आता आषाढ वारीला सुध्दा टोल माफी

06 Jul 2022 18:38:40
एकनाथ
 
 
 
 
 
मुंबई: कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. या बद्दल आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
 
दरवर्षी आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठोबाची महापूजा होत असते. यावर्षी तो मान राज्याचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. गेले अनेक दिवस राजकीय उलथापालथ पाहता तो मान कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र आता हे चित्र स्पष्ट झाल्याने 'यंदा विठूरायाची पूजा एकनाथांच्या हस्ते होणार' अशा चर्चांना उधाण आलं आहे.
 
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी मंगळवारी (दि. ५ जुलै) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली. दरम्यान आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या महापूजेसाठी शिंदे कुटुंबियांना सहपरिवार येण्यास आमंत्रित केले आहे. वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन मुख्यमंत्र्यांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प.श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अधिकारी श्री.गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0