काय पाऊस, काय पुणे, काय उणे?

06 Jul 2022 11:26:32
 
mansoon
 
 
 
 
जुन महिना बिनपावसाचा अनुभवलेल्या पुणेकरांना जुलैच्या पहिल्या तारखेपासूनच अगदी पुणेकर ज्यासाठी प्रसिद्ध आहेत, तशाच लहरीपणाने येणार्‍या पावसाने कोंडीत पकडले असून आता पुणेकर देखील रोज आपली या पावसाने फजिती होत असल्याचे बघून ’डॉयलॉग फेम’ आमदार शहाजी पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या त्या माणदेशी भाषेतील ‘डायलॉग’च्या धर्तीवर वर ’काय पाऊस...काय पुणे... काय उणे? अशी ‘डॉयलॉग’ बाजी करून ‘एन्जॉय’ करीत आहेत. यातून पुणेकरांनी प्रशासनाच्या नालेसफाईतील दिरंगाई आणि रस्त्यातील पाण्याने भरलेले खड्डे यावर नेमके बोट ठेवले आहे.
 
 
दि. १ जुलैपासून पुण्यात दररोज पावसाच्या सरी बरसत असल्या तरी अद्याप कोसळधारा बरसायाच्या आहेत. हवामान खाते रोज पुणेकरांना येत्या 24 तासांत मुसळधार बरसणार म्हणून इशारे देत आहे. मात्र, पुण्याच्या बाबतीत तरी त्यांचा अंदाज साफ चुकल्याने पुणेकर सरी कोसळल्यानंतर निर्माण होणार्‍या उकाड्याने हैराण झाले आहेत. शिवाय वाटेत ऐन महत्त्वाच्या कामासाठी निघताना फजिती करणारा पाऊस फिरकी घेत असल्याने एकूणच नागरिकांची अवस्था कोंडीत पकडल्या गेल्यासारखी झाली आहे.
 
 
त्यात जूनमध्ये पाऊस न झाल्याने पुणेकर नागरिकांची पाणीटंचाईतून भविष्यात सुटका करण्याच्या हेतूने सोमवारपासून एकदिवस आड पाणी कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने माथी मारला. किमान आठवडाभर तरी ही एक टंचाई सहन करावी लागणार आहे. त्यात आता अधूनमधून आडवा-तिडवा येणारा लहरी पाऊस पुण्यातील रस्त्यांची स्थिती ‘एक्सपोज’ करतोय, वाहतूककोंडीमुळे वेळेचे गणित बिघडते आता चिमटे काढायचे तरी कोणाला? टोमणे मारायचे तरी कोणाला? हा पुणेकरांपुढे प्रश्न आहे. तसे बघता या वृत्तीसाठी पुणेकर कुख्यात नाहीत, त्यांचा हेतू वाईट नसतो, ते चुकलेल्यास जागा दाखवून देत असतात, म्हणूनच ते हसत-खेळत ’स्पिरीट’ने काय पाऊस...काय पुणे... काय उणे? अशी कोपरखळी मारण्याची संधी सोडत नाहीत, असेच म्हणावे लागेल.
 
 
आदरातिथ्याचे ‘डेस्टिनेशन’!
 
 
पुण्यात आता केवळ मूळ पुण्याचे लोक आणि त्यांना सोबत करणारे देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेले नागरिक वावरत आहेत. एकेकाळी वर्‍हाड किंवा विदर्भ आणि पुणे हे याबाबतीत दोन टोके होती. विदर्भातील अघळ-पघळ आदरातिथ्य आणि पुण्यातील मोजक्या व नेमकेपणाच्या अनेक सुरस कथा प्रसिद्ध आहेत. पण, म्हणून पुणे बदनाम झाले नाही. उलट ते प्रगतीचे टप्पे गाठत आज जागतिक कीर्तीचे शहर बनत आहे. तात्पर्य हेच की, आजच्या बदलत्या काळात पुण्यातील पायाभूत सुविधा क्षेत्रात होत असलेला बदल आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या शहराचे स्थान आता जागतिक पातळीवर परिचित झाले आहे. नवे छोटे उद्योग व्यवसाय, ‘स्टार्टअप’ची वाढती संख्या म्हणजे या तरुणाईच्या कुशल वृत्तीचे प्रतीक आहे.
 
 
पुण्यातील या गर्दीत रोज लोक आपापली सुखदु:खे एकमेकांशी शेअर करीत आहेत, किंबहुना गावागावातून आलेली तरुणाई तर भविष्य उज्ज्वल करण्याचा मानस ठेवून या शहरातून आपल्या स्वप्नाना नवे पंख दररोज देत आहे. त्यासाठी त्यांची परिश्रम करायची तयारी देखील स्पृहणीय आहे. रोज नवा येणारा येथील माणूस स्वतःला आपण एकटे आहोत हे विसरून जातो, त्याला पदोपदी भेटणारा माणुसकी दाखवून आपलासा करून घेत आहे. अनोळखी असेल, तर त्याची आपुलकीने विचारपूस आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. या शहराचा विस्तार झाला, लगतची खेडी समाविष्ट झाली आणि हा ग्रामीण भागातील अस्सल गोडवा येथे रुजायला सुरुवात झाली. सकारात्मक दृष्टिकोनातून या ऐतिहासिक शहराकडे बघताना आता नव्या-जुन्याचा मिलाप एका वैचारिक सौंदर्यात भर घालणारा ठरत आहे. नव्या पिढीसाठी ही जमेची बाजू ठरेल यात संदेह नाही. सहसा आपण गुन्हेगारी वृत्ती वाढली, लोक नैराश्यात चालले त्यामुळे अनैतिकता समाजात बळावली आहे, असा एकंदरीत समज रूढ झालेला असतो. मात्र, अर्ध्याहून अधिक पाहुण्यांचे घर बनलेल्या पुणे शहरात सकारात्मक प्रचिती येत आहे. ‘चहा घेऊन आला असणार’ असे उपहासाने विचारणारे पुणे आता आदरातिथ्याचे ‘डेस्टिनेशन’ बनत चालले आहे. पुणेरी पाट्या, टोमणे, चिमटे या गोष्टींना आता प्रत्येकजण खेळीमेळीने घेत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0