नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडून यावा - चंद्रशेखर बावनकुळे

    06-Jul-2022
Total Views |
 
मुंबई :  राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यात नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतमधील नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडून यावा, याबाबत त्यांनी निर्णय घेतला होता. पण महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलुन नगरपालिका, ग्रामपंचायतीमध्ये  अस्थिर वातावरण तयार केले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात महाविकास आघाडीचा निर्णय तातडीने बदलून  सरपंच व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याचे माजी ऊर्जामंत्री आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. बुधवार ६ जुलै सकाळी त्यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.


स्थिरतेसाठी निर्णय महत्त्वाचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस पुन्हा नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेतून निवडून आणण्यासंबंधी कायदा करून दिलासा देतील, असा विश्वास आमदार बावनकुळे यांनी व्यक्त केला. हा निर्णय सर्वच नगराध्यक्ष, सरपंचांना मान्य होईल, हा निर्णय नगरपालिका, ग्रामपंचायतमध्ये स्थिरता आणण्यासाठी महत्वाचा आहे, असेही ते म्हणाले.


फडणवीस - शिंदे सरकार ओबीसींना न्याय देईल

महाविकास आघाडीमध्ये झारीचे शुक्राचार्य होते, त्यांनी ओबीसी आरक्षण होऊ दिले नाही, असा आरोप आमदार बावनकुळे यांनी केला. सुप्रीम कोर्टाने चारदा आदेश देऊनही आयोग नेमला नाही, आयोग नेमला तर पैसे दिला नाही, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्या नाही. मध्यप्रदेश सरकारने कमिटीमध्ये तीन आमदारांचा समावेश करून ओबीसी आरक्षणासाठी स्ट्रक्चर उभे केले, पण महाविकास आघाडी सरकारने लोकप्रतिनिधीना वगळून आयोग तयार केला. आता माजी मंत्री विजय वडेट्टीवार व छगन भुजबळ हेच चुक झाल्याची कबुली देत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी आरक्षणावर चर्चा केली. या दोघांना अभ्यास आहे. ओबीसीचा अचूक डाटा तयार करून सुप्रीम कोर्टापुढे सादर करण्याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कालच स्पष्ट केले. ओबीसीना शिंदे फडणवीस सरकारच न्याय देऊ शकते, असा दावाही बावनकुळेंनी यावेळी केला आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.