पंख) गोळा करून, त्या पिसांवरच कलाकुसर चितारणार्‍या निलेशकुमार चौहाण या युवा कलाकाराची ही चित्तरकथा...
 
 
गुजरात, नवसारी येथे जन्मलेल्या निलेशकुमार प्रवीण चौहाण यांचे बालपण मुंबईतच गेले. वडील खासगी सेवेत काम करीत, तर आई गृहिणी असल्याने घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्याही परिस्थितीत आई-वडिलांनी निलेशच्या पालनपोषणात व शालेय शिक्षणात कुठलीही कमी पडू दिली नाही. गरिबीशी लढत आपल्या ध्येयाकडे कूच करणार्‍या या कुटुंबात अघटीत घडले. निलेश दहावीत असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून त्याने पुढील शिक्षणाला रामराम ठोकत ‘ग्राफीक डिझायनिंग’चा कोर्स करण्याचे ठरवले. या कोर्ससाठी त्याच्या आईने काबाडकष्ट तसेच पदरमोड करून भार उचलला आणि आपल्यातील अंगभूत कलेचा श्रीगणेशा निलेश यांनी केला. ‘ग्राफिक डिझायनिंग’ पूर्ण केल्याने त्या कौशल्याच्या जोरावर निलेशला एका जाहिरात एजन्सीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. गेली २० वर्षे तो जाहिरात क्षेत्रात कार्यरत असून जाहिरात एजन्सीमध्ये आता तो ‘आर्ट डायरेक्टर’ आहे. नाजूक कलाकुसरीच्या कामासह कटिंग-पेस्टिंगचा गाढा अनुभव असल्याने कोणत्याही वस्तूवर तो लिलया कोरीव कलाकृती साकारतो.
 
 
कलेच्या या व्यासंगासोबतच निलेशला प्रवास करणे, गाणी ऐकणे आणि वेगवेगळ्या कलाकृतीवर प्रयोग करण्याचा छंद आहे.जाहिरात क्षेत्रात काम करीत असताना निलेश तब्बल दोन वर्षे विविध पक्ष्यांची पिसे गोळा करीत होता. पक्ष्यांच्या पिसांचा मोठा संग्रहच त्याने घरात केला होता. एकदिवस त्याच्या बहिणीने त्याला एका पुस्तकाचे छायाचित्र पाठवले. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या छायाचित्रावरून पक्ष्यांच्या पिसांवर कलाकुसर करण्याची प्रेरणा त्याला मिळाली.
 
 
विविध पक्ष्यांच्या रंगीबेरंगी पिसांचा उपयोग अलंकरणासाठी करण्याची प्रथा तशी जुनीच आहे. बाणाच्या पुच्छभागी पिसे लावणे, विविध प्रकारची शिरोभूषणे पिसांनी सजविणे, परांच्या गाद्या, हंसपिसांचा लेखणीसारखा वापर करणे व मोरपिसांचे पंखे तयार करणे इ. प्रकार सर्वश्रुत आहेत. प्राचीन काळापासून आदिम जमातींत पक्ष्यांच्या पिसांचा उपयोग जमातीच्या चालीरीतीचा एक भाग म्हणून केला जाई. भारतातील काही वनवासी जमातींत शिरोभूषणांना तसेच काही वस्त्रविशेषांना सजविण्यासाठी मोरपिसांचा तसेच इतर पक्ष्यांच्या पिसांचा वापर केला जात असे. या माहितीच्या शिदोरीवर निलेशही पक्ष्यांच्या पिसांवर कोरीव काम करू लागला. गेली पाच वर्षे तो पक्ष्यांच्या पंखावरती कोरीव काम करीत असून आतापर्यंत टर्की, स्कारलेट मकाऊ, अमेरिकन, आफ्रिकन आदी एक्झॉटिक बर्डसारख्या विदेशी पक्ष्यांच्या पिसांवर १०० पेक्षा जास्त चित्तवेधक कोरीव कलाकृती त्याने साकारल्या आहेत. ही कला त्याला कुणी शिकवली नाही, स्वतःहूनच हे कोरीव काम शिकल्याचे निलेश सांगतो. अनेक राजकीय नेते, अभिनेते, क्रीडापटू तसेच, महापुरुषाच्या प्रतिमा पिसांवर हुबेहुब कोरल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र टर्की या पक्ष्याच्या पिसांवर कोरले आहे. याशिवाय, सचिन तेंडुलकर, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, कृष्णा अभिषेक, सोनू सुद आदींना त्यांच्या प्रतिमा पिसांवर कोरून त्या त्यांना भेट दिल्याचे निलेश सांगतो.
 
 
या आगळ्यावेगळ्या कलाकृतीमुळे निलेशला भारतातील पहिले पक्ष्यांच्या पिसांवर कलाकृती साकारणारे ’वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया’ हे प्रमाणपत्र मिळाले आहे. या व्यतिरिक्त ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’वरही निलेशने आपले नाव कोरले आहे. निलेश कधीही पक्ष्यांना मारून अथवा त्यांना दुखवून त्यांची पिसे वापरत नाही. ऋतुमानात पंख झाडणार्‍या पक्ष्यांची गळालेली पिसेच कलाकुसरीसाठी वापरत असल्याचे सांगतो. आतापर्यंत त्याच्या या कलाकारीचे अनेक ठिकाणी हस्तकला प्रदर्शन पार पडले आहे. याशिवाय विविध टीव्ही शोमध्येदेखील निलेशने आपल्याकडील पिसांचा जादुई खजाना रसिकांसाठी खुला केला आहे. या कोरीव कलेला निलेशला व्यावसायिक स्वरूप द्यायचे असून देशविदेशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोरीव कलेचा डंका वाजवायचा असल्याचे तो सांगतो. निलेशच्या या कलेचा आस्वाद त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तसेच, पळश्रशीहलहर्रीहरपरीीं इथेही पाहता येतो.
 
 
नवीन पिढीला संदेश देताना निलेश, शिक्षणासोबतच एखादी कला अथवा कौशल्य शिकण्यास सांगतो. पशुपक्ष्यांविषयी भूतदया दाखवण्याबरोबरच स्वतःच्या आनंदासाठी किंवा कलाकुसर दाखवण्यासाठी वन्यप्राणी पशुपक्ष्यांची हत्या करू नका. पक्ष्यांना मारून त्यांचे पंख या कलेसाठी वापरू नका, असेही आवाहन निलेश करतो, अशा या हरहुन्नरी युवा कलावंताला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्याशुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0