राष्ट्रपती निवडणुक: खा.शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर पत्रातून दबाव?

06 Jul 2022 11:58:38
y 
 
 
 
 
 
मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या रालोआच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. खासदार शेवाळे यांनी पत्राच्या माध्यमातून आपली इच्छा उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदेगटाकडून यापूर्वी करण्यात आला होता. राहुल शेवळेंसारख्या उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या खासदारांनी पत्राच्या माध्यमातून मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
 
खासदार राहुल शेवाळे हे शिवसेनेचे दक्षिण मध्य मतदार संघातील खासदार आहेत. शेवळेंनी एकनाथ गायकवाड यांच्या सारख्या जेष्ठ कॉंग्रेस नेत्याचा एक लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव केला आहे. महाविकास आघाडी सरकारला विरोध दर्शवत शिंदेगटाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दणका दिला व भाजपसोबत सरकार स्थापन केले.
 
 
आता शिवसेनेच्या खासदारांकडूनही भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात ठाकरेंवर दबाव टाकण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान रालोआकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली असून विरोधी पक्षनेत्यांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देशात भाजपकडे बहुमत असून त्यांना पाठिंबा देण्याची मागणी करत आता सेनेच्या खासदारांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला जात असल्याचे बोलले जाते.
 
राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून त्यात, भाजप-शिवसेना युती असताना बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा न देता महाराष्ट्रातील उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता, असे म्हटले आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपशी जुळवून घ्या असा राहुल शेवाळे यांनी पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्याकडे दबाव टाकला आहे का? असा प्रश्न सध्या उद्भवतो आहे. 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0